काहीशा धक्कादायक शीर्षकाच्या या पुस्तकात ‘चालढकल हीदेखील एक कला कशी ठरू शकते हे स्पष्ट आणि नेमक्या शब्दांमधून लेखक जॉन पेरी या स्टॅनफर्ड विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाने मांडले आहे. परिचय, दहा प्रकरणे आणि परिशिष्ट अशी पुस्तकाची सुटसुटीत रचना आहे.
 मानवी मनात चालढकल करणे या संकल्पनेची अत्यंत नकारात्मक छटा रुजली आहे. पेरी यांनी याच संकल्पनेकडे सर्वस्वी भिन्न दृष्टीने पाहण्यास सुचवले आहे. मानव आणि प्राणी यांच्यातील सर्वात मुख्य फरक म्हणजे विवेकबुद्धी. मात्र, लेखकाच्या मते तिच्या वापराने निकाल जरी चांगले मिळत असले तरीही त्यात आपण आनंद गमावतो. कारण एकीकडे सर्व शास्त्रे जे सर्वोत्तम आहे ते वेचण्याच्या मानवी प्रवृत्तीबद्दल वर्णन करत असले तरी प्रत्यक्षात माणसाचा कल आणि वर्तन तसे नसते. उलट, माणसाची सहजप्रवृत्ती ही चालढकल करण्याकडे असते. आणि त्याच अनुषंगाने हे पुस्तक लिहिले गेले आहे.
सतत एक नियोजनबद्ध, साचेबद्ध, ‘नो नॉनसेन्स’ आयुष्य जगणे यालाच ‘पूर्णत्व’ मानण्याची जी प्रचलित पद्धती आहे, तिला हे पुस्तक छेद देते. आणि तेसुद्धा खमंग आणि खुसखुशीतपणे. आपण ‘साचेबद्ध चालढकलकार’ असतो असे विधान लेखक पहिल्या प्रकरणात करतात. कोणाला दुखविणे, हिणवणे किंवा योग्यायोग्यता ठरविणे हा मुद्दा नसून केवळ या वृत्तीला ‘कला’टणी कशी द्यावी हे ते सांगतात. कामचुकार व्यक्ती एखादी गोष्ट का करते, या प्रश्नाचे खरे उत्तर म्हणजे त्यांच्याकडे ते काम टाळण्याइतके महत्त्वाचे दुसरे काही नसते. आपण अनेकदा कामांची यादी तयार करतो आणि त्यांचे प्राधान्यक्रम आखतो. त्यात अतिप्राधान्याने करावयाच्या गोष्टी ते अत्यल्प प्राधान्याने करावयाच्या गोष्टी असा क्रम असतो. अनेकदा अल्प प्राधान्याच्या गोष्टी करण्यात वेळ गेल्याने अतिप्राधान्याच्या गोष्टी मागे राहतात. पण त्याच वेळी आपल्याला अनेक कामे केल्याचे समाधान मिळत असते. त्यातूनही ‘माणूस’ म्हणून आपली वाढ होत असते आणि गंमत म्हणजे आपण स्वत:च्या नजरेत अपराधी ठरत असतानाच सामाजिक प्रतिष्ठाही मिळत असते, असा मजेशीर युक्तिवाद पेरी यांनी दुसऱ्या प्रकरणात केला आहे.
अनेकदा माणसे काम करायची क्षमता असताना कामे का टाळतात, त्याचा त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, त्याकडे कसे पाहावयास हवे, मनात येणारी अपराधीपणाची भावना कशी कमी करायला हवी आणि यामागील प्रेरणास्रोत कुठला, याचा ऊहापोह एका स्वतंत्र प्रकरणात केला आहे.
कामात चालढकल करणाऱ्या व्यक्तीचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे निर्वाणीचा क्षण आला, ‘डेडलाइन’ वाढण्याची संधी संपली की मग काम संपवायचं. पेरी यांनी या प्रवृत्तीची तुलना संगणकाशी केली आहे. मात्र हे प्रकरण तितकेसे रंजक झालेले नाही.
अब्राहम लिंकन यांचे एक वाक्य आहे- आपल्या शत्रूला देता येण्याजोगी सर्वात मोठी शिक्षा म्हणजे त्याला मित्र करा. ‘कोलॅबोरेटिंग विथ द एनेमी’ हे प्रकरण या अंगाने जाणारे वाटते. ‘आळशाला ज्ञान त्रलोक्याचे’ या मराठी म्हणीचा प्रत्यय देणारे प्रकरण म्हणजे ‘फ्रिंज बेनिफिटस्’. अनेकदा कामात चालढकल करीत असताना आपली काही कामे त्यांची कालसुसंगतता कमी झाल्याने आपोआप यादीतून गळून पडतात आणि यादी आपोआप कमी होत जाते, ही भावना किती सुखद असते, ते लेखक रंगवून सांगतो. एकंदरच खुसखुशीत शैलीतले हे एक मजेशीर आणि वेगळा दृष्टिकोन देणारे पुस्तक आहे.
डोन्ट बाय धिस बुक नाऊ : जॉन पेरी,

प्रकाशक- पेंग्विन वायकिंग, नवी दिल्ली,
पाने : ९२, मूल्य : २९९ रुपये.

Story img Loader