सद्गुरूने जवळ केल्यावर आणि त्यांच्याकडून सत्याचं ज्ञान झाल्यावर ते आपल्यात पक्कं मुरल्याशिवाय आणि आचरणात आल्याशिवाय दुसऱ्याला सांगण्याची ऊर्मी घातक आहे, हाच तुकाराममहाराजांचा सांगावा आहे. जेव्हा ते ज्ञान आचरणात येईल तेव्हा ते आपल्या कृतीतूनच प्रकटेल, ते सांगण्याची इच्छा उरणार नाही. श्रीगोंदवलेकर महाराज यांनीही ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘संतांजवळ राहणाऱ्या लोकांना तीन तोटे आणि तीन फायदे असतात. त्यापैकी तोटे असे की- एक वेदान्त बोलायला तेवढा उत्तम येतो, दोन संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो, तीन म्हणजे ‘ते सर्व पाहून घेतील’, या खोटय़ा भावनेने हा वाटेल तसा वागतो.’’ आता फायदे कोणते, हे नंतर पाहू. तेव्हा सद्गुरूंजवळ राहणाऱ्याचा सर्वात पहिला तोटा म्हणजे वेदान्त बोलायला उत्तम येतो आणि बोलण्यापुरताच राहतो. दुसरा तोटा म्हणजे मान फुकटचा आणि सहज मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे सद्गुरूच्या शक्तीची प्रचीती आल्याने साधक बेफिकीर होतो आणि करू नये त्या गोष्टीही करतो. अर्थात जे ज्ञान प्रचितीचे नाही ते बोलल्याने मिळणाऱ्या मानाने शेफारून तो स्वत:लाच सर्वज्ञानी मानू लागतो. आता फायदे बघू. श्रीमहाराज सांगतात, ‘‘पहिला फायदा म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढय़ानेच काही साधन न करतासुद्धा त्याला परमार्थ साधेल. दुसरी गोष्ट, त्याला मान मिळेल, पण तो स्वत: मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील आणि तिसरा फायदा म्हणजे वेदान्त त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल. म्हणून संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे. मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदान्त बोलू नये. तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे.’’ (प्रवचन, १६ एप्रिल). सद्गुरूंच्या चरणी आश्रय मिळाला तरीही त्यांच्या चरणी भाव दृढ होण्यासाठीचा हा मार्गच जणू महाराज सांगत आहेत. खऱ्या भावानं जो त्यांच्या बोधात राहील त्याला अन्य काही साधन नाही, त्याला मान मिळेलही, पण त्याला त्याची जाणीवही नसेल तर अपेक्षेचाही प्रश्नच नाही आणि ज्ञानाची चर्चा त्याला करता येणार नाही पण त्याच्या कृतीतून ज्ञानच प्रकटेल. तेव्हा हे भावबळ आवश्यक आहे. एकनाथी भागवतातही भक्तिभावाचं मोल सांगताना म्हटलं आहे की, ‘‘येथें धरितां पुरे भावो। तै बुडणेंचि होय वावो। मग ठाकावा जो ठाव। तो स्वयमेव आपण होय।। येथें पोहणेयावीण तरणें। प्रयासेंवीण प्राप्ती घेणें। सुखोपायें ब्रह्म पावणें। यालागी नारायणे प्रकाशिली भक्ती।।’’ सद्गुरूंनी भक्तीचा मार्ग प्रकाशित केला आहे. त्या मार्गाने पूर्ण भावानिशी गेल्यावर भवसागरात बुडण्याची भीती उरतच नाही उलट भावसागरात भक्त पूर्ण बुडून जातो. मग जे मिळवायचं ते परमसुख आपल्याच अंतरंगात गवसतं. न पोहता तरून जाता येतं, आटापिटा न करता परमप्राप्ती होते आणि सहज उपायांनी परमरसात मग्न होता येतं. म्हणूनच तुकाराममहाराजही सांगतात, नारायणें दिला वसतीस ठाव। ठेवूनियां भाव ठेलों पायीं।।

 

Story img Loader