शेवटचा भाग सुरू करीत असताना कालच्या भागाबद्दल एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. भावप्रवाहात जे लिहिलं, त्यातून श्रीमहाराज पुन्हा दुसऱ्या रूपात अवतरले आहेत, असा समज कुणी करून घेऊ नये. श्रीमहाराजांना त्यांच्या विचारातच पाहण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांनी दिलेलं नाम अंत:करणात गोंदवून घ्यावं! तेच त्यांचं खरं दर्शन आहे. असो. आता मुख्य विषयाकडे वळू. भौतिकाचं आमचं रडगाणं इतकं तीव्र आहे की त्या कलकलाटात, श्रीमहाराजही आमच्याकडे काहीतरी मागत आहेत, हे ऐकूही येत नाही. ते काय मागतात? श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एकदा म्हणाले, ‘‘मंदिराबाहेर भिकारी असतो ना, तो येणाऱ्या-जाणाऱ्याकडे आशाळभूतपणे पाहत असतो. निदान हा तरी मला भीक देईल, असं त्याला प्रत्येकाकडे पाहून वाटत असतं. अगदी त्याचप्रमाणे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे आशाळभूतपणे पाहून मलाही वाटतं की, हा तरी माझं ऐकेल, हा तरी नाम घेईल!’’ श्रीमहाराजांची ही कळकळ आपल्यापर्यंत पोहोचते का? ती पोहोचून त्यांच्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न आपण सुरू करतो का? तो प्रयत्न केला तर त्यात लाभ त्यांचा आहे की आपला? काय होईल तसं वागल्यानं? तर निदान आपण माणसासारखं तरी जगू लागू! सिद्ध जाऊ दे, साधकही जाऊ दे, निदान चांगला माणूस होण्यासाठी तरी श्रीमहाराजांच्या बोधानुरूप जगण्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. आपण माणूस म्हणून जन्मलो आहोत तर माणसासारखंच जगलंही पाहिजे. आपलं हे चिंतन श्रीमहाराजांच्या ज्या वाक्यापासून सुरू झालं तिथे आपण परतलो आहोत. ते वाक्य असं होतं, ‘‘मनुष्य म्हणून जन्मलेला माणूस, माणूस म्हणून मेला तर खरा.’’ तेव्हा माणूस होण्यासाठी तरी त्यांच्या मार्गानं चालू. निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे? कधी साधेल, कधी चुकेल; पण यालाच तर अभ्यास म्हणतात ना? तेव्हा हा अभ्यास आपण अखेपर्यंत करीत राहू. आपलं हे चिंतन आता संपलं. श्रीमहाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षांत त्यांचं स्मरण साधलं, याचा आनंद अपार आहे. खरंच श्रीमहाराजांचा बोध वाचू शकलो, त्यावर लिहू शकलो, माझ्या शब्दज्ञानाचं सार्थक झालं. पण हेदेखील कसं म्हणावं? माऊलींनी रेडय़ाच्या तोंडून वेद वदविले, यात त्या रेडय़ाचं सामथ्र्य ते काय? पण जर लोक भुलून कल्पना करू लागले की, ‘‘हा रेडा फार ज्ञानी असला पाहिजे, वेदाचं ज्ञान त्याच्याकडून घेतलं पाहिजे,’’ तर काय होईल? त्यावर कडी म्हणजे त्या रेडय़ालाही भ्रम झाला आणि तो ‘आपलं’ ज्ञान पाजळायला पुढे सरसावला, तर काय होईल? आपणच कल्पना करू शकता. तेव्हा खरं लक्ष रेडय़ाकडे नव्हे तर ज्यानं वदवून घेतलं त्या माऊलीकडेच पाहिजे. आपलं सदर इथेच पूर्ण झालं. चिंतनाच्या ओघात कुणाचं मन दुखावलं असेल तर त्यांनी क्षमा करावी. श्रीमहाराजांच्या अथांग चरित्र व बोधसागरातून भरलेली माझी ओंजळ रिती झाली आहे आणि हात कृतज्ञतेनं जोडले गेले आहेत. मी आपणा सर्वाचा अत्यंत ऋणी आहे. नमस्कार.
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम।। (समाप्त)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा