बॅडमिंटन खेळात आज चीनने मिळविलेल्या वर्चस्वात खेळाडूंची गुणवत्ता या मुख्य कारणाबरोबरच चीन सरकारचे डावपेचही महत्त्वाची भूमिका बजावतात. दक्षिण कोरियात सध्या सुरू असलेली सुपरसीरिज हे याचे ताजे उदाहरण. चीनने या स्पर्धेत आपले सर्वोत्तम खेळाडू उतरविले. मात्र त्यातील प्रमुख पाच खेळाडूंनी पहिल्याच दिवशी दुखापतीचे कारण देऊन स्पर्धेतून माघार घेतली. या सर्वाना एकाच वेळी दुखापत कशी झाली हा प्रश्न बॅडमिंटन वर्तुळात कालपासून चर्चिला जात आहे. खेळाडूंच्या माघारीमागे दोन कारणे दिली जातात. ही दोन्ही कारणे क्रीडा क्षेत्रातही चीन व्यवहारवाद कसा जपतो यावर स्वच्छ प्रकाश टाकतात. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आयोजित केलेली ही स्पर्धा बॅडमिंटनमधील सर्वात श्रीमंत स्पर्धा समजली जाते. दहा लाख डॉलर्सहून अधिक रकमेची बक्षिसे स्पर्धेसाठी आहेत. म्हणजे चिनी खेळाडूंना मालामाल होण्याची चांगली संधी सेऊलमध्ये होती. कारण त्यांचा विजय जवळपास निश्चित होता. परंतु, चीनमध्ये खेळाडूंना हे स्वातंत्र्य नसते. क्रीडा मंत्रालय ठरवील त्यानुसार त्यांना वागावे लागते. बॅडमिंटनच्या लागोपाठ अनेक स्पर्धा भरवून वर्ल्ड फेडरेशन बक्कळ पैसा कमवीत असली तरी सतत खेळण्याचा ताण खेळाडूंवर पडतो. सतत खेळत राहिल्यामुळे खेळाडूंची कारकीर्द अचानक उतरणीला लागते. स्पर्धाचा हा कार्यक्रम आम्हाला मान्य नाही, याची जाणीव फेडरेशनला करून देण्यासाठी चीनने आपल्या खेळाडूंना माघार घेण्यास सांगितले, असे सांगितले जाते. संघटनेच्या नियमाप्रमाणे खेळाडूंनी आयत्या वेळी नकार दिल्यास त्याला जबर दंड ठोठावला जातो. हा दंड टाळण्यासाठी चीनचे खेळाडू स्पर्धेत उतरले आणि त्यांनी माघार घेतली. फेडरेशनचे अप्रत्यक्षपणे कान टोचण्याचा हा प्रकार होता. दुसरे कारण आणखी महत्त्वाचे आहे. कोरियातील स्पर्धा पैशाने मोठी असली तरी तिला अद्याप प्रतिष्ठा मिळालेली नाही. यापेक्षा लवकरच होऊ घातलेल्या ‘ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप’कडे चीनचे अधिक लक्ष आहे. त्या स्पर्धेतील पाचही विभागांमध्ये अग्रस्थान पटकाविण्याची महत्त्वाकांक्षा चीन संघाने बाळगली असल्याने कोरियातील स्पर्धेमध्ये खेळाडूंची शक्ती वाया घालविणे चीनला मंजूर नाही. पैशापेक्षा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदके हस्तगत करण्याला चीन सरकार प्राधान्य देते. एकदा उद्दिष्ट निश्चित झाले की ते साध्य करण्यासाठी सर्व मार्गानी प्रयत्न करणे हे चीनचे वैशिष्टय़ खेळामध्येही दिसून येते. याउलट स्थिती आपल्याकडे आहे. भारतामध्ये क्रिकेट अति झाले आहे व पाठोपाठ होणाऱ्या स्पर्धामुळे क्रिकेटपटू बेजार झाले आहेत. तरी स्पर्धाची संख्या कमी करण्यास ‘बीसीसीआय’ तयार नाही. महत्त्वाच्या स्पर्धाआधी खेळाडूंना विश्रांती द्यावी असे बीसीसीआयला वाटत नाही. पाकिस्तानबरोबरच्या सामन्यांना वेगळे महत्त्व होते. या सामन्यांसाठी काही खेळाडूंना विश्रांती देऊन पूर्ण तयारीने स्पर्धेत उतरावे हे बीसीसीआयला सुचले नाही. थकलेल्या भारतीय संघावर पाकिस्तानने सहज मात केली. खेळात चीन अधूनमधून वर्चस्व दाखवीत नाही, तर वर्चस्व प्रस्थापित करतो. याउलट खेळाडूंमध्ये गुणवत्ता असूनही क्रिकेटसह अन्य खेळांत भारत अधूनमधून चमकदार कामगिरी करून दाखवितो. देशाची प्रतिमा घडविण्यात खेळातील विजय महत्त्वाचे असतात, हे चीनला माहीत असल्याने खेळाडूंना घडविण्याबरोबर स्पर्धाच्या कार्यक्रमांकडेही तेथील सरकार काळजीपूर्वक लक्ष देते, तर भारतात केवळ पैसे कमविण्याचे साधन म्हणून खेळाडूंकडे पाहिले जाते.
बॅडमिंटनमधील चिनी नीती
बॅडमिंटन खेळात आज चीनने मिळविलेल्या वर्चस्वात खेळाडूंची गुणवत्ता या मुख्य कारणाबरोबरच चीन सरकारचे डावपेचही महत्त्वाची भूमिका बजावतात. दक्षिण कोरियात सध्या सुरू असलेली सुपरसीरिज हे याचे ताजे उदाहरण.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-01-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaina ethics in badmington