देहबुद्धीचा प्रभाव फार मोठा असतो. नाम घेणाराही या देहबुद्धीच्याच प्रभावाखाली प्रथम असल्याने त्याला नामाची अनन्य रुची नसते. उलट योगाचं, त्याद्वारे मिळणाऱ्या सिद्धींचं मनात सुप्त आकर्षण असतं. त्यातही गंमत अशी की, योगसाधनेसाठी जी कठोर तपश्चर्या आहे ती करायची कुणाची तयारी नसते पण तिचे सर्व लाभ हवे असतात! ‘योगानं जे साधतं तेच नामानंही साधतं’, या श्रीमहाराजांच्या वाक्याचा दीर्घ मागोवा घेताना आपण योगसाधनेची त्रोटक माहिती घेतली. आता या मागोव्याच्या उत्तरार्धात त्यांनीच सांगितलेल्या नामयोगाच्या अनुषंगाने आपण पुन्हा योगविचाराचाही आधार घेणार आहोतच. खरं तर श्रीगोंदवलेकर महाराज स्पष्ट बजावतात की, ‘‘इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे असेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. ८). आता श्रीमहाराज हे देहबुद्धीच्या पकडीत असलेल्यालाच हे सांगत आहेत. ‘इतर साधनांना साधल्यासारखे वाटेल (पाहा बरं, ‘वाटेल’, ‘साधेल’ नव्हे!) पण ते तात्पुरते असेल’, असं श्रीमहाराज का सांगतात? कारण देहबुद्धी हाडीमांसी रुजली असताना इतर कोणतीही साधना केली तरी ती कायमस्वरूपी राहणार नाही. बिघाड मुळातच आहे, तो दुरुस्त झाल्याशिवाय काही साधणार नाही. इमारतीचा पायाच खचला असताना भिंती रंगवून इमारत कितीही सुस्थितीत असल्याचं भासवलं तरी ती टिकणार नाही. ढासळल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा वरकरणी इमारत आहे तशीच ठेवून तिच्या पायात सुधारणा करण्याचं अवघड काम नाम करतं! पायादुरुस्तीचं हे अतिशय व्यापक आणि नाजुक काम सुरू असताना मला मात्र भिंतींना अजून रंग का नाही लागला, याची चिंता सतावत असते! माझ्या मनात या नाद, रंग, प्रकाश, वगैरेबाबत असलेल्या आकर्षणाला अनुलक्षून श्रीमहाराज सांगतात, ‘‘नामाचे साधन हे जलद गाडीसारखे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंताकडे घेऊन जाईल’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. ५). तेव्हा अंतिम लक्ष्याकडे थेट घेऊन जाणारं नाम मी घेतलं पाहिजे, हा श्रीमहाराजांचा आग्रह आहे. योगानं जे साधतं तेच नामानंही साधतं, अशी त्यांची ग्वाही आहे. त्यासाठी त्यांनी एका वाक्यात सांगितलेल्या ‘नामयोगा’चा विचार आपण आता करणार आहोत. हे वाक्य असं- ‘‘आपण नाम घ्यावे, ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वत:ला विसरून जावे, हाच आनंदाचा मार्ग आहे!’’ आता तुम्ही म्हणाल, यात काय मोठी यौगिक क्रिया आहे? साधंसं तर वाक्य आहे. आता मग कृतीच करू! आजचा हा भाग वाचून झाल्यावर डोळे मिटा, नाममंत्राचा उच्चार शांतपणे करा आणि तो आपल्याच कानांनी ऐका. आपणच उच्चारत असलेलं ते नाम आपल्याच दोन कानांनी ऐकत असताना आपली आतली दृष्टी कुठे केंद्रित होते, याकडे जरा अवधानपूर्वक लक्ष द्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा