जपासाठी अधिक वेळ काढायचा तर मग जगाच्या नादी वाया जाणारा वेळ आणि माझ्या मनाच्या ओढीमुळे वाया जाणारी शक्ती या दोन्हीची बचत करावी लागेल. त्यासाठी ‘फार’चाच नियम लागू आहे! आपण ‘फार नेम करू नये,’ या वाक्यापुरतं श्रीमहाराजांच्या शब्दाबाहेर जात नाही पण इतर कितीतरी गोष्टी फार करतोच आणि त्यात फार वेळ आणि फार शक्ती वाया घालवतोच! आपण फार बोलतो, फार खातो, फार ऐकतो, फार वाचतो, फार खर्चतो, फार चिंता करतो.. कितीतरी ‘फार’ आहेत जगण्यात. त्यामुळे हा सर्व ‘फार’पणा कमी करण्याचा अभ्यास आपल्याला करावाच लागेल. तो स्वतपुरताच असावा. इतरांना कळू न देता असावा. अमुक जप झाल्याशिवाय मी खात नाही, हे स्वतलाच फक्त माहीत असावं आणि मग खाण्याची ओढ मनात किती आहे, हे तपासावे. पू. बाबा बेलसरे यांनीही एके ठिकाणी म्हटलं आहे की, कितीतरी गोष्टी आपल्याला पहाव्या लागतात आणि त्यात ओढीने आणखी कितीतरी गोष्टी आपण पाहातो त्या वेगळ्याच. कितीतरी गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्यात ओढीने आपण आणखी कितीतरी गोष्टी ऐकतो त्या वेगळ्याच. आपण आपल्याकडे पाहिलं तर बाबांच्या बोधातलं वास्तव लक्षात येईल. तेव्हा गरजेव्यतिरिक्त अधिक जे ओढीनं होतं त्यावर नियंत्रण आणता येतं का, याचा स्वतशी अभ्यास करावा. नेमाला नियमांचं कुंपण घालावं. नियमांचं कुंपण कुठवर असतं? श्रीमहाराज सांगतात- ‘‘ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा; तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या नकळत, परंतु अत्यंत आवडीने करावा.’’ (२६ जूनच्या प्रवचनातून) तेव्हा झाड वाढावं, जपलं जावं यासाठी कुंपण असतं. नेम वाढावा, जपला जावा यासाठीच नियमांचं कुंपण आहे. एकदा परमार्थाचं झाड वाढलं की कुंपण आपसूक गळून पडतं. ते लहान असताना त्याला गुराढोरांची भीती होती. ही गुरंढोरं म्हणजे विकार-वासना. परमार्थ बेताचा आणि दुनियेची ओढ विलक्षण, अशा स्थितीत विकार-वासनेची गुरंढोरं उपासनेचं रोपटं फस्त करण्याचीच शक्यता अधिक. आता हे फस्त करणं म्हणजे काय? तर मोडकातोडका जप सुरू असतानाच विकार आणि वासनेच्या विचारातच तो जप वाहवत जातो आणि इतकेच नव्हे तर विकारपूर्ती आणि वासनापूर्तीसाठी जप वापरलाही जातो. ‘मी इतका जप करतो मग माझी ही एवढीशी इच्छा का नाही पूर्ण होत,’ हे गुरानं रोपटय़ाला तोंड लावणं आहे! मग वासनापूर्तीच्या तराजूवरून जप तोलला जातो. श्रीमहाराजांच्या करुणेचं मोजमाप सुरू होतं. तेव्हा हे टाळण्यासाठी नियमांचं कुंपण आहे. एकदा झाड वाढलं की ज्या गुराढोरांची त्याला भीती होती तीच गुरंढोरं त्या मोठय़ा झालेल्या झाडाला खुशाल बांधून टाकता येतात! उपासना इतकी वाढत जाते की विकार आणि वासना खुज्या होत जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा