परमार्थ किती कठीण आहे, हे मनात न आणता तो सोपा कसा आहे, हे मनात आणायला महाराज सांगत आहेत. तो सोपा कसा आहे? तो सोपा दोन कारणांसाठी आहे. प्रथम पहिल्या कारणाचा विचार करू. तो सोपा आहे कारण त्यासाठी या घडीला कोणतीही पूर्वअट नाही. कोणतीही पूर्वतयारी अनिवार्य नाही. परमार्थाची सुरुवात जसे आज आपण आहोत तसेच राहून करायची आहे. ती केल्यानंतर फक्त स्वत:कडे, स्वत:च्या जगण्याकडे, मनाच्या ओढीमुळे आपण कसे व्यक्त होतो याकडे हळूहळू पाहायला सुरुवात करायची आहे. आपल्या जगण्याचा एकमेव हेतू आहे, आनंद! आपल्याला सतत आनंदात जगायचे आहे. हा आनंद प्रपंचातून मिळवण्याचा प्रयत्न आपण अहोरात्र करीत आहोतच. तो प्रयत्न न सोडता तो आनंद परमात्म्याकडून मिळवायला संत सांगतात. त्याचवेळी प्रपंचाचं खरं रूप दाखवतात, त्यातून सुख मिळालं का, हे विचारतात. श्रीमहाराज सांगतात, ‘‘बाहेरच्या सुखाची साधने आली. त्याने देहाचे सुख वाढले पण परावलंबित्व आले. जेथे परावलंबित्व असते तेथे समाधान कमी असते. पण ही साधने व व्यवहार टाळता येणार नाहीत. मग त्यात कसे राहायचे ते ठरवले पाहिजे. आपले ध्येय ठरवले पाहिजे. ते समोर ठेवून राहिले पाहिजे. संत म्हणतात भगवंत आपले ध्येय आहे. प्रपंचाला जरासुद्धा धक्का न लावता ते ध्येय समोर ठेवून राहता आले तर काय हरकत आहे?’’ (बोधवचने क्र. ३२३) कितीतरी सुखाच्या साधनांनी आपला प्रपंच आपण भरून टाकत असतो. पण जसं काळजीचं कारण नाहीसं झालं तरी काळजी नाहीशी होत नाही, हा आपला अनुभव असतो, अगदी त्याचप्रमाणे सुखाची साधनं असली म्हणजे सुख निश्चित मिळतेच, याची खात्री देता येत नाही, हादेखील आपला अनुभव असतो. सुखासाठी आपण या साधनांचा आधार घेत असतो पण आधाराची गरज मनाचीच असल्याने सुखाची अपेक्षाही मनालाच असते. भौतिक वस्तूंना सुखाचं साधन मानल्याने त्या वस्तूंचा अभाव म्हणजे सुखाचा अभाव, असं आपण मानतो. त्यामुळे त्या वस्तूंच्या अभावाची चिंताही आपल्या मनात सदोदित असते. त्यातून त्या वस्तूंवर मनानं आपण सदोदित अवलंबू लागतो. जिथे परावलंबित्व आहे तिथे समाधान उणावतेच. तेव्हा प्रपंचाची आपली आजची घडी अशी आहे. ती सोडताही येत नाही की मोडताही येत नाही. त्यातच राहून आणि प्रपंचातूनच सुख मिळवण्याचा प्रयत्न चालू ठेवतानाच परमात्मप्राप्तीचे ध्येय श्रीमहाराज सुचवत आहेत. प्रपंचाला जरासुद्धा धक्का न लावता हे ध्येय बाळगायला काय हरकत आहे, असं महाराज विचारतात. आपल्यालाही वाटतं, खरंच काय हरकत आहे? त्यासाठी आज जसे जगत आहोत तसेच जगताना परमात्म्याचं एक नाम घ्यायला सुरुवात करायची आहे. प्रपंचातली सर्व कामं करत असतानाच त्या नामाचं वळण मनाला लावायचं आहे. ध्येय एवढंच आहे. हे ध्येय काही कठीण नाही. तेव्हा परमार्थाच्या सोपेपणाचं हे पहिलं कारण झालं. आता दुसरं कारण महाराजच सांगतात, परमार्थ सोपा कारण त्यात गमवायचे असते. प्रपंच कठीण कारण त्यात मिळवायचे असते!
७२. परमार्थाचा सोपेपणा
परमार्थ किती कठीण आहे, हे मनात न आणता तो सोपा कसा आहे, हे मनात आणायला महाराज सांगत आहेत. तो सोपा कसा आहे? तो सोपा दोन कारणांसाठी आहे. प्रथम पहिल्या कारणाचा विचार करू. तो सोपा आहे कारण त्यासाठी या घडीला कोणतीही पूर्वअट नाही. कोणतीही पूर्वतयारी अनिवार्य नाही. परमार्थाची सुरुवात जसे आज आपण आहोत तसेच राहून करायची आहे.
आणखी वाचा
First published on: 12-04-2013 at 12:44 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 72 highest truth