आपला प्रपंच म्हणजे आपल्या आसक्तीचाच गुंता असतो. या प्रपंचापासून अलिप्त व्हायचे म्हणजे आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करायचा. आसक्ती सोडायचे दोन मार्ग आहेत. त्यातला पहिला मार्ग म्हणजे एक घाव दोन तुकडे! हा आपला मार्ग नव्हेच. हे सांगणारी एक कथा श्रीगोंदवलेकर महाराजांनी सांगितली आहे. ते म्हणतात : एक मनुष्य लहानपणापासून साधनामध्ये असे. भगवंताच्या कृपेने एक सत्पुरुष त्याच्या घरी आले आणि कृतार्थ करून गेले. आपले तर काम झाले, पण एकदा तीर्थक्षेत्रे हिंडून अनेक संत पहावेत म्हणून तो बारा वर्षे भरतखंड हिंडला. घरी येऊन राहिल्यावर त्याचे लग्नबिग्न झाले. त्याला दोन-तीन मुले झाली. पुढे गावात प्लेगची साथ आली. त्यात त्याची बायको, तिन्ही मुले, वडील व दोन भाऊ मृत्यु पावले. आई आणि हा एवढी दोनच माणसे घरात शिल्लक राहिली. वर्ष सहा महिने गेल्यावर आई एकदा म्हणाली, ‘‘बाळ जन्मास आल्यासारखे काशीला जाऊन एकदा गंगास्नान करावे आणि विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे, असे माझ्या मनात आहे. तू मला काशीला घेऊन चल.’’ साधू म्हणाला, ‘‘आई उद्या निघायचे का?’’ आई म्हणाली, ‘‘नाही रे, या वर्षी तुझी बहिण बाळंतपणाला येणार आहे. तिचे कोण करील?’’ हे ऐकून साधू गप्प बसला. दुसऱ्या वर्षी साधूने विचारले, ‘‘आई, आता काशीला जायचे का?’’ ती म्हणाली, ‘‘नाही रे! या वर्षी नाही. नुकतीच मी लोणची घातली आहेत, त्यांच्याकडे बघायला पाहिजे. नाहीतर ती नासून जातील.’’ हे ऐकून साधू गप्प बसला. तिसऱ्या वर्षी साधूने विचारले, ‘‘आई, आता निघायचे का काशीसाठी?’’ आई म्हणाली, ‘‘काय करावे रे! माझ्या मनात निघायचे फार आहे! पण आपण घर सोडून गेलो तर गावचे लोक घराचा वासाही शिल्लक राहू देणार नाहीत!’’ त्यावेळी साधू गप्प बसला. त्याच दिवशी रात्री अकरा वाजता सगळे लोक स्वस्थ निजले असता त्याने स्वत:च घराला आग लावली. आग चांगली भडकल्यावर आरडाओरड केली. गावचे लोक जमले आणि घरातील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले, पण आग लागून पुष्कळ वेळ झाला असल्यामुळे बहुतेक सर्व सामान जळून गेले होते. फक्त एक गाठोडे सुरक्षितपणे बाहेर निघाले. आग शांत झाल्यावर ते सोडून पाहिले तर त्यात संतश्रेष्ठ श्रीतुकारामबुवांची गाथा आढळली! घराची राख आपल्या व आईच्या कपाळाला लावीत साधू म्हणाला, ‘‘आई आता आपल्या घराचा वासा जायची भीती उरली नाही. आता काशीला चलायचे ना?’’ आई म्हणाली, ‘‘चल बाबा! आता इथे आपले काय शिल्लक उरले?’’ त्याच दिवशी दोघेजण काशीला निघून गेले. या कथेचे तात्पर्य महाराज सांगतात की, प्रपंचाचा लोभ भगवंताच्या आड येतो. मग त्याच्यातून मोकळे होण्यास आपल्या हाताने त्याचा नाश करणे, हा एक मार्ग आहे. ज्याची जशी तयारी असेल त्याने प्रपंचाचे पाश बसल्या बैठकीत तटातट तोडून टाकावेत आणि भगवंताच्या मार्गाला जावे. त्याने पुन्हा मागे पाहू नये. हा एक मार्ग आहे. हा मार्ग आपला नाहीच तरी या तात्पर्याच्या अनुषंगाने त्याचा थोडा विचार करू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा