भगवंताचा आधार पकडायचा म्हणजे कर्तव्यर्कम सोडून बेफिकीर बनायचे नाही, हे आपण जाणलं. आधारासाठी जगावर, भौतिकावर मनाची जी भिस्त आहे ती सुटून भगवंताचाच आपल्याला आधार आहे, याकडे वळवायची. कारण जग कधीच प्रत्येक क्षणी आधारवत राहू शकत नाही. जगाचा आधार असल्याच्या कल्पनेनं जगावर अवलंबून राहण्याची आणि त्यायोगे आपण त्या आधाराशिवाय राहूच शकत नाही, हे मानण्याची जी सवय जडते ती भगवंताचा आधार जसजसा पक्का होत जाईल तसतशी सुटत जाते. भगवंताचा आधार जरी घेतला तरी देहानं सर्व प्रयत्न आणि कर्मे अचूकतेनं करायचीच आहेत. फक्त आपल्या प्रयत्नांचं फळ जे आहे ते भगवंताच्या इच्छेवर अवलंबून आहे, ही जाणीव मनात रुजवण्याचा अभ्यास करायचा आहे. त्यातून पुढे काय होईल, या चिंतेनं मनाचं सतत सुरू असलेलं खच्चीकरण रोखलं जाईल. मनाची आणि त्यायोगे शरीराची शक्तीही वाढेल आणि सकारात्मक वृत्ती निर्माण होईल. कर्तव्ये करीत असताना त्याचे फळ भगवंतावर सोपवण्याचा अभ्यास जितका साधेल तितकी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव वाढेल. ही जाणीव जसजशी पक्की होत जाईल, तसतशी निर्भयताही मनात वाढेल. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘ज्याला भगवंताचे सान्निध्य लाभले त्याला निर्भयता आणि निर्वासनता येईल’’ (चरित्रातील भक्तीविषयक बोधवचने, क्र. २५), ‘‘आपण अपूर्णाचा आधार घेतल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही. त्यासाठी भगवंताचा आधार हवा’’ (चरित्रातील भक्तीविषयक बोधवचने, क्र. २६) आणि ‘‘..भगवंतावर सोपवावे. त्यामुळे निर्भयता येईल’’(बोधवचने, क्र. २०४). आता भगवंताचं सान्निध्य ही तर फार पुढची अवस्था आहे, पण त्याच्या अस्तित्वभावनेनंही निर्भयता येऊ लागेल. ती कशी? समजा आपण अपरात्री एखाद्या रस्त्याने जात आहोत आणि रस्त्यावर रहदारीही नाही, त्याचवेळी एखादा गणवेशातला पोलीसही आपल्याबरोबर चालताना दिसतो आणि मनाला हायसं वाटतं. प्रत्यक्षात त्या पोलिसाला आपण ओळखतही नसतो, पण त्याच्या नुसत्या अस्तित्वामुळेही आपल्यावर वाईट प्रसंग ओढवणार नाही, आणि ओढवलाच तर तो आपलं रक्षण करील, ही आपल्या मनातली भावनाच भय कमी करते आणि आपण चिंतामुक्त मनानं वाटचाल करू लागतो. त्याचप्रमाणे जीवनाच्या वाटचालीतही भगवंत आपल्या सोबत आहे, अशी जाणीव मनात जागी राहिली तर तो आपलं रक्षण करील, या नुसत्या भावनेनंही मनावरचं काळजीचं ओझं कमी होईल. आता भगवंताचा हा आधार घेण्यासाठीचा उपाय कोणता? प्रपंचात भगवंताचा आधार हवा तर भक्तीचाच आश्रय हवा आणि ते साधण्यासाठी पहिला आणि सोपा उपाय म्हणजे सगुणोपासना! सगुणोपासना या नुसत्या शब्दांनही अनेकांच्या मनात अनेक विकल्प निर्माण होतील. पण महाराजांच्या शब्दांत सांगायचं तर ‘‘सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात!’’ या वाक्याच्या गूढगंभीर अर्थाच्या वाटेनं या सगुणोपासनेकडे वळू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा