स्वातंत्र्याची ज्याला इच्छा आहे तो स्वत: आधी मनाने स्वतंत्र आहे का? मानसिक गुलामगिरीत जखडलेला माणूस देहानं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य उपभोगू शकेल का? त्यामुळे साधकाने खऱ्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा आशयाचा श्रीमहाराजांचा बोध स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय असलेल्या त्या तरुण साधकाच्या पचनी पडणं शक्यच नव्हतं. त्याला महाराजांनी निदान वर्षभर मौनाचा अभ्यास करून पाहायला सांगितलं आणि त्या एका अभ्यासानं कितीतरी गोष्टींपासून आपण स्वतंत्र झालो आहोत, असं त्याला जाणवलं. जग वाईट आहे की नाही, जग चांगलं होईल की नाही, जगातलं दुखं संपवता येईल की नाही, या प्रश्नांपेक्षा मी वाईट आहे, माझं जगणं अनंत दुखांनी भरलेलं आहे हे वास्तव जाणून त्यात बदल करण्याची सुरुवात मी केली पाहिजे. माझ्यात खरा पालट झाला की मग जग पालटण्याची किंवा जग जसं आहे तसा त्याचा स्वीकार करून आपली आत्मस्थिती सतेज राखत जगात वावरण्याची शक्ती मला लाभेल. या पालटासाठी मागे पाहिल्या त्याच दोन अटी आहेत. पहिली म्हणजे निस्वार्थीपणा आणि दुसरी अखंड अनुसंधान. आता वरकरणी असे वाटते की निस्वार्थी व्यवहार ही बाह्य़ कृती आहे आणि अखंड अनुसंधान ही आंतरिक कृती आहे. प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टींचा संबंध अंतरंगाशीच आहे. निस्वार्थीपणा म्हणजे स्वार्थ सुटणे. आपला समस्त व्यवहार हा स्वार्थकेंद्रितच असतो. दुसऱ्याशी वागताना आपला स्वार्थ त्यात डोकावतोच. जो निस्वार्थी आहे त्याचा स्वार्थ पूर्ण सुटला असला पाहिजे म्हणजेच त्याची कृती ही पूर्णपणे स्वार्थरहित असली पाहिजे, असे आपल्याला वाटते. ते चूक की बरोबर हे नंतर पाहू. पण स्वार्थ हा कुठे असतो? तो मनातच असतो. त्यामुळे तो मनातून गेला पाहिजे. अखंड अनुसंधान ही सुद्धा मानसिक प्रक्रिया वा मानसिक स्थिती आहे. अनुसंधान हे मनातच चालते त्यामुळे त्याचाही संबंध मनाशीच आहे. अर्थात आपल्यात पालट घडवायचा म्हणजे आपल्या मनातच पालट घडवायचा आहे. हा पालट म्हणजे आपलं मरणच आहे, असं मनाला ठामपणे वाटतं. पालट म्हणजे आज माझी जी जगण्याची रीत आहे, विचाराची जी रीत आहे, कृतीची जी रीत आहे ती बदलायची आहे. आजची माझ्या जगण्याची रीत ही माझ्या मनाच्या ओढीनुरूप आहे, कलानुरूप आहे, आवडीनुरूप आहे. त्यामुळे त्यात पालट घडवायचा याचाच अर्थ मनाची ओढ तोडायची, मनाचा कल नाकारायचा, मनाची आवड धुडकवायची असाच आहे; या धास्तीमुळे मनालाच हा पालट नको असतो. आपल्याच मनाच्या जोरावर हा पालट घडवू पाहातो. मनात पालट घडविण्याचे काम मनाकडेच सोपविणे म्हणजे चोरालाच पोलिसाचे काम देण्यासारखे आहे, असे रमण महर्ष म्हणत (संदर्भ- ‘डे बाय डे’ : रमण महर्षिच्या सहवासातील रोजनिशी). तेव्हा मनाच्या ओढी आणि मनाच्या निकराच्या विरोधाचा सामना करीत स्वार्थी आणि अनुसंधानहीन मनात पालट घडवायचा आहे. हे आव्हान माझ्या ताकदीवर नव्हे तर दृढ अशा परम आधारानेच पेलता येईल.
१०८. पालट
स्वातंत्र्याची ज्याला इच्छा आहे तो स्वत: आधी मनाने स्वतंत्र आहे का? मानसिक गुलामगिरीत जखडलेला माणूस देहानं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य उपभोगू शकेल का? त्यामुळे साधकाने खऱ्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा आशयाचा श्रीमहाराजांचा बोध स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय असलेल्या त्या तरुण साधकाच्या पचनी पडणं शक्यच नव्हतं.
आणखी वाचा
First published on: 03-06-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan day by day