जीवनात श्रीमहाराजांनी प्रवेश केला. गढूळ पाण्यात तुरटी फिरली की पाण्याचा एकही अंश तुरटीच्या प्रभावातून सुटत नाही. तसं गढूळ जगण्यात श्रीमहाराज आले आणि जगणं हळूहळू त्यांच्याच विचारानं व्यापू लागलं. श्रीमहाराजांच्या चरित्र आणि बोधाचा संग इतका अतूट झाला की जगण्यातल्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाताना त्यांच्या चरित्रातला प्रसंग अथवा बोधवचन आठवे आणि काय करावं, काय करू नये, याचं मार्गदर्शन होई. ते वागण्यात दरवेळी येईच, असं नव्हे. माझ्यासारख्या जडमूढ जिवाच्या जीवनात या प्रक्रियेला वेग आला तो श्रीगुरुदेवांच्या साक्षात् सहवासानं. त्यांच्या घरात प्रथम पाऊल टाकलं तेव्हा आपण जणू गोंदवल्यातच पाऊल टाकलं आहे, असं आतून अगदी  स्पष्ट जाणवलं. तरी एकदा काहीशा धाडसानं श्रीगुरुदेवांना म्हणालो, ‘‘शंभर वर्षांपूर्वी तुम्ही इतके कठोर नव्हता!’’ श्रीगुरुदेव तात्काळ म्हणाले, ‘‘शंभर वर्षांपूर्वीइतके तुम्ही तरी सर्व जण कुठे सरळ मनाचे आहात?’’ मग म्हणाले, ‘‘आणखी शंभर वर्षांनी आणखी कठोर व्हावं लागेल!’’ किती खरं आहे पहा. या सृष्टीत अनंत रूपांद्वारे सद्गुरू अनंत वेळा अवतरले, पण भौतिकासाठीचं आमचं रडगाणं काही संपलं नाही आणि पुढेही कधी संपणार नाही. एक प्रसंग आठवतो. भौतिकासाठीच्या या रडारडीला विटून एकदा श्रीगुरुदेवांनी सर्वाना बजावलं, ‘‘मला कुणीही तोंड दाखवू नका’’. खरंतर प्रत्येकाची कितीतरी कामांची यादी बाकी होती! कुणाचं टेंडर अडलं होतं, कुणाला बंगल्यावर दुसरा मजला चढवायचा राहिला होता, कुणाच्या मुलीचं लग्न ठरत नव्हतं. तेव्हा गुरुदेवांनी नाराज राहाणं, परवडणारं नव्हतं. श्रीगुरुदेव तेव्हा परगावी निघाले होते आणि गाडी इलाहाबाद स्थानकात पोहोचली तेव्हा मोठय़ा धाडसानं अनेक शिष्य डब्यात शिरले. या वेळी तर कित्येकांनी हजार-हजार रुपयेही गुरुदेवांच्या चरणी ठेवले. ते पाहून तर ते अधिकच संतापले आणि प्रत्येकाला फैलावर घेऊ लागले. खडसावून म्हणाले, ‘‘आता माझा सौदा पक्का आहे. ‘राम की काम’? काम हवा तर बाजारात चालते व्हा, राम हवा तरच माझ्याकडे या.’’ मग क्षणभर शांत झाले. डब्यातही स्मशानशांतता होती. तोच खिडकीतून स्वर आला, ‘‘एक रुपिया दे दे बाबू’’.. गुरुदेवांनी मान वळवून पाहिलं. एक जख्ख म्हातारी भिकारीण उभी होती. त्यांनी लगेच पायाशी पडलेल्या नोटांकडे पाहिलं आणि क्षणार्धात सगळ्या नोटा उचलून तिच्या कटोरीत टाकल्या. त्या पाहताच तिच्या हातून कटोरी गळून पडली आणि हात जोडून थरथरत रडत ती जोरजोरात म्हणाली, ‘‘मुझे भीक नहीं, मुझे मुक्ती दे दो महाराज.. मुझे मुक्ती दे दो!’’ मला भीक नको, मला मुक्ती द्या! आजही तो प्रसंग डोळ्यासमोर आला की अंगावर काटा येतो. जिला भीक मागण्याचा पूर्ण अधिकार परिस्थितीनं दिला होता, तिला महाराजांकडे काय मागायला पाहिजे हे कळलं होतं आणि आमची परिस्थिती खाऊन-पिऊन सुखाची असूनही आमचं भौतिकासाठीचं भीक मागणं सुटलं नव्हतं. श्रीमहाराजांकडे खरं काय मागितलं पाहिजे हे तिनंच शिकवलं.

Story img Loader