आरंभशूरपणा आणि दिखाव्याची हौस, हे दुर्गुण आपल्यात फार पटकन आणि खोलवर रुजतात. नेम आणि उपासनेकडे आपण प्रथम त्याच वृत्तीने पाहतो. आपण जप करतो म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी विशेष आहोत, चांगले आहोत, हा सात्त्विक अहंकार तर फार वेगानं उत्पन्न होतो. श्रीमहाराजांनी अगदी थोडा नेम सांगितला. काय नेम सांगितला? ‘नाम जपा श्वासोच्छ्वास.’ प्रत्येक श्वासात नाम जपा. आता श्वासोच्छ्वासाची क्रिया आपण प्रयत्नपूर्वक, लक्षपूर्वक ‘करतो’ की ती आपोआप ‘होत असते’? आपण श्वास घेत आहोत आणि सोडत आहोत, हे आपण लोकांना जाणवून द्यायचा प्रयत्न करतो का? त्याची जाहिरात किंवा घोषणा करतो का? श्वासोच्छ्वासाची क्रिया करण्याआधी आपण काही वातावरणनिर्मिती, नेपथ्यरचना करतो का? आसन वगैरे शिकतो का? सकाळी तासभर आणि संध्याकाळी तासभर एवढा वेळ काही झालं तरी मी श्वासोच्छ्वास करतोच, अशी विभागणी आपण करतो का? नाही! तेव्हा श्वासोच्छ्वास जसा सहज होतो, क्षणोक्षणी होतो, आपल्यापुरता आपल्यातच सुरू असतो तसा जप घडू द्या! किती थोडा आणि किती सूक्ष्म नेम! पण आपण तो ‘फार’ करतो. त्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत देहबुद्धीची थोडीतरी चव असतेच असते. ती नामात आणण्याचा आपला व्यर्थ आटापिटा असतो. त्यातून सदोदित नाम जपा, हा नेम सोडून मी त्याचा पसारा मांडू पाहतो. ‘अमुक माळा झाल्याशिवाय मी पाण्याचा थेंबही पित नाही,’ ‘मी जपानंतर तासभर तरी मौनात राहतो,’ ‘ध्यानाला बसल्यावर त्यांच्याजवळ कुणीही फिरकलेलं त्यांना आवडत नाही’.. अशी सगळी या ‘फार’ नेमाची दृश्य रूपं झाली. जो उपासनेला बसला तो तपोबलाने आपलं आसन घेईल, ही तर इंद्राला सदोदितची भीती! उपासनेनं देहबुद्धी मंदावत नष्ट होते आणि देह हेच तर इंद्रियसुखांचं आसन! ते आसन टिकविण्यासाठी इंद्रियं मग विकारांच्या आधारानं धिंगाणा न घालतील तरच नवल. काम हा विकार आहे. हजारो वर्षांच्या तपश्चर्येचा मेनकेच्या काममोहानं भंग झाला. क्रोध हा विकार आहे. हजारो वर्षांच्या तपश्चर्येचा कुणाला तरी शाप द्यावा, इतपत क्रोध आल्याने भंग झाला. हजारो र्वष तप करणाऱ्यांची ही गत तर मग आपली गत काय वर्णावी? तेव्हा ‘सदोदित नाम घ्या’ हे न करता ‘फार नेम’ करू लागलो तर तोंडघशी पडणं आलंच. आता याचा अर्थ मौनाचे, जप झाल्याशिवाय काहीही न खाण्याबिण्याचे वगैरे नियम करू नयेत का? तर अवश्य करावेत पण ते आपल्यापुरते, स्वयंशिस्तीपुरते असावेत. ‘मौन पाळायचं आहे,’ हे स्वतला माहीत असावं. अशा मौनात जरुरीपुरतं दुसऱ्याशी बोलायलाही हरकत नाही. तेव्हा जरुरीपुरतं बोलावं पण जरुरीशिवाय बोलण्याची आपल्यात खरं तर किती उबळ असते, याचंही निरीक्षण करावं! उपासना जसजशी वाढेल तसतसे विकारही उफाळतील आणि त्याला श्रीमहाराजांनी ‘नाम म्हणजे विकारांना नोटीस आहे,’ असं म्हंटलं आहे पण त्याबद्दल ओघानं नंतर विचार करू.
२२. तपोभंग
आरंभशूरपणा आणि दिखाव्याची हौस, हे दुर्गुण आपल्यात फार पटकन आणि खोलवर रुजतात. नेम आणि उपासनेकडे आपण प्रथम त्याच वृत्तीने पाहतो. आपण जप करतो म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी विशेष आहोत, चांगले आहोत, हा सात्त्विक अहंकार तर फार वेगानं उत्पन्न होतो. श्रीमहाराजांनी अगदी …
First published on: 30-01-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 22 distrubance