श्रीतुकाराम महाराज म्हणतात- ‘‘आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां। तो झाला सोहळा अनुपम्य।। १।। आनंदें दाटलीं तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग झाला।। २।। एकदेशीं होतों अहंकारें आथिला। त्याचा त्याग झाला सुकाळ हा।। ३।। फिटलें सुतक जन्ममरणाचें। मी माझ्या संकोचें दुरी झालों।। ४।। नारायणें दिला वसतीस ठाव। ठेवूनियां भाव ठेलों पायीं।। ५।। तुका म्हणे दिलें उमटूनि जगीं। घेतले ते अंगीं लावूनियां।। ६।।’’ आनंदें दाटलीं तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग झाला, ही या अभंगाची फलश्रुती आहे. तिचा अर्थ त्यामुळे शेवटी पाहू.  तुकाराममहाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा. माझ्या डोळ्यांनी मी माझं मरण पाहिलं. आपल्या डोळ्यांनी आपलं मरण कधी दिसेल? श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या सांगण्यानुसार, ‘‘वासनेत जन्माला येऊन देवाला दत्तक गेल्यावर आपले मरण आपल्या डोळ्यांना दिसेल.’’ तेव्हा तुकाराममहाराजही देवाला दत्तक गेले, देवाचे झाले, परमात्ममयच झाले आणि म्हणून आपलं मरण आपल्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं. आता हे मरण दु:खदायक नाही, क्लेशकारक नाही, भीतीदायक नाही. हे मरण म्हणजे सोहळा आहे, अनुपम असा सोहळा आहे, त्या सोहळ्याला कोणतीही उपमा देता येत नाही, असा तो उत्सव आहे. तेव्हा माझ्या मरणाचा अनुपम असा सोहळा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला, असं तुकाराममहाराज सांगतात. माणूस हा देहाचा असतो. देहासाठीच तो जगत असतो. देहसुखालाच तो सर्वस्व मानत असतो. देहबुद्धीला पटेल तेच त्याला ग्राह्य़ वाटत असतं. तेव्हा देहाचा असलेला माणूस जेव्हा देवाचा होतो तेव्हाच देहबुद्धी ही देवबुद्धी होते. ‘मी’ आणि ‘माझे’ला क्षणोक्षणी जपत जगणं हे खरं तर एखादं मोठं ओझं घेऊन जगण्यासारखंच आहे, हे आपल्याला जाणवतही नाही. त्या ओझ्यातला किंचित भारदेखील कमी झाला तरी आपण अस्वस्थ होतो. इतकं आपण त्या ओझ्याला सर्वस्व मानून, त्या ओझ्यावर विसंबून आणि अवलंबून जगत असतो. ती देहबुद्धी जेव्हा नष्ट होते तेव्हाच ‘मी’चं मरण होतं. ‘मी’च नष्ट झाला की ‘माझे’चा पसाराही क्षणार्धात संपतो. आधी ‘मी’पणानं जगणारा मी हा एकदेशी होता. अहंकाराच्या एकमात्र स्थितीने जगणं व्यापलं होतं. या ‘मी’पणाच्याच भिंगातून मी जगाला बघत होतो. या ‘मी’पणाच्याच ओढीनं मी जगत होतो. माझा समस्त व्यवहार, वावर, क्रिया आणि प्रतिक्रिया या केवळ ‘मी’पणावरच आधारित अर्थात एकदेशीच होत्या. जेव्हा या स्थितीचा त्याग झाला ती खरी शुभघटिका होती. तो खरा सुकाळ होता. ‘मी’ आणि ‘माझे’ या संकुचितपणापासून मी दूर झालो त्यामुळे माझे जन्ममरणाचे सुतकही फिटले, नाहीसे झाले. सुतक कधी लागतं? आपल्या आप्तजनांच्या गोतावळ्यात कुणाचा जन्म होतो तेव्हा सोयर  लागतं, कुणाचा मृत्यू झाला तर सुतक लागतं. जेव्हा ‘मी’ आणि ‘माझे’ काही उरलंच नाही, सर्व काही एकाच परमात्मसत्तेनं व्यापून आहे, अभेद आहे तर मग कोणाला कोणाचं सुतक लागणारं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा