पशुपक्ष्यांनाही मन आणि बुद्धी आहे. पण स्वरक्षण आणि स्वपोषण इतपतच त्यांची झेप आहे. माणसाला मात्र मन आणि बुद्धीचं दान मोठं आहे. त्यामुळे विचारक्षमता, भावनाशीलता, कल्पनाक्षमता अशा अनेक क्षमता जशा त्याला लाभल्या आहेत तसेच अविचार, अवास्तव कल्पना, संकुचित भावना, दुराग्रह असे अनेकानेक सापळेही त्यानंच निर्माण केले आहेत. जोवर माणूस या मोहजन्य, भ्रमजन्य सापळ्यांत अडकून आहे तोवर तो परतंत्रच राहाणार. तो विकार, वासनांचा गुलामच राहाणार. त्यातून बाहेर पडायचं तर खऱ्या समर्थ आधाराची गरज आहे. आपल्यालाही जगताना आधार लागतोच. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘आधाराशिवाय कोणी जगू शकत नाही यांतच माणसाची अपूर्णता आहे. आधार नको असलेला पूर्ण असा एक भगवंतच आहे. आधार हा देहापेक्षा मनाचाच आहे.’’ (बोधवचने, अनुक्रमांक २३९) या एका वाक्यात माणसाला आधाराची गरज का आहे आणि खरा कोणता आधार त्यानं घ्यावा, हे श्रीमहाराज स्पष्ट सांगतात. माणूस अपूर्ण आहे त्यामुळेच त्याला आधाराची गरज आहे. आपल्यातील अपूर्णतेवर आधाराने मात करून पूर्णत्व मिळवता येईल, या हेतूनंच माणूस आधार शोधत असतो आणि टिकवत असतो. थोडं सूक्ष्म निरीक्षण केलं तर जाणवेल की आपल्यापेक्षा वैचारिक, सामाजिक, सांपत्तिकदृष्टय़ा वरचढ असलेल्याच माणसाचा आधार घेण्यासाठी आपण धडपडत असतो. त्या आधारानं आपल्यात जी त्रुटी आहे तिच्यावर मात करता येईल, असं आपल्याला वाटत असतं. पण कितीही अपूर्ण आधार गोळा केले तरी त्यातून पूर्ण समाधान मिळू शकत नाही. जो पूर्ण आहे, स्वतंत्र आहे, शाश्वत आहे, स्थिर आहे अशा एका भगवंताच्याच आधाराने मला पूर्णत्व, स्वातंत्र्य, शाश्वती आणि स्थैर्य लाभू शकतं. तो आधार घ्यायला श्रीमहाराज सांगत आहेत. श्रीमहाराज सांगतात, ‘अर्जुनानं भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे त्याचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही.’ महाभारताचं युद्ध सुरू होण्याआधी दुर्योधन आणि अर्जुन योगायोगानं एकाच वेळी श्रीकृष्णांकडे गेले. त्याचं साह्य़ मागावं, हा त्यांचा हेतू होता. श्रीकृष्णानं सांगितलं, मी आणि माझं सैन्य, या दोहोंतली निवड तुम्हाला करावी लागेल. दुर्योधना तू प्रथम आलास तेव्हा पहिली संधी तुला. दुर्योधनानं विचार केला, कृष्ण एकटाच आहे. सैन्य तर हजारो सैनिकांचं. एकाची शक्ती मोठी की हजारांची? तेव्हा त्या हजारांनाच मागून घ्यावं. अर्जुनाला दुर्योधनाची निवड ऐकून हायसंच वाटलं. कारण त्याची निवड निव्वळ कृष्ण हीच होती. दुर्योधनाला उमगले नाही की सैन्य आपल्याच राजाविरोधात कसे लढेल? एकतर ते लढणार नाही किंवा पुऱ्या ताकदीनिशी लढू शकणार नाही. आता हे वाक्य आणि हा प्रसंग गूढ सत्य सांगतो. काय आहे त्याचं तात्पर्य?
६. आधार
पशुपक्ष्यांनाही मन आणि बुद्धी आहे. पण स्वरक्षण आणि स्वपोषण इतपतच त्यांची झेप आहे. माणसाला मात्र मन आणि बुद्धीचं दान मोठं आहे. त्यामुळे विचारक्षमता, भावनाशीलता, कल्पनाक्षमता अशा अनेक क्षमता जशा त्याला लाभल्या आहेत तसेच अविचार, अवास्तव कल्पना, संकुचित भावना, दुराग्रह असे अनेकानेक सापळेही त्यानंच निर्माण केले आहेत.
First published on: 08-01-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 6 aadhar