मन हे मुख्य भांडवल आहे. ते परमात्मप्राप्ती या एकाच उद्योगात लावलं पाहिजे. पैसा नव्हे, भगवंत मिळविणे आपलं काम आहे, हे श्रीमहाराजही जेव्हा सांगतात तेव्हा त्यांचाही रोख हाच आहे. ‘पैशाशिवाय चालत नाही पण पैशाइतकी वाईट वस्तू नाही,’ या वाक्यातून पैशाचं महत्त्व ते नाकारत नाहीत पण त्याचबरोबर पैशाला जरुरीपेक्षा जास्त किंमतही ते देत नाहीत. पैशाला जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर त्याचे काय विपरीत परिणाम होतात, हेच ते ‘पैशाइतकी वाईट वस्तू नाही,’ या उक्तीतून सूचित करतात. श्रीतुकाराम महाराजही आपल्या अभंगातून सांगतात, ‘‘ एक मन तुझ्या अवघ्या भांडवला। वांटितां तें तुला येईल कैसें।। १।। म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग। देहा लावीं संग प्रारब्धाचा।। २।।’’ आता माणसाच्या मनाला दुनियेची ओढ आहे. ही दुनिया पैसा असेल तर आपलेपणानं वागते, पैसा असेल तर या दुनियेला झुकवता येतं, पैसा असेल तर या दुनियेत आपल्या मर्जीनुसार राहाता येतं, या भावनेतून पैशाची ओढ माणसाला असते. मनाची ओढ भगवंताकडे लागल्याखेरीज आत्मकल्याण होऊ शकत नाही. मनाने भगवंताचीही ओढ आहे आणि दुनियेची अर्थात पैशाचीही ओढ आहे, हे शक्य नाही. मनाची ओढ भगवंताकडे केंद्रित झाल्याशिवाय भ्रमापासून सुटका नाही. आता याचा अर्थ माणसानं पैसा मिळवूच नये का? भौतिक सुबत्तेसाठी प्रयत्न करूच नयेत का? श्रीमहाराजांचा त्या गोष्टीला विरोध नाही. प्रपंच गरिबीचा असला तरी चालेल पण त्यात दैन्यपणा नसावा, असे त्यांनी स्पष्ट बजावलं आहे. याचाच अर्थ पैशापायी येणारा माज जसा निषेधार्ह आहे तशीच पैशाअभावी येणारी लाचारीही निषेधार्ह आहे. आणखी एके ठिकाणी ते सांगतात, ‘..नको म्हणणे हे वैराग्याला कमीपणा आहे’ (बोधवचने, क्र. ३११) आणि ‘वाटेल तसे राहण्याची तयारी असेल तर वाटेल ते येऊ दे म्हणावे. राजाचे वैभव मिळाले तर भोगावेच पण झोळी घेण्याची पाळी आली तर डोळ्यांत पाणी येऊ देऊ नये’(बोधवचने, क्र. १६९). याचाच अर्थ प्रारब्धाच्या पकडीत जगत असताना स्वप्रयत्न आणि स्वकष्टानं जर श्रीमंती आली तर ती नाकारणे हेदेखील वैराग्य नाही! उलट ‘जैशी स्थिती आहे तैशापरी राहे’ याप्रमाणे श्रीमंती आली तर तीही भोगावी, टिकवावी, वाढवावी पण गरिबी आली तर डोळ्यांत पाणी येऊ देऊ नये, लाचार होऊ नये, स्वाभिमान न सोडता विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे थांबवू नये! पण या साऱ्या गोष्टी करीत असताना त्यात मनाने गुंतू नये. देहाला त्या कामी जरूर जुंपावे पण मन भगवंताकडेच वळवीत राहावे. तो मुख्य उद्योग आहे. तुकाराम महाराजही सांगतात की, मन हे एकमात्र भांडवल पांडुरंगाला दृढ धरण्याच्या उद्योगासाठी वापरा आणि देहाला या दुनियेत प्रारब्धानुरूप प्रयत्नरत राहू द्या. अर्थात प्रारब्धाच्या चढउतारांचा परिणाम मनावर होऊ देऊ नका. मन भगवंताकडेच ठेवा. आता आपल्या मनात येईल, मनच जर भौतिक सुबत्तेबाबत निष्क्रिय झाले तर निव्वळ देहप्रयत्नांनी ती सुबत्ता कशी लाभेल? मुख्य म्हणजे मनाच्या सहभागाशिवाय देहाकडून प्रयत्न होणे शक्य तरी आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा