इसवी सन १८४५मध्ये श्रीमहाराज गोंदवल्यास देहावतारात आले आणि २२ डिसेंबर १९१३ रोजी त्यांनी महासमाधी घेतली. त्यानंतर १२ वर्षांनी म्हणजे १९२५ ते १९६७पर्यंत पू. तात्यासाहेब केतकर यांच्या माध्यमातून वाणीरूपात त्यांचा पुन्हा संग लाभला. असा ११० वर्षांतला त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा, एवढंच त्यांचं खरं चरित्र नव्हे! श्रीसद्गुरूंचं चरित्र हे अत्यंत व्यापक असतं. त्यांच्या प्रत्येक भक्ताचं जीवनदेखील त्यांच्या चरित्राचाच अभिन्न भाग असतो. त्या अर्थानं श्रीमहाराजांचं चरित्र आजदेखील अनेकांच्या जीवनातून आकारत आहेच. श्रीमहाराजांच्या अशा व्यापक चरित्रात अनेक सहजयोगी लपले आहेत. आपल्या जीवनाचा सर्व भार सद्गुरूंवर टाकून जो कर्तव्यर्कम करीत त्यांच्या स्मरणात जगतो आहे, तो भक्तदेखील याच चरित्राचा भाग आहे. गीतेत भगवंत सांगतात, ‘‘यो मां पश्यति सर्वत्र र्सवच मयि पश्यति। तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति।।’’ (ध्यानयोग). म्हणजे, जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यातच सामावलेलं आहे, हे पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही की तोदेखील मला कधीच दुरावत नाही. ज्यांचं जीवन असं महाराजमय झालं आहे त्यांना सहजयोग साधलाच आहे. पू. भाऊसाहेब केतकर, ब्रह्मानंद महाराज, श्रीआनंदसागर महाराज, नीळकंठबुवा, पू. तात्यासाहेब केतकर अशांच्या जीवनातून श्रीमहाराजांना वगळलं तर जन्म आणि मृत्यूच्या नोंदीशिवाय काही उरणारच नाही! त्या भक्तांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्याला प्रेरणा देतात. श्रीमहाराजांवरील त्यांच्या निष्ठेचं आणि प्रेमाचं दर्शन घडवितात. आनंदसागर हे एकदा एकादशीस महाराजांच्या दर्शनास गेले होते. महाराज त्यांना म्हणाले, ‘मी जरा जाऊन येतो, तुम्ही भजन करीत बसा. मी आल्यावर आरती करू.’ महाराज जे गेले ते दुसऱ्या दिवशी आले. तोवर आनंदसागर स्वस्थपणे भजन करीत बसले होते! श्रीब्रह्मानंदबुवा यांनी वयाच्या विशीच्या आतच सर्व शास्त्रग्रंथांचा अभ्यास केला होता. त्यांच्या हाताच्या बोटावर ऐन विशीत कोडाचे पांढरे डाग दिसू लागले. ते अत्यंत विषण्ण झाले. शास्त्रज्ञानानं कोड जात नाही की कोडाचं दु:खही जात नाही, हे त्यांना कळून चुकलं. केवळ सद्गुरूच यातून वाचवतील, या भावनेनं ते सद्गुरूशोधार्थ फिरत होते. पुढे महाराजमयच झाले. एकदा महाराज म्हणाले, बुवा ते कोड काढूया का? ब्रह्मानंदमहाराज म्हणाले, नको महाराज, ते काही नामाच्या आड येत नाही! भाऊसाहेबांनी वयाची नव्वदी पार केली होती. दिसणं कमी झालं होतं. शरीर पूर्ण थकलं होतं. महाराजांना एकदा ते म्हणाले, ‘‘मला अजून का ठेवलं आहे? देहाचा कंटाळा आला आहे असे नाही, पण माझा काही उपयोग नाही.’’ महाराज म्हणाले, ‘‘ जगातील कोणत्याही गोष्टीचा लोभ नसताना व त्याचा उपभोग घेता येत नसतानाही कसे समाधान टिकवता येते हे दाखविण्याकरिता तुम्हाला ठेवले आहे!’’ त्यावर ते समाधानी स्वरात, ‘जशी तुमची इच्छा!’ एवढंच उद्गारले. नुसत्या नामानं आणि महाराजांवरील प्रेमानं हे सारे योगाच्या उच्च भूमिकेवर अढळपणे आरूढ झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा