श्रीगोंदवलेकर महाराज जेव्हा सांगतात की, ‘‘भगवंताच्या स्मरणाने माणूस प्रपंचाच्या बंधनापासून अलिप्त राहील’’ तेव्हा ते प्रपंचाच्या बंधनापासून मनानं अलिप्त व्हायला सांगतात, देहानं प्रपंचापासून नव्हे. हे बंधन मानसिक आहे. प्रपंचाच्या प्रभावाचं हे बंधन आहे. त्या बंधनाच्या तावडीतून अलिप्त होण्याचा उपाय भगवंताचं स्मरण आहे. त्या स्मरणानं अपूर्ण प्रपंचही पूर्ण होईल, सुखमय आणि दु:खमय असा द्वैतयुक्त प्रपंचही पूर्ण आनंदाचा होईल. म्हणूनच श्रीमहाराज सांगतात, ‘‘ज्या भगवंताजवळ आनंद राहतो त्याचे होऊन राहिले तरच अखंड आनंदी होता येईल’’ आणि ‘‘ज्याला आपला काला म्हणजेच प्रपंच गोड व्हावासा वाटतो त्याने आपल्या घरात भगवंताला आणावा. आपल्या प्रपंचात गोपाळाचे स्मरण ठेवून राहा, मग तो प्रपंच गोड झाल्याशिवाय राहणार नाही.’’ आता भगवंताला आपल्या घरात आणायचं म्हणजे काय? तर आपल्या प्रपंचातील घडामोड ही त्याच्याच इच्छेनं चालत्ेा, ही जाणीव बाळगायचा प्रयत्न करायचा. चांगलं घडो किंवा वाईट घडो, अंतिमत: ते माझ्या हिताचंच आहे, हा भाव बाळगूनच प्रयत्न करायचा. बरेचदा ज्या गोष्टीला मी वाईट मानतो ती माझ्या हिताचीच असते. मोहामुळे माझ्या मनाविरुद्ध झालेली गोष्ट मला वाईट भासते. प्रत्यक्षात त्या गोष्टीमुळे मी सचेत होतो, प्रयत्नांसाठी आणि परिश्रमांसाठी अधिक उभारीने उभा राहू शकतो. माझ्या क्षमतांचा नव्याने वापर करू लागतो. जी गोष्ट मी चांगली मानतो ती वस्तुत: चांगली असतेच असंही नाही. तिचं खरं स्वरूप हळुहळू उघड होऊ लागतं. तेव्हा परिस्थिती कशीही येवो, ती परमात्म्याच्या अर्थात सद्गुरूंच्या इच्छेनं आली, माझ्या प्रारब्धयोगानं आली, हे जाणून आणि परिस्थिती वाईट असेल तर स्वप्रयत्नांनी पण त्यांचं स्मरण राखतच ती बदलण्याचा प्रयत्न मी केला तर परिस्थितीच्या चढउतारानुसार सुखी आणि दु:खी होणारं माझं मन हळूहळू भगवंताच्या स्मरणात रंगू लागेल. मनावर होणाऱ्या परिस्थितीच्या आघाती परिणामांची तीव्रता कमी होत जाईल. कबीरदास जेव्हा म्हणतात, ‘दुख मे सुमीरन सब करै सुख मे करे न कोय, जो सुख मे सुमीरन करे, तो दुख काहे को होय।’ त्याचा हाच बोधार्थ आहे. दु:ख झालं तर भगवंताची आळवणी कोणीही करील. पण सुखात असतानाही जो भगवंताला विसरणार नाही त्याला सुख आणि दु:ख यांचं खरं स्वरूप उमगत जाईल, त्यांची खरी व्याप्ती कळेल, त्यांना किती महत्त्व द्यावं, तेही उमगेल. प्रत्यक्षात दु:ख लहान असू शकतं, आपण कल्पनेची भर घालून काळजी आणि भीतीनं त्या दु:खाचं बुजगावणं कमालीचं मोठं बनवतो आणि ते दु:ख मग अधिकच उग्र वाटू लागतं. पण मन जर सदोदित भगवंताजवळ असेल, भगवंताच्या स्मरणात असेल तर सुखानं मी हुरळून जाणार नाही की दु:खानं खचून जाणार नाही. प्रत्येक परिस्थितीत माझ्या मनाचं संतुलन कायम राहील. तेव्हा भगवंताला घरात आणायचं, भगवंताच्या जवळ राहायचं म्हणजे देहबुद्धीच्या जागी देवबुद्धीची जाणीव निर्माण करायची आणि वाढवायची. ते साधण्याचा मार्ग कोणता?