देहानं जगात राहूनही मनानं त्यापासून विलग होत भगवंताशी केंद्रित होण्यासाठी साधन आहे ते ‘नाम’. श्रीसद्गुरूंनी सांगितलेली साधना, केलेला बोध. आज त्या नामाशी मन तादात्म्य पावत नाही म्हणून ते हट्टानं करायला पाहिजे. हा ‘हठयोग’ साधत नाही तोवर नामाचा सहवास वाढणार नाही. सहवास वाढला की तादात्म्य येईल. असं पाहा, पाळण्यात असताना आई मुलाच्या कानी त्याचं नाव सांगते. त्या नावाची निवड काही त्या मुलानं केली नसते. तरी त्या नावाच्या सहवासानं कशी अभिन्नता येते! आपलं नाव आणि आपण यांच्यात किती समरसता असते. तेव्हा भगवंताच्या नामाच्या सहवासानं त्याच्याशी एकलय साधेल, असा संतांचा सांगावा आहे. या नामचिंतनानं हळूहळू पूर्ण चिंतन साधेल. आपण एखाद्याचं नाव उच्चारतो तेव्हा त्याच्याविषयीच्या भावना, कल्पना, धारणा आपल्या मनात तत्क्षणी प्रकटतात. त्याच्या आठवणीही मनात चमकतात. सामान्य माणसाची ही कथा तर भगवंताच्या नामाबरोबर भगवंताची धारणा, भावना, कल्पना, लीलाप्रसंगाचं स्मरण का साधणार नाही? या चिंतनानं काय होईल? समर्थ रामदास सांगतात- ‘‘नभासारिखें रूप या राघवाचे। मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें। तया पाहतां देहबुद्धी उरेना। सदासर्वदा आर्त पोटी उरेना।।’’ (मनाचे श्लोक, ओवी १९७). आकाश कसं असतं? ते व्यापक असतं. निराकार असतं. त्यात कधी मेघांची दाटी होते. कधी चांदण्यांचा सडा पडतो. कधी ढग झंझावाती वेगानं वाहताना भयकारी भासतात. कधी आकाशात एखादी चांदणीदेखील नसते. या प्रत्येक स्थितीत आकाश मात्र स्थिर असतं, अविचल असतं, अलिप्त असतं. परमात्म्याचं खरं रूप असंच आहे. त्याचं चिंतन करणारं मनही हळूहळू व्यापक होत जाईल. संकुचित ‘मी’पणामुळे भवाचं झाड बहरलं आहे. त्याच्या मुळावर घाव न घालता त्याच्या फांद्या कितीही छाटल्या तरी त्या झाडाचं बहरणं थांबणार नाही. राघवाच्या चिंतनानं मात्र त्या भववृक्षाची मुळं तटतटा तुटू लागतील. नुसत्या चिंतनानं ही प्रक्रिया सुरू होईल. मग त्याला प्रत्यक्ष पाहू लागलो, त्याचं नित्यदर्शन साधू लागलं, त्याचा नित्य सहवास लाभत गेला तर देहबुद्धी उरणार नाही आणि भगवंताविषयी आर्त उत्पन्न होईल. त्याच्याविषयी आर्त उत्पन्न झालं तर? मग जगाविषयीच्या आर्तानं, जगाच्या तळमळीनं अतृप्तच राहात असलेला जीव भगवंताविषयी आर्त उत्पन्न झालं, तळमळ निर्माण झाली तर पूर्णतृप्त होईल! भगवंताविषयी आर्त उत्पन्न करून त्याची भेट घडवून देणारा हा परमार्थाचा मार्ग आहे. हा परमार्थ म्हणजे काय? श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ आहे’’ (प्रवचने- ३ जून : परमार्थ कसा साधेल?). आता या वाक्याचा क्रम उलट केला तर तो परमार्थाच्या पहिल्या टप्प्याचा पूर्ण प्रवास सांगतो. ‘अंतर्यामी स्थिर होणे’ हे या टप्प्याचे शिखर आहे तर या वाटचालीची सुरुवात ‘दगदग सोडणे’ ही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा