अष्टांगयोगातील यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही पाच बहिरंग साधने आहेत. योगशास्त्रानुसार त्यांचा प्रथम सर्वसाधारण विचार करू. त्यातील गूढार्थ नामयोगाच्या चिंतनाच्या वेळी पाहू. यम आणि नियमांचे प्रत्येकी पाच प्रकार आहेत. यात यमाचं अनुष्ठान अनिवार्य आहे तर नियमांचं शक्य तितकं झालं पाहिजे, असं कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचं मत आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत. अहिंसा तीन प्रकारची आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक. या तीन क्रमांनुसारच तिचं आचरण अधिकाधिक आव्हानात्मक बनत जातं. कायिक अहिंसा म्हणजे शरीरानं दुसऱ्याशी हिंसक वर्तन न करणं. वाचिक अहिंसा म्हणजे दुसऱ्याचं मन दुखावेल, असं न बोलणं. मानसिक अहिंसा म्हणजे दुसऱ्याविषयी मनात क्रोध, वाईट विचार, असूया वा मत्सर न येऊ देणं. आता शरीरानं दुसऱ्याशी हिंसक न वागणं हे एकवेळ साधेल, पण दुसऱ्याला शब्दांनी न दुखावणं फार अवघड. आपण जशी वृत्ती उसळते त्या आवेगात ताडकन दुसऱ्याला अपशब्द बोलून जातो. बरं एकवेळ दुसऱ्याला शब्दानं न दुखविण्याची वाचिक अहिंसासुद्धा साधेल, पण दुसऱ्याविषयी मनात क्रोध, वाईट विचार न येऊ देणं, हे साधणं म्हणजे अत्यंत अवघड. दुसऱ्याविरुद्धची खदखद ही आपली श्वासोच्छ्वासासारखी सहजक्रिया झाली आहे. बघा, अष्टांगयोगातल्या पहिल्या अंगाच्या पहिल्या पायरीवरच आपला निभाव लागणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे! यमाचा दुसरा प्रकार आहे ‘सत्य’. सत्य म्हणजे जे खरं आहे, त्याचा पूर्ण स्वीकार. अर्थात उच्चार, आचार, विचार हे सत्याच्याच आधारे झालं पाहिजे. आता ‘अस्तेय’चा अर्थ पाहू. आवश्यकतेपेक्षा अधिक विषयांचा उपभोग घेणे म्हणजे ‘स्तेय’ होय. तेव्हा देहादिकांच्या खऱ्या आवश्यकतेकरिता आणि खऱ्या आवश्यकतेपुरतेच विषय सेवन करणे हेच अस्तेय. देहादिकांचे रक्षण, पोषण आणि वर्धन इत्यादी सृष्टीनियोजित कार्ये यथावत घडावीत म्हणून आवश्यक असलेल्या भोगांव्यतिरिक्त अधिक भोग न भोगणे हे अस्तेय व्रत आहे, अशी व्याख्या कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी केली आहे. कामरहित जीवन जगणं, हा ब्रह्मचर्य शब्दाचा अर्थ आपण जाणतोच. कोल्हटकर यांनी जरुरीपुरता काम भोगण्यालाही ब्रह्मचर्य मानलं आहे. कठोर ब्रह्मचर्याकडे जाणारी ती पायरीच आहे. पण या सर्वापलीकडचं खरं ‘ब्रह्मचर्य’ कोणतं, त्याची उकल नामयोगाच्या चिंतनात पाहू. त्यानंतर येतो तो ‘अपरिग्रह’. दृश्य, स्थूल विषयांतूनच ‘सुख’ मिळतं, या भावनेतून वस्तूंचा तसेच व्यक्तींचा संग्रह करण्याची आसक्तीयुक्त ओढ माणसात असते. ही आसक्तीयुक्त संग्रहाची वृत्ती सोडणं म्हणजे अपरिग्रह. स्वामी विवेकानंद यांनी दुसऱ्याकडून काहीही न घेणं, याला अपरिग्रह म्हटलं आहे. दुसरा जे काही देतो त्याच्यासोबत त्याची वासना, अपेक्षा, हेतू चिकटले असतात. दुसऱ्याकडून काही स्वीकारलं तर यांचाही स्वीकार होतो आणि साधनेत मलिनता येते.