भगवंताचं होऊन राहायचं, हा उपासनेचा चरमबिंदू जो आहे त्याकडे आपण पाहात आहोत. जे अखंड परमात्ममय आहेत, अशा सद्गुरूंचे होऊन राहाणं, हाच त्यासाठीचा एकमेव उपाय आहे. सद्गुरूंचं होणं म्हणजे त्यांचे आणि माझे विचार, त्यांचं आणि माझं ध्येय, त्यांची आणि माझी इच्छा, त्यांचा आणि माझा हेतू, त्यांची आणि माझी जीवनदृष्टी, त्यांची आणि माझी आवड-निवड एक होणं! ते होणं साधण्यासाठी त्यांच्याच बोधानुरूप वाटचाल करण्यावाचून गत्यंतर नाही. श्रीमहाराजांचा विचार, ध्येय, इच्छा, हेतू, जीवनदृष्टी, आवड केवळ एक परमात्माच आहे. त्यांना केवळ शाश्वताचंच महत्त्व वाटतं. आपल्याला अशाश्वताची ओढ आहे. त्यामुळे अशाश्वताच्या प्रभावाच्या पकडीतून सुटून शाश्वतात स्थिर होण्याचा एकमेव उपाय म्हणजे श्रीसद्गुरूंच्या बोधानुरूप आचरण, हाच आहे. त्यांचं होऊन जगणं हाच आहे. श्रीमहाराज सांगतात, ‘जो माझा म्हणवतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे’(२ जुलैच्या प्रवचनातून). मग आम्हाला नामाचं प्रेम का येत नाही? नाम तर आपणही घेतो, पण त्या प्रेमानं ते का होत नाही? श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत; रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढची काळजी आहे’’ (२ मार्चच्या प्रवचनातून). आता वस्तुस्थिती अशी की आपल्याला नामाची तळमळ मुळात नाहीच, तरी आपण साधुसंत सांगतात, श्रीमहाराजही सांगतात म्हणून नाम घेत आहोत. तळमळ पुढची गोष्ट झाली, मुळात ते नामच सातत्यानं, नियमितपणानं का चालत नाही, ही आपली अडचण आहे. तिचं उत्तरही श्रीमहाराजांच्या या बोधातून आलंच आहे. प्रपंच, व्यवहार, आठवणी आणि चिंता! आता प्रपंच कुणालाच सुटलेला नाही आणि श्रीमहाराजही तो सोडायला सांगत नाहीत, व्यवहार कुणालाच सुटलेला नाही आणि साधकानं व्यवहार अधिक अचूकपणे केला पाहिजे, असंही श्रीमहाराज बजावतात. मग नामाच्या आड येणारा प्रपंच आणि व्यवहार नेमका कोणता असावा? तर आकुंचित प्रपंच आणि कर्तव्यपूर्तीचे भान न बाळगता मोहासक्तीतून होणारा व्यवहार हाच नामाच्या आड येणारा प्रपंच-व्यवहार आहे. त्यासाठी साधकानं प्रपंच नेमका कसा करावा, व्यवहार नेमका कसा करावा, मागच्या आठवणी का व कशा विसराव्यात आणि उद्याची चिंता का व कशी करू नये; याबाबत श्रीमहाराजांच्या बोधाचाच आधार घट्ट धरून आपण आपल्याच प्रपंचात, आपल्याच व्यवहारात आणि आपल्याच वृत्तीत सुधारणा करण्याचे ध्येय बाळगून आपण त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता आपल्याला वाटेल, प्रपंचाची एक घडी ठरून गेली आहे, व्यवहाराचीही एक रीत ठरून गेली आहे. ती बदलणे आपल्या ताकदीबाहेरचे काम आहे. चिंता, काळजी, कल्पना सोडणेही आपल्या आवाक्यातले नाही. श्रीमहाराज सांगतात, ‘‘ज्याचे ध्येय ठरले तोच खरा विद्वान. ध्येय ठरलेच नाही तर शक्ती येत नाही. जेवढे कार्य तेवढेच अवसान असते’’ (बोधवचने, क्र. ६९९).

Story img Loader