वासनेत जन्माला येऊन देवाला दत्तक गेल्यावर आपले मरण आपल्या डोळ्यांना दिसेल, असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. पूर्वीच्या काळी दत्तकप्रथा होती. मूलबाळ नसलेलं श्रीमंत जोडपं आपल्याच नात्यातील एखाद्या मुलाला दत्तक घ्यायचे, अशीही प्रथा होती. ज्या मुलाला दत्तक घेतलं जायचं, त्याची घरची परिस्थिती  अनेकदा बेताची असायची. हे मूल दत्तक जायचं तेव्हा नव्या घरातल्या रीतीभाती, श्रीमंतीचे संस्कार काही काळातच त्याच्यात भिनायचे. आधीच्या जगण्याचे संस्कार जणू पुसले जायचे आणि नवे संस्कार आत्मसात केले जायचे. या दत्तकप्रथेच्या रूपकाचा वापर करून श्रीगोंदवलेकर महाराज बोध करतात की, आपला जन्म वासनेत झाला आहे आणि आपण देवाला दत्तक जावं! असे आपण दत्तक गेलो की आपलं मरण आपल्या डोळ्यांना दिसेल, हे जरा ऐकायलाही कसंतरीच वाटतं. पण हे ‘मरण’ कोणतं, ते नंतर पाहू. प्रथम वासनेत जन्माला येऊन देवाला दत्तक जाणं, म्हणजे काय, याचा विचार करू. देवाला दत्तक जाणं म्हणजे वासनेचं घर सोडून देवाचं होणं! देवाला दत्तक जायचं आहे याचाच अर्थ जन्मत:च आपण देवाचे म्हणून जन्मलो नाही, हे उघडच आहे. आपला जन्म वासनेतच आहे, आपलं जगणं वासनांच्या आधारावरच आहे आणि आपल्या अखेरच्या क्षणीही ज्या वासना मनात उसळतात त्यानुसार पुढचा जन्म आपल्याला लाभतो. थोडक्यात आपल्या जगण्यावर आणि पुन्हा पुन्हा जन्म घेत राहण्यावरही वासनेचाच पूर्ण अंमल आहे. देह नष्ट होईल पण वासनादेह कधीच नष्ट होणार नाही. वासनेचा पुंजका आपल्याला जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरवत राहातो. देहबुद्धीच्या रूपानं वासनेची सत्ता आपल्या जगण्याला व्यापून असते. वासनेचं घर सोडणं म्हणजे देहबुद्धीच सोडणं. हे सोपं का आहे? श्रीमहाराजही सांगतात, ‘‘देहबुद्धीचा बुंधा उखडणें फारच कठीण, म्हणजे मरणाइतके कठीण आहे..’’(बोधवचने, क्र. ८४७). श्रीमहाराजांचे शब्दही पाहा! देहबुद्धीचा बुंधा म्हटलं आहे. झाड एक वेळ तोडणं सोपं आहे पण अवाढव्य झाडाचा बुंधा जमिनीतून उखडणं सोपं नाही. जमिनीत खोलवर मुळं पसरली असतात आणि घट्टपणे जमिनीत हा बुंधा मुरून जमिनीला धरून असतो. अगदी त्याचप्रमाणे माणूस काही काही गोष्टींचा त्याग करीलही पण देहबुद्धीचा समूळ त्याग साधणं अतिशय कठीण. बुंधा जसा जमिनीला सोडत नाही तसा माणूस आपल्या ‘मी’ आणि ‘माझे’ची जी जमीन आहे, म्हणजेच जो आधार आहे तो सोडू इच्छित नाही. देहबुद्धीचा हा बुंधा उखडणे म्हणजे मरणाचाच स्वीकार करणे! वासनेत जन्माला येऊन देवाला दत्तक जाणे म्हणजे स्वत:चे मरण स्वत:च्या डोळ्यांनी पाहणेच. आता हे मरण आहे काय? श्रीतुकाराम महाराजांनी एका अभंगात त्याचं फार मार्मिक वर्णन केलं आहे. तो अभंग आहे- ‘‘आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां। तो झाला सोहळा अनुपम्य!’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा