प्रपंचात भगवंताचा आधार हवा असेल तर त्यासाठी सगुणोपासना हाच सोपा आणि पहिला उपाय आहे. आता ‘सगुणोपासना’ या नुसत्या शब्दानंही अनेकांच्या मनात अनेक विकल्प निर्माण होऊ शकतात. या शब्दातून मूर्तीपूजेचा भाव प्रकट होत असल्याने अनेकांच्या मनात उलटसुलट प्रतिक्रिया उमटतीलही. मूर्तीपूजेपाठोपाठ सर्व कर्मकांडेच अटळपणे येतील, त्यातून अवडंबरच वाढेल, असंही अनेकांना वाटतं. काही जण निर्गुण-निराकार परमेश्वरालाच मानणारे असतात. सगुणाची भक्ती ही अनेकांना भाबडी कल्पनाही वाटते. त्यासाठी ‘सगुणोपासने’चा व्यापक विचार करायला हवा. या विचाराला चालना देणारी श्रीगोंदवलेकर महाराजांची दोन वाक्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यातील पहिलं वाक्य असं आहे- ‘‘सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात!’’ (चरित्रातील भक्तीविषयक वचने, क्र. १५). अतिशय अर्थगर्भ असं हे वाक्य आहे. आपण निर्गुण-निराकार परमात्म्यालाच मानतो. त्या परमात्म्याच्या विविध अवतारांपैकी एका अवताराची उपासना करणे, त्या अवताराच्या मूर्तीची पूजा करणे, याने अध्यात्माचे शिखर गाठता येणार नाही, अशीही अनेकांची कल्पना असते. या सर्व विकल्पांना छेद देणारं अतिशय मार्मिक भाष्य करीत श्रीमहाराज सांगतात की, या जगात प्रत्येक जण या ना त्या रूपात सगुणाचीच उपासना करीत आहे. इथे ‘उपासना’ हा शब्द निव्वळ भक्तीमार्गापुरता नाही. आपलं समग्र जीवन हे सगुणानंच भरलेलं आहे. ‘सगुण’ शब्दाचे दोन अर्थ आहेत. सगुण म्हणजे दृश्य, हा एक अर्थ आहे आणि सगुण म्हणजे सत, रज, तम या गुणांसहित, हा दुसरा अर्थ आहे. जन्मापासून आपल्याभोवतीचा जो गोतावळा आहे तो या अर्थानं ‘सगुण’च आहे. आपल्या आवडत्या माणसांचा विचार करताना आपल्या डोळ्यांसमोर त्यांचं रूपही येतंच. या आवडत्या माणसांना पाहिलं की आपल्याला आनंद होतो. या आवडत्या माणसांशी बोलायला आणि त्यांचं बोलणं ऐकायला आपल्याला आवडतं. आईचं प्रेम हे सारखंच आणि एकसमान असलं तरी ‘आई’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आपलीच आई येते. ज्याप्रमाणे आपली आवडीच्या माणसाचं रूपच मनात प्रथम येतं आणि मग त्यांच्याविषयीचा विचार येतो, त्याचप्रमाणे नावडत्या माणसांचंही होतं. बरं, हे समस्त जग तिन्ही गुणांनी व्याप्त आहे. या गुणांच्या प्रभावापासून आपल्यासकट या जगातली एकही व्यक्ती मुक्त नाही. आपल्या समस्त क्रिया-प्रतिक्रियांवर या गुणांचाच प्रभाव असतो. त्यामुळे एका अर्थानं आपण सगुणाचंच अनुसरण करीत जगत असतो. सगुणाच्या दर्शनानंच आपण आनंदी किंवा दु:खी होतो, सगुणाच्याच चिंतेत मग्न असतो, सगुणानेच निश्चिंत होत असतो. मग आयुष्यभर सगुणाचा आधार सोडता येत नसताना भक्तीच्या वाटेवर पहिली पावलं टाकत असताना सगुणाचा आधार नाकारण्यात काय हशील? अशाश्वत स्थूल सगुण जगापलीकडे जायचं असेल तर शाश्वताच्या सगुण रूपाचा आधार अटळ आहे. या घडीला शाश्वताचं सगुण रूप भलेही काल्पनिक का वाटेना!
१९३. सगुणोपासना
प्रपंचात भगवंताचा आधार हवा असेल तर त्यासाठी सगुणोपासना हाच सोपा आणि पहिला उपाय आहे. आता ‘सगुणोपासना’ या नुसत्या शब्दानंही अनेकांच्या मनात अनेक विकल्प निर्माण होऊ शकतात.
आणखी वाचा
First published on: 03-10-2013 at 01:19 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan idol worshiped feeling