देहाच्या जशा तीन अवस्था असतात तशाच मनाच्याही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था असतात. आपण जागे असतो ती जागृत अवस्था. आपण झोपतो तेव्हाही स्वप्नांच्या माध्यमातून स्वत:ची जाणीव असते. पण जेव्हा ती जाणीवही लोपते आणि आपण गाढ झोपलो असतो तेव्हा ती सुषुप्ती अवस्था असते. त्या गाढ झोपेत स्वत:ची आणि जगाची जाणीव लोपलेलीच असते. रमण महर्षी यांच्या सहवासातील क्षण ‘डे बाय डे’ या ग्रंथात आहेत. त्यात रमण महर्षी एकदा म्हणतात, ‘‘ There is an ‘I’ which comes and goes ; and another ‘I’ which always exists and abides. So long as the first I exists, the body consciousness and the sense of diversity or भेदबुद्धि  will persist. Only when that I dies, the reality will reveal itself. For instance, in sleep, the first I does not exist. You are not then conscious of a body or the world. Only when that I again comes up, as soon as you get out of sleep, you alone exist… That I which persist always and does not come and go is the reality. The other I which disappears in sleep is not real.’’  (आपल्यात एक ‘मी’ असतो जो येतो आणि जातो, दुसरा ‘मी’ मात्र सदोदित असतो. जोवर पहिला ‘मी’ असतो तोवर देहाची जाणीव आणि द्वैताची जाणीव अर्थात भेदबुद्धी असते. जेव्हा तो ‘मी’ मावळतो तेव्हा वास्तविक स्वरूप प्रकटते. उदाहरणार्थ, झोपेत पहिला ‘मी’ उरत नाही. तुम्हाला तेव्हा तुमच्या शरीराची किंवा जगाची जाणीव नसते. तुम्हाला जाग येताच तो ‘मी’देखील तात्काळ जागा होतो, तोवर केवळ तुम्ही एकटेच, तुमच्या मूळ स्वरूपात असता. हा ‘मी’ जो कायमच असतो, तो जात नाही की येत नाही, तोच वास्तविक आहे. झोपेत जो मावळतो तो ‘मी’ खरा नाही). रमणांचे हे चिंतन मनात ठेवून आपण या तीन अवस्थांचा विचार करू. आपली जागृत अवस्था असते ती खरी जागृती असते का? जगाच्या विचारांनी ती अवस्था व्यापलेली असते. विकार-वासनांनी भारलेल्या अहंयुक्त ‘मी’ची जाणीव तेव्हा सदोदित जिवंत असते. भवभ्रमाचं स्मरण आणि वास्तविक स्वरूपाचं विस्मरण यातच आपली जागृत अवस्था लोटत असते. म्हणूनच जग जागं झालं की योगी झोपतो आणि जग झोपतं तेव्हा योगी जागा होतो, म्हणतात ना? ज्या अहंयुक्त गोष्टींनी जगाला जाग येते त्यांची जाग योग्याला नसते. तेव्हा आपली ही जागृत अवस्था अज्ञानानं भरलेली असते. मग ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या उक्तीप्रमाणे जागृत अवस्थेत मनात उठणारे जे वासनातरंग असतात, त्यांचे जे अमीट संस्कार मनावर झाले असतात त्यानुसार स्वप्नावस्थाही सरते. अर्थात अर्धवट निद्रावस्थेत अहंयुक्त ‘मी’ पूर्ण मावळलेला नसतो. स्वप्नातही त्याची जाणीव असते. त्यामुळेच स्वप्नातल्या संकटांनीही माणूस त्या क्षणी भयाचा अनुभव करीत असतो. पण जेव्हा ही अवस्थाही सरते आणि गाढ झोप लागते तेव्हा जो तरीही प्रगाढ शांती भोगत असतो तो असतोच; ती अवस्था सुषुप्तीची.

Story img Loader