श्रीगोंदवलेकर महाराजांसह सर्वच संतांनी पैशाच्या मोहावर टीका केली आहे. व्यवहारात पैशावाचून काही चालत नाही, त्यामुळे ज्याला व्यवहारातही राहायचे आहे त्याला पैशाची गरज लागतेच. संतांनीही म्हणूनच पैशावर टीका केलेली नाही तर पैशाच्या आसक्तीवर टीका केली आहे. आता अशा पाश्र्वभूमीवर साधकाने पैशाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे, याचा विचार करू. त्याआधी पैशावरील टीकेचे आणखी एक कारणही लक्षात घेऊ. हे जग स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन गोष्टींनी घडलेलं आहे. स्थूल अर्थात दृश्य- भौतिक- लौकिक जगताला आपण प्रपंच म्हणतो. या भौतिकातील समस्त व्यवहाराचा एकमेव आधार आहे, पैसा! सूक्ष्म अर्थात अदृश्य- अलौकिक जगताला आपण परमार्थ म्हणतो. या परमार्थाचा एकमेव आधार आहे परमात्मा. माणूस हा स्थूल आणि सूक्ष्म या दोहोंतून साकारला आहे. माणसाचा देह स्थूल आहे, साकार आहे, दृश्यरूप आहे. त्याचे अंतरंग मात्र सूक्ष्म आहे. सूक्ष्म हे अधिक शक्तिमान असते. त्यामुळेच सूक्ष्माचा प्रभाव फार मोठा असतो. मन, चित्त, बुद्धी, अहंकार या सूक्ष्म अंतरंगात माणूस जे काही मनन करतो, चिंतन करतो, बोध करतो, विचार करतो त्यातूनच दृश्यातील त्याचं जगणं, त्याची कृती साकारत असते. दृश्यातील त्याचं वर्तन जर चुकीचे असेल आणि ते सुधारायचे असेल तर मुळात सूक्ष्मातला बिघाड दूर करावा लागतो. त्याचं दृश्यातील आचरण सुधारायचं असेल तर मन, चित्त, बुद्धीत सुधारणा अनिवार्य असते. आता दृश्य-भौतिक जगातील व्यवहाराचा आधार आहे पैसा आणि पारमार्थिक जगातील अनुसरणाचा आधार आहे परमात्मा. त्यामुळे भौतिकातील वावर आणि व्यवहार पैशाच्या आधारे करीत असतानाच परमार्थात भगवंताचा आधार दृढ करून अंतरंगात पालट साधता आला तर हळुहळू सूक्ष्माचा प्रभाव व्यापक होत माझं भौतिक जगणंही पारमार्थिकच होऊन जाईल. इथेच एक समस्या उद्भवते ती अशी की भौतिकातील व्यवहार पैशाच्या आधारे करता करता सूक्ष्मातही भगवंताऐवजी पैशाचीच ओढ उत्पन्न होते! पैशाचाच आधार मोठा वाटतो. पैशाचा आधार भगवंतापेक्षा अधिक खरा आणि अधिक आश्वासक वाटतो! पैसा हा इतका खोलवर बिघाड करतो, घात करतो. प्रत्यक्षात पैशापेक्षा पैशाचा लोभ फार घातक असतो. पैशाचा लोभ एकदा जडला की परमार्थाची नासाडी झालीच समजा. अहंकारामुळे माणूस खुजा बनतो आणि त्याच्या अहंकाराला सर्वाधिक खतपाणी पैसाच घालतो. श्रीगोंदवलेकर महाराज यांचं एक चकवा असलेलं वाक्य आहे. ते म्हणतात, ‘‘लहानपणी, बालपणी वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा आणि दुसरे विद्या. दोन्हीपासून ‘मी कोणीतरी आहे’ ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते’’(चरित्रातील पैसाविषयक बोधवचने, क्र. २). आता या वाक्यात चकवा काय? चकवा म्हणजे त्या वाक्यातून जे समजल्याचं आपल्याला वाटतं तेवढाच त्याचा आशय नसतो. ‘आपल्याला समजलं’, हे गृहीत धरणं ही फसगतच असते म्हणून हे वाक्य पुन्हा नीट वाचा.
९३. सूक्ष्मावर प्रभाव
श्रीगोंदवलेकर महाराजांसह सर्वच संतांनी पैशाच्या मोहावर टीका केली आहे. व्यवहारात पैशावाचून काही चालत नाही, त्यामुळे ज्याला व्यवहारातही राहायचे आहे त्याला पैशाची गरज लागतेच. संतांनीही म्हणूनच पैशावर टीका केलेली नाही तर पैशाच्या आसक्तीवर टीका केली आहे. आता अशा पाश्र्वभूमीवर साधकाने पैशाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे, याचा विचार करू.
आणखी वाचा
First published on: 13-05-2013 at 02:50 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan effect on the micros