सगुण आणि निर्गुण! या संकल्पना परमात्म्याशी जोडल्या आहेत. परमात्मा हा सगुण आहे म्हणजे त्रिगुणातही अवताररूपाने साकारला आहे त्याचवेळी प्रत्यक्षात तो निर्गुण म्हणजे गुणातीत आहे, निराकार आहे. इथे सगुण म्हणजे साकार आणि निर्गुण म्हणजे निराकार असा अर्थ घेतला तर या दोन्ही गोष्टी आपल्यातही आहेतच. आपल्या जीवनातही साकार आणि निराकार यांचा मेळ आहे. साकार म्हणजेच दृश्य, स्थूल जे असतं ते काळाच्या अधीन असल्याने मर्यादेत असतं. निराकार म्हणजेच अदृश्य, सूक्ष्म जे असतं ते अमर्याद असतं. आपलं शरीर, आपली भौतिक संपदा हे सर्व साकार आहे, स्थूल आहे, दृश्य आहे. आपलं अंत:करण म्हणजेच मन, बुद्धी आणि चित्त यात स्फुरणारे विचार, कल्पना, प्रेरणा, भावना, वासना आदी सर्व गोष्टी या निराकार आहेत. जे निराकार असतं त्याचा प्रभाव मोठा असतो. आपलं जगणं, आपलं भौतिक जीवन हे दृश्यरूपात असलं तरी ते आपल्या अंत:करणातील विचार, कल्पना, प्रेरणा, भावना, वासना यांनी नियंत्रित असतं. आपलं हे साकार-निराकार जगणं मायेच्या पकडीतच असतं. सत्यस्वरूप परमात्म्याकडे नेणारं परमार्थाचं साधन हे मायेचा निरास करणारं हवं. त्यामुळेच ते सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही बाजूंना स्पर्शिणारं हवं. नाम हे असं साधन आहे. हे नाम अंत:करणात खोलवर पोहोचतं. माझ्या विचार, कल्पना, प्रेरणा, भावना, वासना आदींबाबत मला हळूहळू सजग करू लागतं. माझ्या जगण्यातील असत्याबाबत मला जागं करू लागतं. माझ्या जगण्यातील असत्य जे आहे, अशाश्वत जे आहे ते सुटावं, अशी ओढ उत्पन्न करू लागतं. श्रीमहाराजही सांगतात, भगवंत प्राप्त करून घ्यायला काही नवीन मिळवायचे नाही, फक्त आहे ते घालवायचे आहे. आता आपल्यात आहे काय? निव्वळ अहंकार! मीपणा!! तो घालवता आला तरी परमात्मा आत आहेच. श्रीमहाराजही सांगतात, ‘‘मीपणा गेला म्हणजे परमात्मा उभाच आहे’’ (बोधवचने, क्र. ९५२). माणूस सर्व गोष्टींचा एकवेळ त्याग करील पण मीपणाचा त्याग करू शकणार नाही. ‘त्यागा’तही तो अहंकारासाठी आधार शोधतोच. एकजण मी देवासाठी काय काय सोडलं, हे सांगू लागला तेव्हा श्रीनिसर्गदत्त महाराज ताडकन म्हणाले, ‘तुम्ही काय सोडलंत याला महत्त्व नाही. तुम्ही काय सोडलं नाहीत, हे पाहा आणि ते सोडायचा प्रयत्न करा!’ तेव्हा हा मीपणा खऱ्या अर्थाने ज्या गतीने जाईल त्या गतीने आत सुधारणा होत जाईल. आत ज्या गतीने सुधारणा होईल त्या गतीने बाहेरही सुधारणा साधेल. श्रीमहाराज सांगतात, ‘‘भगवंताचे दर्शन बाहेरून यायचे असे नाही. ते आपल्यातच आहे. पण आपल्याला देहाचे व वासनेचे प्रेम अधिक आहे. ते काढून टाकायचे ही क्रिया म्हणजे साधना. साधनाने आसक्तीचे वेष्टण गेल्यावर आपले खर स्वरूप दिसते’’ (बोधवचने, क्र. २२). तेव्हा अंतरंगातली आसक्ती जाण्यासाठी सद्गुरू सांगतात त्याच मार्गाने वाटचाल केली पाहिजे. साधनेचा हा मार्ग आहे त्रिगुणात बद्ध असलेल्या मला त्रिगुणातीत अशा परमात्म्याशी जोडणारा.
१३९. सगुण-निर्गुण
सगुण आणि निर्गुण! या संकल्पना परमात्म्याशी जोडल्या आहेत. परमात्मा हा सगुण आहे म्हणजे त्रिगुणातही अवताररूपाने साकारला आहे त्याचवेळी प्रत्यक्षात तो निर्गुण म्हणजे गुणातीत आहे, निराकार आहे. इथे सगुण म्हणजे साकार आणि निर्गुण म्हणजे निराकार असा अर्थ घेतला तर या दोन्ही गोष्टी आपल्यातही आहेतच. आपल्या जीवनातही साकार आणि निराकार यांचा मेळ आहे.
आणखी वाचा
First published on: 16-07-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan attributes attributeless to god