भविष्यात मंगळावर ताबा सांगण्याचा, आजवर केवळ आपल्यालाच तापदायक ठरणारा चिनी कांगावा आता मंगळालाही तापदायक ठरेल, अशी भीती मनात डोकावते आहे..
राशिचक्रात गुरफटून राहणे किंवा ग्रहदशांचा धांडोळा घेत बसणे हा अलीकडच्या, यंत्रयुगाच्याही पुढे गेलेल्या डिजिटल युगाच्या काळातही, रिकामटेकडय़ांपुरताच मर्यादित उद्योग राहिलेला नाही. ग्रहदशांचा धांडोळा घेत पीडास्थानात ठाण मांडून बसलेल्या ग्रहांचा त्रास शमवून त्या ग्रहांना वठणीवर आणण्याचे उपाय आपल्या शास्त्राला अनादी कालापासून अवगत असले तरी काही ग्रह मात्र, त्यांचा पीडाकाल पूर्ण करेपर्यंत हटवादीपणाने कुंडलीतील मोक्याच्या जागेवर ठाण मांडून बसलेले असतात. चीन हा देशाच्या कुंडलीतील असा एक पीडादायक ग्रह आणखी तापदायक होऊ लागला असतानाच, दीर्घकालीन भविष्यात हा ग्रह देशाच्या कुंडलीतून ‘मंगळस्थानी’ स्थलांतरित होण्याची चिन्हे आता आता कुठे उमटू लागली आहेत. वर्तमानात ही चिन्हे तशी अगदीच धूसर आहेत. या भविष्याला ज्योतिषीय आधार नाही, पण कल्पनाशक्तीचा मात्र भक्कम आधार आहे.  पृथ्वीच्या कक्षेपासून कित्येक दशलक्ष प्रकाशमैलांवरचा हा ग्रह कागदावरच्या कुंडलीत येऊन बसला, की भौतिक अंतराचा प्रकाशवर्षीय कालखंडदेखील पुसून वर्तमानातील जगण्याच्या प्रत्येक क्षणाला चिकटून राहतो, आणि तेव्हा मात्र नकोसा  होतो. ही एक बाजू असली, तरी मंगळ आणि अमंगळाच्या कल्पना वास्तवात विचारात घेताना मंगळाचे अस्तित्व मात्र अजूनही निखळपणे स्वीकारले जाते. असा हा कधी तापदायक, कधी अमंगळाचे अस्तित्व पुसून टाकणारा मंगळ आता मात्र, स्वत:च एका वेगळ्या नव्या पीडेच्या गर्तेत सापडणार असे भविष्य आमच्यासारख्याने केवळ कल्पनाशक्तीच्या आधारावर वर्तविले, तर त्यावर आजच्या घडीला कुणाचाच विश्वास बसणार नाही, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तरीही, ही भविष्यवाणी, म्हणजे, ‘पांढऱ्यावर काळे, करोनि ठेवावे’ हे आम्ही आमचे सामाजिक जाणिवेतून जन्माला आलेले नैतिक कर्तव्य समजतो.
चीन नावाचा हा तापग्रह आपल्या देशाच्या कुंडलीतील पीडास्थानास कित्येक वर्षांपासून चिकटून राहिलेला आहे. हा ग्रह निरभ्र आकाशात संथपणे लुकलुकणाऱ्या मंद मंगळासारखा भासू लागतो, तेव्हा आपण त्याच्यावर भाळून गळ्यात गळेही घालतो, आणि कधी हा ग्रह पीडास्थानावर उच्चीचा होतो, तेव्हा त्याने गळा कापल्याची जाणीव आपल्याला अस्वस्थ करू लागते. अशी वेळ ओढवली की, आपली, म्हणजे आपल्या सरकारसकट सर्वाची मानसिक अवस्था काहीशी सैरभैर होऊ लागते. कुंडलीतल्या तापदायक स्थानात दामटून बसणाऱ्या ग्रहाचे बळ वाढते, तेव्हा माणसाची अवस्थाही अशीच होते असे म्हणतात. या ग्रहाची तापदशा तीव्र झाली, की अशा स्थितीला कसे सामोरे जावे आणि ओढवलेल्या संकटातून कसा मार्ग काढावा हेच सुचेनासे होते. मग कधी धोरणात्मक पद्धतीने, तर कधी वैचारिक मुत्सद्दीपणाने या स्थितीवर मात करण्याच्या प्रयत्नात, नेमके काय करावे याचाच संभ्रम वाढू लागतो आणि ही तात्पुरती, त्या स्थानापुरती आणि फारशी दखलपात्र चिंता नाही अशी मनाची समजूत काढत आपण परिस्थितीवर मात केल्याचा आविर्भाव आणत राहतो. हा झाला, व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहतापापुरता विषय. गेल्या काही दिवसांपासून चीनची वसाहतवादाची हटवादी वासना भारताचा भूभाग असलेल्या लडाखच्या उत्तरेकडील भूभागावर केंद्रित झाली आहे, हा आपल्या चिंतेचा विषय आहे. पण काही परिस्थितींत साम्य असते. कुंडलीतील पीडास्थानावर बसलेला तापग्रह आणि देशाच्या पीडास्थानावर बसलेला चीनसारखा हटवादी ग्रह यांमुळे निर्माण होणारी परिस्थिती जवळपास सारखीच असल्याने, यातून दिलासादायक मार्ग काढण्यासाठी भविष्याचा धांडोळा घेत उपायांचे आडाखे बांधावे लागतात. असा भविष्याचा वेध घेण्याचे निराधार उद्योग करताना ही दिलासादायक बातमी सापडली, आणि चीन नावाच्या पीडादायक ग्रहापासून मुक्ती मिळाल्याच्या रम्य भवितव्याचे चित्र समोर तरळू लागले. जिथे माणसांचा वावरही नाही, अशा जमिनीवरही डोळा ठेवण्याच्या चीनच्या वृत्तीला नववसाहतवादाची किनार आहे. म्हणूनच, मिळेल त्या मार्गाने घुसखोरी करण्याचा चिनी चंग आता भारतात लपून राहिलेला नाही.  चीनच्या वसाहतवादाची हटवादी वासना आणखी फोफावली असून, वखवखलेला हा वसाहतवाद आता अवकाशालाही पीडादायक ठरणार असे या भविष्यवेधात दिसू लागले आहे. अवकाशाच्या कुंडलीतील ही पीडा इतकी तीव्र असेल, की कागदावरच्या कुंडलीत पीडास्थानावर असलेल्या मंगळाच्या कुंडलीलाही चीन नावाचा ग्रह तापदायक ठरेल की काय, असे वाटू लागले आहे.
मंगळ हा पृथ्वीच्या जनजीवनाशी जवळीक साधणारा अवकाशातील एकमेव ग्रह असावा, असे संकेत अलीकडच्या मंगळवाऱ्यांमधून मिळू लागताच, चिनी वसाहतवादाची नजर मंगळावर पोहोचली आहे. ही बातमी दोन-चार दिवसांपूर्वी दिसली, तेव्हाच आम्ही अवकाशाच्या कुंडलीचे ग्रहमान तपासण्याचे उद्योग सुरू केले. या कुडमुडय़ा भविष्यवाणीचाही तोच आधार आहे, हेही स्पष्ट करणे आवश्यक आहे. मंगळावर मानवी वस्ती शक्य आहे, असे समजताच, जवळपास सहाशे चिन्यांनी मंगळावर कायमचे स्थलांतरित होण्याची तयारी चालविली आहे. तसे झाले, तर इथे पीडादायक ठरणारा हा ग्रह, प्रत्यक्ष मंगळालाही तापदायक ठरणार अशी भीती वाटू लागली आहे. मुळात, लोकसंख्येच्या विस्फोटामुळे केलेल्या उपाययोजनांचा उफराटा परिणाम भोगणाऱ्या चीनमध्ये भविष्यात तरुणांची संख्या कमी आणि वृद्धांची लोकसंख्या मोठी असे चित्र दिसणार आहे. हे भविष्य नाही, तर वर्तमानच आहे. अशाही स्थितीत महासत्तेचा माज मिरविणाऱ्या चीनची नवी पिढी देशांतरच नव्हे, तर विश्वांतर करण्याची तयारी दाखवून मंगळावर स्थलांतरित होणार असेल, तर निदान भारताच्या महासत्तेच्या वाटचालीतील एक अडसर तरी दुबळा होण्याचा मानसिक दिलासा एवढाच अर्थ या बातमीतून सध्या दिसतो. कारण, दुसरा अर्थ आपल्यासाठी अधिक मनस्तापदायक असू शकतो. आपल्या वसाहतवादाच्या हटवादातून अवकाशालाही न वगळण्याची चिनी मनोवृत्ती पुढच्या पिढीत किती बळावली आहे, याचेच संकेत या बातमीतून झिरपत असल्याचे जाणवते आहे. मंगळावर कायमचे वास्तव्यासाठी जाण्याच्या डच मोहिमेत नावनोंदणी करून व तेथे स्थलांतरही करून भविष्यात मंगळावर ताबा सांगण्याचा, आजवर केवळ आपल्यालाच तापदायक ठरणारा चिनी कांगावा आता मंगळालाही तापदायक ठरेल, अशी भीती मनात डोकावते आहे. चिनी लोकांची ही मंगळ-वारी मंगळाच्या कुंडलीत अमंगळ न ठरो. भले त्यासाठी ग्रहशांती करावी लागली तरी बेहत्तर!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा