व्हिएतनाम युद्धाचा अमेरिकेवर जो काही परिणाम झाला, त्यात सर्वात मोठा भाग सांस्कृतिक घुसळणीचा होता. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धातील मानसिक घुसळणीहून तिची मात्रा अंमळ अधिक होती, कारण साहित्यापासून कलेच्या सर्वच प्रांतांमध्ये युद्धाचे पडसाद उमटत गेले. पॉप संगीतामधून युद्धविरोधी, अमेरिकेच्या भूमिकेविरोधी सूरघर्षण सुरू झाले आणि युद्धोत्तर काळात अमेरिकेमध्ये तयार झालेल्या दुर्धर परिस्थितींच्या गाथा रॉबर्ट स्टोन यांच्या कादंबऱ्यांमधील पानांमध्ये जिवंत होऊ लागल्या. 

रॉबर्ट स्टोन यांनी गेली सहा दशके अमेरिकी साहित्याची खऱ्या अर्थाने ‘सेवा’ केली. ‘कॅचर इन द राय’ लिहिल्यानंतर गूढपणा कवटाळणारे जे. डी. सालिंजर, त्यांच्या अलिप्तपणाला थिटय़ा ठरविणाऱ्या थॉमस पिंचन आणि सत्तरोत्तर काळात अमेरिकी साहित्यात गॉर्डन लीश या संपादकाच्या झंझावाती कारकीर्दीने संप्रदाय प्रवृत्तीचा अमेरिकी कादंबरीवर प्रभाव टाकला. आजही फिक्शन स्कूल आणि लीश यांचे वारसदार यांच्या फेऱ्यातून अमेरिकी ‘शुद्ध साहित्यिक’ अथवा ‘खूप विक्री’ (बेस्ट सेलर) कादंबरी सुटत नाही. या धर्तीवर संप्रदायहीन वाट चोखाळणाऱ्या आणि आपल्या लेखनाचा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या मोजक्या लेखकांमध्ये स्टोन यांचे नाव होते. व्हिएतनाम युद्धानंतर अमेरिकी जनजीवनात झालेली घसरण. ड्रग्ज, िहसाचार, निदर्शने यांचा सुळसुळाट. नैतिकतेच्या झेंडय़ाचा व्यक्ती आणि समष्टीने मांडलेला अवमान-खेळ सातत्याने स्टोन यांच्या कादंबरीमध्ये उमटत राहिला. ब्रुकलीनमध्ये १९३७ साली जन्मलेल्या स्टोन यांचे बालपण कुटुंबावर आलेल्या दुर्दैवाने अनाथालयांमध्ये गेले. पत्रकारिता आणि साहित्य या दोन भिन्न क्षेत्रांत त्यांची वाटचाल सुरू झाली. ब्रिटिश प्रकाशनासाठी व्हिएतनाम युद्ध वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या स्टोन यांनी तेथील अनुभवांना अमेरिकी जीवनातील बदलांशी जोडून डॉग सोल्जर कादंबरीत मांडले. अमेरिकी पत्रकारितेमधील सर्वोच्च सन्मान त्या कादंबरीला मिळाला आणि नंतर स्टोन यांच्या लेखनाची आणि त्यानंतर होणाऱ्या गौरवाची गती निश्चित झाली. लेखणीचे चक्रमयुग (गॉन्झो) निर्माण करणाऱ्या हंटर थॉम्पसन किंवा टॉम वुल्फ यांच्या विचक्षण (आणि खूप विक्या) पत्रकारितेशी साधम्र्य असले, तरी रॉबर्ट स्टोन यांच्या लेखनाची जातकुळी वेगळी राहिली. आठ कादंबऱ्या आणि काहीशा कथासंग्रहाच्या बळावर अमेरिकी साहित्याच्या दालनात स्वत:च्या लेखनाची जागा अबाधित ठेवणाऱ्या या साहित्यिकाच्या निधनामुळे प्रवाहविरोधी लेखन-शिलेदारांपैकी एक तारा निखळला.