आपली ही सर्व चर्चा कोणत्या मुद्दय़ावरून सुरू झाली? ती ‘काळजी’ या विषयावरून सुरू झाली. श्रीगोंदवलेकर महाराज यांची तीन वाक्ये या चर्चेचा आधार आहेत. ‘आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला’, ‘काळजी फार भयंकर आहे व ती भगवंताच्या नसणेपणातच आहे. मायेचा पडदा इतका जोरदार आहे की, भगवंत आहे असे वाटत असूनही काळजी लागते हे खरे’ आणि ‘भगवंताच्या भक्तीत लागून मनापासून नाम घेत गेल्याने राम कृपा करतो व काळ आपल्यापुढे जी जी करू लागतो.’ या वाक्यांवरून असे जाणवते की, भगवंताच्या नसणेपणाने काळजी लागत असेल तर त्याच्या अस्तित्वभावनेतून ती नष्टही झाली पाहिजे. त्याची अस्तित्वभावना चिरंतन राखणाऱ्या नारदमुनींच्या निमित्ताने आपण ‘एकनाथी भागवता’चा आधार घेत एका गूढ ओवीशी येऊन थबकलो आहोत. ती ओवी म्हणजे- ‘‘सांडूनि श्रीकृष्णचरण। इंद्रादि देवांचें करितां भजन। ते देव मृत्युग्रस्त पूर्ण। मा भजत्याचें मरण कोण वारी।।’’ यातल्या ‘देव’चा एक अर्थ आपण पाहिला तो म्हणजे ‘दाता’. आपल्याला कथित सुख देणारी इंद्रिये तसेच अनुकूल वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती यांना आपण ‘दाता’ मानत आहोत आणि या सर्व गोष्टी काळाच्या अधीन असल्याने मृत्युग्रस्त आहेत, असा एक अर्थ आपण पाहिला. आता आणखी खोलवर विचार केला की जाणवतं, ‘मृत्युग्रस्त’ हे विशेषण देवांना लावलं आहे, श्रीकृष्णाला अर्थात परमात्म्याला नव्हे! मग हे देव ‘मृत्युग्रस्त’ कसे? याचा उलगडा गीतेच्या नवव्या अध्यायात होतो. या अध्यायात दोन महत्त्वाचे श्लोक आहेत. ते असे- त्रविद्या मां सोमपा: पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते। ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्।। २०।। याचा भावार्थ असा की, वेदनिहित अशी सत्कर्मे करणारे व सोमरस पिणारे तसेच पापापासून पवित्र झालेले पुरुष माझे यज्ञाद्वारा पूजन करून स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करतात व त्यांना पुण्याचे फळ म्हणून इंद्रलोक प्राप्त होतो व तेथे स्वर्गात ते दिव्य देवांचे भोग उपभोगतात. त्यानंतर काय होतं? पुढचा श्लोक असा- ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति। एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते।। २१।। म्हणजे, त्या विशाल अशा स्वर्गलोकातील सुखे भोगून पुण्य क्षीण झाल्यावर ते मृत्युलोकाला प्राप्त होतात. याप्रमाणे स्वर्गप्राप्तीचे साधनरूप अशा सत्कर्माना शरण गेलेले व स्वर्गभोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार येणे व जाणेदेखील प्राप्त करून घेतात. अर्थात पुण्याच्या प्रभावाने ते स्वर्गात जातात व पुण्य क्षीण होताच मृत्युलोकी परत येतात. याचाच अर्थ ‘देव’ ही इंद्रलोकातली एक पदवीही आहे आणि ती जशी प्राप्त होते तशीच पुण्य क्षीण होताच हिरावलीही जाते आणि हे ‘देव’ पुन्हा मृत्युलोकीही जातात, याचाच अर्थ ते मृत्युग्रस्त आहेत! आता देवांना मृत्युग्रस्त म्हटल्याने आपल्या मनाला एक हादराही बसतो. त्या अनुषंगाने थोडा विचार करू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा