सर्व जग त्रिगुणात अडकलेलं आणि दृश्याच्या अर्थात सगुणाच्याच प्रभावानं प्रेरित होणारं आहे. ‘सगुण’ हाच या जगातल्या सर्व व्यवहाराचा आधार आहे. या जगाचा माझ्या अंतरंगावर, माझ्या व्यक्तिमत्त्वावर अगदी खोलवर ठसा आहे. त्यामुळेच या सगुण भासणाऱ्या पण अशाश्वत अशा जगाच्या पलीकडे जायचं असेल, तर शाश्वताच्या सगुण रूपाचाच आधार मला धरायला हवा. मग भले वाटचालीच्या पहिल्या टप्प्यात ते रूप काल्पनिक का भासेना! श्रीगोंदवलेकर महाराज यांचं दुसरं महत्त्वाचं वाक्यही या जोडीने पाहू. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘भक्ती अत्यंत स्वाभाविक आहे. ती प्रत्येकाला हवीच असते. कारण आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही’’(चरित्रातील भक्तीविषयक वचने, क्र. ५७). आधीच्या वाक्यात ‘सगुणा’चा जसा अगदी व्यापक अर्थ आपण जाणला त्याचप्रमाणे या वाक्यातही ‘भक्ती’चा अर्थ अध्यात्माच्या पलीकडचाही आहे. ‘भक्ती अत्यंत स्वाभाविक आहे’ म्हणजे भक्ती हा माणसाचा स्वभावच आहे. फरक इतकाच की तो जन्मापासून जगाची भक्ती करीत आहे, जन्मापासून जगाच्या प्रभावापासून तो कधीच विभक्त नाही! श्रीमहाराजांचीच व्याख्या आहे, ‘विभक्त नाही तो भक्त!’ तेव्हा जगाची भक्ती म्हणजे जगाची आवड. ही आवड प्रत्येकालाच असते. जे नावडीचं आहे ते जसं नकोसं असतं त्याचप्रमाणे आवडीचं जे आहे ते प्रत्येकालाच हवं-हवंस असतं. कोणत्या ना कोणत्या आवडीशिवाय मनुष्य राहूच शकत नाही. आवडीची माणसं, आवडीच्या वस्तू आणि या सर्वापलीकडे आवडीचा ‘मी’ या शिवाय, म्हणजेच यांची भक्ती केल्याशिवाय जगणारा मनुष्यच या जगात सापडणार नाही. तेव्हा माणूस हा दृश्य स्थूल अशा जगाचा, भौतिकाचा जन्मजात भक्त आहे. जन्मभर तो जगाच्याच प्रभावाखाली, भौतिकाच्याच प्रभावाखाली जगतो आणि मरतानाही याच भौतिकातील अपूर्त इच्छांची तळमळ मनात ठेवूनच या जगातून जातो. त्यामुळे तो त्या अपूर्त इच्छांच्या पूर्तीसाठी पुन्हा पुन्हा याच जगात येतो. तेव्हा ‘सर्वजण या ना त्या रूपात सगुणाचीच उपासना करतात’ आणि ‘भक्ती अत्यंत स्वाभाविक आहे. ती प्रत्येकाला हवीच असते. कारण आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही’, या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे- सगुण अशा, दृश्य अशा, स्थूल अशा भौतिक जगाची भक्ती माणूस करीत आला आहे, त्या भौतिकापासून तो कधीच विभक्त होऊ शकत नाही, या भौतिकाच्या आधाराशिवाय कुणीच राहू शकत नाही. महत्त्वाची गोष्ट इतकीच की, हे भौतिक विश्व अशाश्वत असते. त्यात शाश्वत सुखाच्या ओढीनं गुंतलेला माणूस कधीच शाश्वत समाधान प्राप्त करू शकत नाही. शाश्वत समाधान हे शाश्वताच्याच आधारानं लाभेल. तो आधार पकडण्यासाठी अशाश्वत सगुण जगाची भक्ती सोडून या जगापलीकडे जाता आलं पाहिजे. त्यासाठी अशाश्वत जगाच्या भक्तीऐवजी शाश्वत भगवंताचीच भक्ती हवी, अशाश्वत सगुण जगाच्या उपासनेऐवजी शाश्वत भगवंताचीच सगुणोपासना हवी.