वाजपेयी यांच्या भारतरत्न सोहळ्यानंतर त्यांचे माजी माध्यम-सल्लागार अशोक टंडन यांनी लिहिलेली महत्त्वाची आठवण आहे ती पोखरण-२ अणुचाचणीसंदर्भात.. माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या राजकीय औदार्याची ही आठवण म्हणजे खूणच. राव यांच्या स्मारकाच्या मागणीस भाजपप्रणीत एनडीएने आता अनुकूल प्रतिसाद दिला, तेही गैर नव्हे..
संसदीय लोकशाहीत आजी आणि माजी पंतप्रधान यांचे संबंध कसे सौहार्दपूर्ण असू शकतात आणि राजकीय मतभेद असले तरी या प्रौढ आणि पोक्त राजकारणाचा देशाला कसा फायदाच होतो याचे हृद्य उदाहरण पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भारतरत्न सोहळ्यामुळे समोर आले आहे. वाजपेयी यांची प्रकृती ठीक नाही. गेली आठ वष्रे त्यामुळे त्यांनी समाजजीवनातून पूर्ण निवृत्ती पत्करली असून त्यांची व्याधिग्रस्त अवस्था लक्षात घेता राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन या माजी पंतप्रधानास भारतरत्न प्रदान केले. यानिमित्ताने बराच काळ वाजपेयी यांच्यासमवेत काम केलेले अशोक टंडन यांनी काही महत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला असून त्यावरून वाजपेयी-पी. व्ही. नरसिंह राव संबंधांवर तसेच तत्कालीन राजकारणातील संवादशीलतेवर प्रकाश पडतो. टंडन हे वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार होते. त्यामुळे अनेक विषयांवरील संवेदनशील माहिती त्यांच्यासमोर येत होती. परंतु यातील किती स्वत:च्या पोटात ठेवायची आणि किती उघड करायची याचा विवेक त्यांनी दाखवला. पदावरून दूर झाल्यावर शीर्षस्थ नेत्याजवळील अधिकाऱ्याने आपल्या एके काळच्या साहेबावर दुगाण्या झाडण्याचा प्रकार अलीकडे घडत असताना टंडन यांची या संदर्भातील गंभीर आणि मृदू मांडणी ही अधिक भावणारी आहे. टंडन यांनी आमच्या सहोदर दैनिकात, द इंडियन एक्स्प्रेसमध्ये, मंगळवारी लिहिलेल्या लेखामुळे भारतातील अंतर्गत राजकारणात अमेरिका आदी महासत्तादेखील किती प्रकारे हस्तक्षेप करीत असतात ते कळून घेण्यासही मदत होईल.
वाजपेयी आणि नरसिंह राव हे दोघेही मुत्सद्दी होते आणि पक्षाच्या खुज्या सीमारेषा ओलांडून व्यापक विचार करण्याचे सामथ्र्य दोघांमध्ये होते. राव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात संयुक्त राष्ट्रसंघात जम्मू-काश्मीरच्या मुद्दय़ावर भारतीय शिष्टमंडळ पाठवण्याचे ठरले असता त्याचे नेतृत्व राव यांनी बेलाशकपणे अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे दिले. त्यांच्या या उदारमतवादामुळे तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद यांच्यासारखे अलीकडचे लघुदृष्टिदोष असलेले काँग्रेसी नेते नाराज झाले होते. परंतु राव यांनी अंतर्गत असंतुष्टांची पर्वा केली नाही आणि संयुक्त राष्ट्रांत वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे प्रतिनिधित्व करण्यास राजी नसलेल्या खुर्शीद आणि अन्यांना ते करणे भाग पाडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मांडण्याचे काम वाजपेयी यांच्यासारखा नेता हा आपल्या मंत्र्यापेक्षा अधिक चांगले करेल असा विश्वास राव यांना होता आणि वाजपेयी यांनीही तो सार्थ ठरवला. टंडन यांनी मांडलेला अन्य एक मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात १९९८ साली ‘पोखरण-२’ अणुचाचण्या घडल्या. त्या वेळी भाजपवासीयांनी वाजपेयी यांच्या नेतृत्वपौरुषाचा उदो उदो करीत आधीच्या काँग्रेस सरकारांवर बोटचेपेपणाची टीका केली होती. ती अनुदार होती. याचे कारण, पंतप्रधानपदी असताना नरसिंह यांच्याकडूनच अणुचाचण्या घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू होता. ही बाब याआधीही माहीत होती. परंतु टंडन यांच्या मते राव यांनी अणुचाचण्या करू नयेत यासाठी अमेरिकेकडून त्यांच्यावर प्रत्यक्षपणे दबाव आणला जात होता. अमेरिकेचे भारतातील तत्कालीन राजदूत फ्रँक वाइज्नर या मुद्दय़ावर जरा जास्तच सक्रिय होते. इतके की ते थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून अशा चाचण्या न करण्याचा इशारा देत होते. या संदर्भात एकदा तर खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष बिल िक्लटन यांनी दूरध्वनी करून राव यांना अणुचाचण्यांचा प्रयत्न सोडून देण्याचा आग्रह केला. यातील काही भाग नवीन नाही. परंतु या साऱ्याचा अर्थ इतकाच अमेरिकेची हेरगिरी यंत्रणा त्या वेळी सक्रिय होती आणि सरकारातील बित्तंबातमी त्यांच्यापर्यंत जात होती. त्याचमुळे राव यांची अणुचाचण्या घडवून आणण्याची इच्छा अमेरिकेपर्यंत पोहोचत होती आणि त्याचमुळे भाजपचे अटलबिहारी वाजपेयी हेदेखील या चाचण्या कराव्यातच या मताचे आहेत हेदेखील अमेरिकेस कळत होते. त्याचमुळे १९९६ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर वाजपेयी यांना पंतप्रधानपद मिळू नये असेच अमेरिकेचे प्रयत्न होते. ते काही प्रमाणात यशस्वी झाले. काही प्रमाणात याचा अर्थ वाजपेयी पंतप्रधान झाले; पण औट घटकेचे. त्यांचे सरकार अल्पमतात होते आणि सर्व राजकीय पक्षांशी त्याबाबत बोलणी होऊनही एकही पक्ष वाजपेयी सरकारला पािठबा देण्यासाठी पुढे सरसावला नाही. हे असे झाले यामागे अमेरिका नसेलच असे म्हणता येणार नाही. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी वाजपेयी यांना त्या वेळी सरकार बनवण्यासाठी निमंत्रित केले. परंतु वाजपेयी यांना पािठबा देण्यास कोणीही तयार होणार नाही, याचा अंदाज चाणाक्ष राव यांना होता. त्याचमुळे वाजपेयी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सुरू असतानाच राव यांनी त्यांना एक लेखी निरोप पाठवला. तो होता : माझे अपूर्ण राहिलेले काम तुम्ही पूर्ण करावे, इतकाच. वाजपेयी यांना हे अपूर्ण काम काय आहे याचा अंदाज अर्थातच होता. त्याचमुळे त्यांनी त्याही वेळी सरकार स्थापन केल्या केल्या पहिला निर्णय घेतला तो अणुचाचण्यांना हिरवा कंदील देण्याचा. परंतु वाजपेयी यांचा पहिला पंतप्रधानावतार अवघ्या १३ दिवसांत संपला. नंतर झोपाळू देवेगौडा आणि कनवाळू इंदर कुमार गुजराल यांच्या काळात हे काही होणे शक्य नव्हते. या काळात त्यांची सरकारेदेखील टिकली नाहीत आणि अखेर १९९८ साली देशास मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागले. या वेळी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस निर्विवाद सत्ता मिळाली आणि त्या वर्षी मार्च महिन्यात सत्तेवर आलेल्या वाजपेयी यांनी दोनच महिन्यांत, ११ व १३ मे या दिवशी, अणुचाचण्या अखेर घडवून आणल्याच. हा सारा इतिहास ताजा असला तरी तो लिहिण्यात सत्ताधारी आणि विरोधक यांतील अंतर कमी झाले होते ही बाब समजून घेणे आज अधिक महत्त्वाचे आहे.
वास्तविक नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची इच्छा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही होती. तसा त्यांनी प्रयत्नदेखील केला. परंतु एव्हाना राजकारणाच्या क्षुद्रपर्वाचा आरंभ झालेला असल्यामुळे काँग्रेसजनांनी सिंग यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. खरे तर याच राव यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात मोरारजी देसाई यांना भारतरत्नाने गौरवले होते. देसाई हे पहिले बिगरकाँग्रेसी सरकारचे पंतप्रधान. पण म्हणून त्यांना भारतरत्न नाकारण्याचा संकुचितपणा दाखवावा असे जातिवंत काँग्रेसी नरसिंह राव यांना वाटले नाही, हे निश्चितच कौतुकास्पद. या पाश्र्वभूमीवर आता तेलुगू देसमने नरसिंह राव यांचे उचित स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यास सत्ताधारी भाजपचा पािठबा आहे. हे स्मारक व्हायला हवे. कारण राव हे काही फक्त आंध्रपुरतेच मर्यादित नव्हते. देशात आíथक उदारीकरणाचे वारे वाहू द्यावेत यासाठी अर्थव्यवस्थेची कवाडे उघडण्याची िहमत त्यांनीच दाखवली, याकडे दुर्लक्ष करणे कृतघ्नपणाचे ठरेल. असा कृतघ्नपणा सध्याचे काँग्रेसजन दाखवत असले तरी पक्षीय चौकटींच्या मर्यादा बाजूला ठेवून राव यांचा गौरव व्हायला हवा. राजकारणातही औदार्य हवे.
या स्मारकाच्या वृत्ताने मनापासून आनंद वाटेल तो अटलबिहारी वाजपेयी यांनाच. वाजपेयी कवी आहेत. स्मृतीने दगा न दिल्यास राव यांच्या स्मारकाचे वृत्त ऐकून त्यांना गुलझारजींच्या कवितेची एक ओळ तरी नक्कीच आठवेल..
मेरा कुछ सामान,
तुम्हारे पास पडा है.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा