नारद मंजुळ सुस्वरे गीत गाय। मार्गी चालताहे संगे हरी।। तुका म्हणे त्याला गोडी किर्तनाची। नाही आणिकांची प्रीती ऐसी।। असा साधक मग सुस्वरात अर्थात एकरसयुक्त अशा एकसुरात, अंतरात्म्याशी एक लय साधणाऱ्या स्वरात त्या परमात्म्याचंच गुणगान करीत, नामगान करीत, लीलागान करीत जगू लागतो आणि त्याला सत्संग असतो तो केवळ त्या हरीचा. हरी म्हणजे हरण करणारा. ‘मी’पणाचं आणि त्यासकट समस्त दु:खाचं हरण करणारा हरी म्हणजे सद्गुरूच. त्या हरीचा बोध, त्या हरीचा पाठ तो हरीपाठ. त्यानुसार जगण्यात साधकाला आनंद वाटू लागला की मग त्याला केवळ त्याचीच गोडी उरते. आसक्तभावानं जगात असलेली गोडी पुरती ओसरते. इतर कशाची प्रीती उरत नाही. आता जो असा हरिमय जीवन जगत आहे, त्याला कसली भीती उरेल? मग नुसत्या चिंतनाची ही कथा तर तो हरीच जिथे स्वये निजसामथ्र्ये नांदत आहे तिथे म्हणजे त्या पातळीवर भक्तही राहू लागला तर? मग सर्वात मूळभीती अशी काळाची भीतीही उरणार नाही. ‘‘हो कां जे द्वारकेआंत। न रिघे भय काळकृत। जेथ स्वयें श्रीकृष्णनाथ। असे नांदत निजसामथ्र्ये।। दक्षशापु नारदासी पाहीं। मुहूर्त राहों नये एके ठायीं। तो शापु हरिकीर्तनीं नाहीं। यालागीं तो पाहीं कीर्तननिष्ठु।। ज्याची गाइजे कीर्तनीं कीर्ती। तो द्वारकेसी वसे स्वयें श्रीपती। तेथें शापबाधेची न चले प्राप्ती। यालागीं नित्यवस्ती नारदासि तेथें।।’’ मग ही स्थिती प्रत्येकाला प्राप्त व्हावी, या हेतूने एकनाथी भागवतात म्हंटलं आहे की, शाश्वत सुखाची प्राप्ती करण्यासाठी माध्यम म्हणून उत्तम असा मनुष्यजन्म मिळाला. असे असूनही जो शाश्वताऐवजी अशाश्वताचंच भजन करण्यात दंग आहे त्याला माया गिळणार यात शंका नाही. (ऐकें बापा नृपवर्या। येऊनि उत्तमा देहा या। जो न भजे श्रीकृष्णराया। तो गिळिला माया अतिदु:खें।।)  परमसुखासाठी परमात्मा हाच एकमात्र साधन असताना लोक इतर अनेक गोष्टींना सुखाची साधनं मानून शिणतात. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘कारणाचा आनंद हा कारणापुरता टिकतो’. ज्या कारणामुळे मला सुख मिळतं असं मी  मानतो ते कारण दुरावलं की माझा आनंदही दुरावतो. त्यातून आनंदाचं कारण भासणाऱ्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती मिळविण्याच्या आणि टिकवण्याच्या इच्छेच्या दृढबंधनातच मी अडकतो. मग जो एकदा मिळाला की कधीच दुरावत नाही आणि जो आनंदाचं निधान आहे, अशा परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच मी का प्रयत्न करू नये? (त्यजूनि परमात्मा पूर्ण। नाना साधनें शिणती जन। त्यासी सर्वथा दृढबंधन। न चुके जाण अनिवार।।) माणसाचा धडधाकट देह मिळाला असतानाही जो सद्गुरूंच्या चरणाशी राहात नाही, म्हणजे त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालत नाही त्याचं निर्दालन क्षणोक्षणी काळ करीतच असतो. (असोनि इंद्रियपाटव पूर्ण। जो न भजे श्रीकृष्णचरण। त्यासी सर्वत्र बाधी मरण। क्षणक्षण निर्दाळी।।) यातली एक गूढ ओवी आहे ती म्हणजे- सांडूनि श्रीकृष्णचरण। इंद्रादि देवांचें करितां भजन। ते देव मृत्युग्रस्त पूर्ण। मा भजत्याचें मरण कोण वारी।। तिचा अर्थ पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा