श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात,‘‘व्यवहार सांभाळून राहावे म्हणजे तोटाही फार होत नाही आणि नफाही फार होत नाही!’’ (बोधवचने, क्र. ३९८). आता वाक्य सोपं वाटतं आणि त्याचा अर्थही पूर्णपणे कळला की नाही, अशी शंकाही आपल्या मनाला शिवत नाही. पण वाक्य सोपं नाही, ते चकवणारं आहे आणि फार मार्मिक आहे. काय चकवा आहे यात? अहो आपण व्यवहार करतो तो नफ्यासाठीच असतो ना? व्यवहारात काही तोटा आला तर आपण कुठेतरी चुकलो, असंच आपण मानतो. पण श्रीमहाराज तर सांगतात, व्यवहारात सांभाळून राहिलात अर्थात व्यवहार सांभाळून केला की नफाही फार होत नाही की तोटाही फार होत नाही. हा ‘ना नफा ना तोटा’ म्हणजे काय व्यवहार झाला का, असंच कुणालाही वाटेल. जो असा व्यवहार करील त्याला तर लोक अव्यवहारीच म्हणतात. पण नीट विचार केला की जाणवेल, कर्तव्यकर्म अचूक साधलं तर मोहजन्य कर्मामुळे चिकटणारा प्रारब्धाचा नफा वा तोटा चिकटणार नाही, असंच श्रीमहाराजांना सांगायचं आहे. तर व्यवहार सांभाळणं म्हणजे कर्माची पायरी सांभाळणंच आहे. आपण व्यवहार अर्थात प्रपंचात सांभाळून राहत नाही. सावधान राहत नाही. दक्ष राहत नाही. त्यामुळे तो कमालीचा विस्तारत जातो. श्रीसमर्थ रामदासमहाराजही सांगतात, ‘‘संसार पाण्याचा बुडबुडा। याचा नको करू ओढा। तू समजसीना मूढा। कां भुललासी।।’’ प्रपंच म्हणजे पाण्याच्या बुडबुडय़ासारखा क्षणभंगूर. पण मनाच्या ओढीपायी आपण त्या बुडबुडय़ाचा भलामोठा ओढाच करून टाकतो. असावधानतेचीच, अप्रमाणतेचीच ही खूण आहे. व्यवहाराची, प्रपंचाची आसक्ती मनातून सुटली तर कर्तव्यकर्म फार थोडीच असतात. मुळात कर्म फार थोडं असतं. आपण आसक्तीपायी चिंता, कल्पना, विचार, भावना यांचा इतका गुंता करून टाकतो की लहानशा कर्माची भलीमोठी सावली मनात पसरते. आपला आसक्त स्वभावच हा खेळ वाढवत असतो. श्रीमहाराजांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘स्वभाव म्हणजे आपल्याच कल्पनांचा गुंतवळा!’’ (बोधवचन, क्र. ९२७ मधून) तेव्हा मूळ लहानशा कर्माला आपण डोईजड करून प्रपंचात अप्रमाणता आणतो. एक उदाहरण घ्या. आठेक दिवसांनी समजा एखाद्याशी तुमची निर्णायक चर्चा होणार आहे. उभयतांमधील वाद त्या वेळी सोडविला जाणार आहे. तर प्रत्यक्ष चर्चा फारतर तासाभराची असेल. पण तो दिवस उजाडेपर्यंतचे सात दिवस कसे जातात? सातही दिवस ती चर्चा कशी होईल, याचाच आपण विचार करीत बसतो. माझी सरशी होईल का, माझं म्हणणं तो मानेल का, त्याला पटलं नाही तर पुढे काय होईल, त्याचीच सरशी झाली तर काय होईल, त्याला आपल्या म्हणण्यानुसार झुकवण्यासाठी कोणाकोणाची मदत मिळेल, ऐनवेळी त्यांनी मदत केली नाही तर काय होईल? कल्पनांचा नुसता गुंतवळा! या कल्पनांच्या गुंतवळ्यांनी मन इतकं व्यापून जातं की साधना करतानाही तेच विचार मनात येत राहतात. व्यवहाराच्या अतिविचारातच मन आपली पायरी सोडतं आणि त्यानंही देव अंतरतो!
६८. गुंतवळ
श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात,‘‘व्यवहार सांभाळून राहावे म्हणजे तोटाही फार होत नाही आणि नफाही फार होत नाही!’’ (बोधवचने, क्र. ३९८). आता वाक्य सोपं वाटतं आणि त्याचा अर्थही पूर्णपणे कळला की नाही, अशी शंकाही आपल्या मनाला शिवत नाही. पण वाक्य सोपं नाही, ते चकवणारं आहे आणि फार मार्मिक आहे.
First published on: 08-04-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 68 mass of hair