सतत नाम घेणारा समजा ते नाम ‘समजून’ म्हणजे ‘राम कर्ता’ या भावनेनं घेत नसला तरीही हळूहळू त्या नामानंही त्याच्या मनात किंचित का होईना, पालट घडू लागतो. नामस्मरण आणि त्या जोडीला श्रीमहाराजांचा जो बोध आहे त्याचं मनन, चिंतन सुरू केलं तरी त्याची धारणाशक्ती वाढू लागते. जगाकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलू लागते. योगाच्या भाषेतही या प्रक्रियेची उकल करता येते. पातंजल योगसूत्रांतील विभूतीपादातील पहिले तीन श्लोकच पाहा. हा विभूतीपाद अंतरंग साधनेचं विवरण करणारा आहे. त्यात पहिलाच श्लोक आहे- देशबन्धश्चित्तस्य धारणा।। म्हणजे चित्ताला कोणत्या तरी देशावर म्हणजे स्थानावर जणू बांधून ठेवल्यासारखं स्थिर करणं ही धारणा आहे. आता आपण नाम घेतो म्हणजे तरी सुरुवातीला काय करतो? तर नाम घेत असताना आपले सर्व विचार, सर्व भावना, सर्व कल्पना या श्रीमहाराजांपाशी केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो! भौतिकाच्या विचारांचा झंझावात न उठता केवळ श्रीमहाराजांचाच विचार आणि नामस्मरण साधलं की आपणही म्हणतो, आज नाम फार चांगलं झालं! जेव्हा नाम घेताक्षणीच मन आपोआप भौतिकाच्या विचारांच्या प्रभावातून सुटून महाराजांपाशी सहजपणे केंद्रित होऊ लागेल तेव्हा ‘धारणा’च साधेल. मग जेव्हा ही धारणा सतत टिकेल तेव्हा? ‘तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम्।।२।।’ नाम घेताना मनात जी उच्च भावना निर्माण होते ती नंतरही टिकून राहाणं, अर्थात नाम घेताना महाराजांच्या सहवासाचा जो प्रत्यय आला तो खंडित न होता, एकतानतेनं त्याचा अनुभव येत राहाणं हेच ‘ध्यान’ आहे! नाम घेताना आपलं मन, आपल्या चित्तवृत्ती अनेकदा उचंबळून येतात. महाराजांच्या प्रेमानं अंत:करण भरून जातं. नामस्मरण संपलं आणि भौतिक व्यवहार सुरू झाले की मन पूर्ववत इतकं हिशेबी, स्वार्थी, मतलबी होतं की हेच मन मगाशी इतकं भावनाशील झालं होतं का, असा प्रश्न पडावा! तेव्हा नामस्मरणाच्या वेळी मनाची जी भावनिक उंची होती तीच टिकून राहाणं, मन परमात्मविचारापासून दूर न होणं, हे ध्यान आहे आणि ते जगव्यवहारातही टिकू शकतं, असा संतांचा निर्वाळा आहे. आपल्या मनात येईल, की मनाची स्थिती अशी झाली तर व्यवहार कसा जमेल? जणू काही, मनाची अशी स्थिती आपल्याला सहजसाध्य आहेच! इथे रामकृष्ण परमहंसांचा दृष्टांत समर्पक आहे. ताकात लोणी असतंच. ताक घुसळलं की ते निघतं. मग तो लोण्याचा गोळा पाण्यात ठेवला तरी तरंगतो. त्यात मिसळून जात नाही. तसं अंत:करण म्हणजे भगवंताच्या प्रेमरूपी लोण्यासारखं बनलं तर भवसागरात ते मिसळून जाणार नाही. उलट तरंगेल. म्हणजेच व्यवहारही सांभाळला जाण्याची चिंता ज्याचं नाम आणि ध्यान सुरू आहे त्यालाच लागेल. व्यवहार काही परमात्मा करणार नाही. व्यवहार साधकाकडूनच पार पाडला जाईल. अगदी अचूक पार पाडला जाईल. पण त्याचं चित्त त्यात लिप्त होणार नाही, याची काळजी ते नामच घेईल. जेव्हा असं ‘ध्यान’ आपोआप जगताना होऊ लागेल तेव्हा ‘समाधी’ची स्थितीही उमलेल.
२४०. नामरंग
सतत नाम घेणारा समजा ते नाम ‘समजून’ म्हणजे ‘राम कर्ता’ या भावनेनं घेत नसला तरीही हळूहळू त्या नामानंही त्याच्या मनात किंचित का होईना, पालट घडू लागतो.
आणखी वाचा
First published on: 10-12-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan focus