भारतात किरकोळ व्यापार हा कदाचित हजारो वर्षांपासून चालत आलेला जुना व्यवसाय आहे. अगदी पुरातन काळी वैश्य समाज हा व्यवसाय चालवत असे. पुढे गावागावांतून आठवडय़ातील ठरावीक दिवशी किरकोळ व्यापाराचा सामूहिक कार्यक्रम करण्याची प्रथा सुरू झाली. ‘हाट’ या शब्दाने ओळखला जाणारा कार्यक्रम बाजारहाट म्हणून पुढे प्रचलित झाला व आजही वापरात असलेला वाक्प्रचार म्हणून आपणा सर्वास परिचित आहे. प्रथमत: मालाची अदलाबदल, मग चलन-पैशांच्या बदल्यात मालाची किरकोळ विक्री, मग आठवडय़ाच्या बाजारातून स्थायिक दुकानांची मांडणी असे टप्पे पार करीत आज या किरकोळ व्यापाराची शहराशहरांत प्रचंड शहरात जणू जत्राच लागलेली असते. वस्तुभांडाराच्या रूपाने सुरू झालेली ही किरकोळ व्यापाराची जत्रा आज बहुमजली वातानुकूलित इमारतीमध्ये कायमस्वरूपी भरणारी जत्राच झाली आहे. वॉल मार्टसारखी किरकोळ दुकानांची साखळी १९६२ साली स्थापन झाली. सॅम वॉल्टनने लावलेले हे रोप आज वाढत जाऊन अमेरिकन भांडवली बाजारात १,३९,५०० कोटी रुपये मूल्य असणारे वृक्ष स्वरूपात दिसते आहे. भारतातही किरकोळीचा हा घाऊक बाजार वेगाने प्रगती करताना दिसत आहे. आज ही किरकोळीची बाजारपेठ ३,२०,४०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. वार्षिक १३ ते १५ टक्क्यांनी वाढणारा हा व्यापार २०१८-१९ पर्यंत ५,६८,००० कोटी रुपयांच्या घरात जाईल असाही एक अंदाज आहे; पण पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतातील किरकोळ व्यवसाय वेगळ्या वळणावर आहे. आज भारतात जवळजवळ ९२% किरकोळ व्यापार हा विस्कळीत स्वरूपाचा आहे. या विस्कळीत स्वरूपात अगदी फुटकळ किराणामालाच्या दुकानापासून शहरातील थोडी मोठी पण व्यक्तिगत मालकीची दुकाने मोडतात; पण संघटित किरकोळी घाऊक व्यापार आता पाश्चिमात्य देशांच्या चालीवर भारतातही वाढीस लागला आहे. २००९ साली केवळ ९,३०० कोटी रुपयांचा असणारा हा व्यवसाय २०१२ साली २५,००० कोटी रुपयांच्या घरात होता, तर २०१९ सालापर्यंत तो ५६,९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा