बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण नवमी (रविवार, २१ डिसेंबर १९१३) श्रीमहाराजांनी अगदी सूचकपणे निरवानिरव केली. सकाळी दहा वाजता श्रीमहाराज खोलीत जरा पडले तोच बाहेर अंताजीपंत आणि काका फडके यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. तेव्हा दोघांना खोलीत बोलावून महाराजांनी समजावलं. काका म्हणाले, ‘‘महाराज, पहा आपण नसलात म्हणजे असं होतं.’’ महाराज गमतीनं बोलल्यागत हसून म्हणाले, ‘‘काका, पण उद्या सकाळी मी इथं कुठं आहे? आपण रामाच्या घरी आहोत हे न विसरता जे असेल ते गोड करून घ्यावं. भांडणतंटा करू नये.’’ संध्याकाळी श्रीमहाराज गायीच्या गोठय़ाकडे गेले. गोठय़ात तेव्हा पाऊणशे गायीगुरं होती. अभ्यंकर म्हणून एक भक्त त्यांची देखभाल करीत असत. गायींकडे ममतेनं पाहून महाराज तिथेच काही वेळ विसावले. निघताना त्यांनी आपल्या खडावा अभ्यंकरांकडे दिल्या आणि म्हणाले, ‘‘ही जागा फार छान आहे. मी इथेच राहीन. मी येईपर्यंत या खडावा सांभाळून ठेवा.’’ (याच जागी आज समाधीमंदिर उभं आहे..) अंधार पडला तसे महाराज मंदिरात परतले. त्यांच्या प्रकृतीस आराम पडत नाही तोवर उपास करायचा संकल्प आप्पा जरंडीकर यांनी सोडला होता. त्यांना महाराज म्हणाले, ‘‘आप्पा, उद्या मला बरं वाटेल! ’’ त्यांनी आग्रह करून आप्पाला जेवायला बसवलं. रात्री नऊ वाजता सर्व मंदिर स्त्री-पुरुषांनी भरून गेलं. सुरुवातीला महाराज पायाची सूज सांभाळत एकेका पायावर उभं राहात प्रेमसंवाद साधत होते. रात्री दहानंतर एका जागी उभं राहून त्यांनी आपल्या आयुष्यातलं अखेरचं भजन व निरूपण सुरू केलं. उभं राहण्याचे विलक्षण कष्ट होत असतानाही महाराज कळकळीनं गात होते आणि बोलत होते. श्रीमहाराजांनी एक-एक करीत निर्वाणीचे पाच अभंग म्हटले आणि त्यातून अखेरचा बोध सांगितला. पहिल्या अभंगात, आता मला निरोप दे, अशी आळवणी रामरायाकडे केली. दुसऱ्या अभंगात आपल्या माणसांना त्यांनी नामाचं महत्त्व सांगितलं. नामसाधना हीन मानू नका, असार अशा दृश्य संसारात अडकू नका, आयुष्याचा नेम नाही तेव्हा नामाचा नेम सोडू नका, असं त्यांनी कळवळून सांगितलं. तिसऱ्या अभंगात आता आयुष्य संपत असून पुन्हा येणं नाही, असं सांगून रामरायाची अनुमती मागितली. चौथ्या अभंगातून सर्व लहानथोरांना नमस्कार करीत त्यांच्याकडे जाण्याची अनुमती मागितली. प्रत्येक अभंगागणिक प्रत्येकाचं अंत:करण पिळवटून निघत होतं. रात्रीचा दीड वाजला आणि श्रीमहाराजांनी सर्वाना प्रेमभरानं नमस्कार केला. सर्वाकडे वात्सल्यानं पाहत धीरगंभीर स्वरात महाराज गाऊ लागले.. भजनाचा शेवट आला। एकवेळ राम बोला।।१।। आजिं पुण्य पर्वकाळ। पुन: नाहीं ऐसी वेळ।।२।। रामनाम वाचें बोला। आत्मसुखामाजीं डोला।।३।। दीनदास सांगें निका। रामनाम स्वामी शिक्का।।४।। जो-तो महाराजांना डोळ्यांत साठवू पाहत होता. डोळ्यांना साक्षात दिसणारा हा अखेरचा साक्षात्कार आहे, हे कुणाला माहीत होतं?
२५२. भजनाचा शेवट आला..
बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण नवमी (रविवार, २१ डिसेंबर १९१३) श्रीमहाराजांनी अगदी सूचकपणे निरवानिरव केली.
आणखी वाचा
First published on: 26-12-2013 at 04:07 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 252 prayer end time