विषय आणि असते तेथे वासनांच्या ओढीने आपण प्रपंचात गुंतून असतो. त्या विषयवासनांची पूर्ती कधीच होत नाही. गुळवणी महाराजांचे शिष्य के. रा. जोशी यांच्या ‘गोष्टीरूप वेदांत’ पुस्तकात एक कथा आहे. एक सम्राट होता. तो स्वतला दानशूरही समजत होता. एकदा भल्या सकाळी त्याच्या दारी एक साधू येऊन उभा ठाकला. त्याला पाहताच सम्राट म्हणाला, ‘‘साधूमहाराज सकाळीच आपलं दर्शन झालं. ही मोठय़ा भाग्याची गोष्ट आहे. सांगा बरं, मी आपली काय सेवा करू? आपली जी इच्छा असेल ती मी पूर्ण करीन.’’ साधूमहाराज हसले. त्यांच्या हातात एक लहानसा कटोरा होता. तो पुढे करीत ते म्हणाले, ‘‘माझे हे भिक्षापात्र भरून आपण मला भिक्षा घालावीत, एवढीच माझी इच्छा आहे. बाकी काही नाही.’’ सम्राटाने त्या पात्राकडे तुच्छ कटाक्ष टाकला. त्याला वाटलं, द्यायचंच आहे आणि तेही इतकंसंच तर सोन्याच्या मोहराच का देऊ नयेत? त्यानं तात्काळ आज्ञा केली, ‘‘महाराजांचा कटोरा सोन्याच्या नाण्यांनी भरून द्या.’’ तेथे हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने या आदेशाची अंमलबजावणी केली पण चमत्कारच घडला. कटोरा सोन्याच्या नाण्यांनी भरला आणि क्षणार्धात त्यातील सोन्याच्या मुद्रा नाहीशाच झाल्या! राजा चक्रावला. पण त्याला वाटलं, महाराज माझी परीक्षा घेत आहेत. तेव्हा अजून नाणी द्यावीत. त्यानं आदेश दिला. पात्र पुन्हा भरलं गेलं. पुन्हा तितक्याच झपाटय़ानं रितंही झालं. राजा मग इरेला पेटला. पुन्हा पुन्हा तो सोन्याच्या नाण्यांनी कटोरा भरू लागला आणि पुन्हा पुन्हा तो रिकामा होऊ लागला. सम्राटानं मनाशी चंग बांधला. माझे राज्य लुटले गेले तरी चालेल पण मी हा कटोरा भरणारच! पण सर्व खजिना रिता होऊ लागला तसा सम्राट घाबरला. त्याचा वजीर हळूच जवळ येऊन कानात म्हणाला, ‘‘महाराज हे साधूमहाराज म्हणजे काळी जादू करणारे सैतानच असावेत.’’ साधूमहाराज हसून म्हणाले, ‘‘मी कोणी जादूगार नाही की सैतानही नाही. तुमच्यासारखाच साधासुधा माणूस आहे आणि हे भिक्षापात्रही जादूचं नाही. ते तुमच्यासारख्याच साध्यासुध्या माणसाच्या हृदयापासून तयार केलं आहे. माणसाचं हृदय सांसारिक गोष्टींनी कधीतरी पूर्ण भरून तृप्त होतं का? नाही! माणसाच्या आकांक्षा आणि वासनांची कधीच तृप्ती होत नाही, हेच अंतिम सत्य आहे.’’ आपल्या प्रपंचाकडे पाहिलं तरी काय दिसतं? साधूमहाराजांनी स्वतला साधासुधा माणूस म्हंटलं आणि एक सत्यच प्रकट केलं. या जगात देणारा आणि घेणारा दोघेही अतृप्तच आहेत. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणतात, ‘‘विषयवासनेचा खळगा इतका खोल आहे की तो कधी भरतच नाही. त्याने असमाधान होते व ते वाढतच जाते’’ (बोधवचन, क्र. ३९४). म्हणजे देणाऱ्याला देण्याचंही समाधान नाही, घेणाऱ्याला जे घेतलं त्याचंही समाधान नाही. देणाऱ्यालाही मनापासून द्यायची इच्छा नाही आणि घेणाऱ्याला अजून घेण्याची इच्छा असतानाही कमीच मिळालं म्हणून दुख आहे. प्रपंचातली, दुनियेतली देवघेव अशी स्वतपुरतीच आहे. दुसऱ्यासाठी नाही. म्हणूनच समाधान नाही.
५५. खळगा
विषय आणि असते तेथे वासनांच्या ओढीने आपण प्रपंचात गुंतून असतो. त्या विषयवासनांची पूर्ती कधीच होत नाही. गुळवणी महाराजांचे शिष्य के. रा. जोशी यांच्या ‘गोष्टीरूप वेदांत’ पुस्तकात एक कथा आहे. एक सम्राट होता. तो स्वतला दानशूरही समजत होता. एकदा भल्या सकाळी त्याच्या दारी एक साधू येऊन उभा ठाकला. त्याला पाहताच सम्राट म्हणाला, ‘‘साधूमहाराज सकाळीच आपलं दर्शन झालं.
First published on: 19-03-2013 at 04:45 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 55 depression