आपल्या माणसाला जडलेल्या सवयी मोडण्याची प्रक्रिया महाराज कशी सुरू करीत, हे आपण गेल्या भागात पाहिलं. कित्येकदा होतं काय की आपण स्वप्नं मोठीमोठी पाहातो, पण त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत, याचा विचार करीत नाही की प्रत्यक्षात तसे प्रयत्न चिकाटीने सुरूही करीत नाही. आपल्याला आत्मज्ञान व्हावं, हे स्वप्न तर सर्वात मोठं! पण ते व्हावं यासाठी आपल्या बाजूने आपण काय काय स्वीकारू इच्छितो आणि काय काय नाकारू इच्छितो? आपल्यात काय काय बाणवू इच्छितो आणि आपल्यातलं काय काय त्यागू इच्छितो? प्रत्यक्षात आपण जे सवयीच्या विरुद्ध आहे, देहसुखाच्या विरुद्ध आहे ते काहीच स्वीकारू इच्छित नाही की बाणवू इच्छित नाही. जे आपल्या सवयीचं आहे, देहसुखाचं आहे ते काहीच नाकारू इच्छित नाही की त्यागू इच्छित नाही. मग आहे तसंच राहून भव्य असं आंतरिक परिवर्तन कसं साधेल? आपण आपल्या क्षुल्लक सवयीसुद्धा जर सोडू शकत नाही तर आत्मज्ञानासाठीची दीर्घ वाटचाल कशी करणार, हा विचारही आपण करीत नाही. महाराज मात्र अगदी तळापासून बदल घडवू इच्छितात. ल. ग. मराठे यांनी संकलित केलेल्या ‘हृद्य आठवणी’मध्ये एक प्रसंग आहे. रेल्वेतला एक बडे अधिकारी श्रीमहाराजांकडे येत असत. त्यांची शरीरप्रकृती चांगली होती आणि फिरायची खूप आवड होती. त्यामुळे त्यांची देशातली बहुतेक सर्व तीर्थक्षेत्रं पाहून झाली होती. श्रीमहाराज दोनदा नैमिष्यारण्यात जाऊन आले होते. त्यामुळे त्यांनाही वाटलं की आपणही नैमिष्यारण्यात जावं. ते महाराजांना भेटले आणि नैमिष्यारण्यात कसं जावं, याबद्दल मार्गदर्शन करा, असं सांगू लागले. श्रीमहाराज त्यांना म्हणाले की, ‘तुमची कल्पना चांगली आहे, पण नैमिष्यारण्यात अजून तितकीशी लोकवस्ती व सोय नाही. आपणास पहाटे अंथरुणात जाग येताच चहा लागतो, तो न मिळाला तर आपल्याला फार राग येतो. तो सोडायचा प्रयत्न आपण आधी करू. तो यशस्वी झाला म्हणजे नैमिष्यारण्यात जाण्याचा बेत ठरवू. कारण नैमिष्यारण्यात चहाच काय, पण जेवणसुद्धा मिळेल की नाही, याची पंचाईत पडते.’ श्रीमहाराजांचे शब्द ऐकताच ते गृहस्थ वरमले. जाग येताच चहा मिळाला नाही तर ते पत्नीवर चिडत असत आणि तिला टाकून बोलतही असत. त्यामुळे महाराजांच्या शब्दांनी त्यांना एकदम आपल्या सवयीची आठवण झाली आणि ती सवय आपल्या नैमिष्यारण्य यात्रेच्या आड कशी उभी ठाकेल, हे जाणवलं. आपल्यालाही अशा कित्येक सवयी जडल्या असतात. जाणवूही नये इतक्या त्या फार क्षुल्लकदेखील असतात, पण त्यातली कुठली सवय कधी उग्र रूप धारण करून आपला घात करील, हे काही सांगता येत नाही. तेव्हा श्रीमहाराज ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार वगैरे उदात्त गोष्टी न सांगता आधी आपल्या माणसाला हाताशी धरतात, त्याच्या सवयी मोडायची प्रक्रिया आरंभतात, त्याला स्वच्छ करू लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा