प्रपंच, व्यवहार यांच्या पकडीत जगत असलेल्या आपल्यासारख्या साधकांच्या आंतरिक स्थितीची आणि आपल्या आवाक्याची श्रीगोंदवलेकर महाराज यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच ते सांगतात, ‘‘आपल्यासारख्या व्यवहारी प्रापंचिक माणसांना चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे, व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की, भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार बरोबर करू शकत नाही. तुकारामबुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान झालेल्या पुरुषांची गोष्ट निराळी. आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तरी आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल. खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात, आपण स्वत:देखील त्याच्या आड येतो, तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले नाम चालू ठेवावे. शिवाय, देवासंबंधी संतांनी लिहिलेली पुस्तके रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावे, आणि ते आपल्या आचरणात कसे येईल, याचा सूक्ष्म विचार करावा. अशा मार्गाने जो जाईल त्याची हां हां म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल’’ (७ फेब्रुवारीच्या प्रवचनातून). श्रीमहाराजांच्या मठात काहीजण रोज दोन तास जपासाठी जात असत. एकदा मठाकडे जात असताना त्यांच्यात चर्चा झाली की, मठाकडे येण्या-जाण्यात वेळ जातो. त्यापेक्षा या वेळात घरीच बसून जप केला की माळासुद्धा जास्त होतील आणि श्रीमहाराजांनाही ते आवडेल. आपण स्वत:सुद्धा नामाच्या आड कसे येतो, याचा हा दाखलाच आहे! आपलं मन फार चतुर असतं. नाम किंवा उपासना टाळण्यासाठी ते तत्त्वाचा बेमालूम मुखवटा घेतं. तर ही मंडळी मठात आली आणि श्रीमहाराजांचं मत विचारावं, असं त्यांनी ठरवलं. म्हणजे आतून सुप्त इच्छा अशीही होती की महाराजही लगेच रूकार देतील आणि घरीच बसून जप करीत जा, म्हणतील. श्रीमहाराज हसले आणि म्हणाले, इथे येण्या-जाण्यात आणि जपात दोन तास जातात. खरे तर या दोन तासांचा हा प्रश्न नाही तर उरलेल्या बावीस तासांत आपण काय करतो, हा खरा प्रश्न आहे! आपणही आपल्याशी विचार करा, जपाचा ठरलेला वेळ सोडला तर उरलेला वेळ आपण काय करतो? आपल्या असं लक्षात येईल की बराचसा आपला वेळ फुकट जात असतो. त्या वेळात प्रपंचाचं कोणतं कामही आपण करीत नसतोच. ‘शिंक, जांभई, खोकला तितुका वेळ वाया गेला’, ही समर्थ रामदासांची पातळी आपण गाठू शकत नाही. त्यातही जाणारा वेळ त्यांना वाया गेल्याचं वाटे! ते सोडा, पण अकारण किती वेळ आपला असाच नामाशिवाय जातो, याचं आत्मपरीक्षण आपणच केलं पाहिजे. त्या स्वतपासणीची काहीतरी प्रक्रिया आपणच आपल्यापुरती तयार केली पाहिजे.

Story img Loader