भगवंत आज आपल्यादृष्टीने अनुभवाच्या नव्हे तर कल्पनेच्या पातळीवर आहे. श्रीमहाराजही सांगतात की, ‘‘कल्पना करायचीच तर भगवंताविषयी करू या. भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे, अशी कल्पना करू या. त्यात खरे हित आहे आणि यानेच संसार सुखाचा होईल’’ (चरित्रातील कल्पनाविषयक बोधवचने, क्र. ६). कल्पना ही शक्ती आहे आणि ती चांगलंही घडवू शकते आणि वाईटही घडवू शकते, हे आपण मागेच पाहिलं. त्या कल्पनाशक्तीच्या जोरावर महाराज आपल्याला भगवंताशी एकाग्र व्हायला शिकवत आहेत. श्रीमहाराज सांगतात, ‘‘कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा  आपण कल्पनेत आणून सगुण करावा. आपण आपली कल्पना शेवटपर्यंत नेऊ. ते आपलेच काम आहे. पुढचे काम आपोआप होते’’ (चरित्रातील कल्पनाविषयक बोधवचने, क्र. १३). आता भगवंताची कल्पना करायची कारण आज कल्पनेच्या पातळीवर का होईना, आपण भगवंताचा विचार सुरू करू शकतो, त्याचं स्मरण सुरू करू शकतो. मनाचा एक गुणधर्म त्यासाठी फार उपयुक्त आहे. श्रीमहाराज सांगतात, ‘‘मन चंचल आहे, स्थिर नाही. पण ते कोठेतरी चिकटते आणि एकीकडून काढून ते दुसरीकडे चिकटवता येते. मग त्याला पहिल्याची किंमत राहात नाही. त्याचे सुख दु:ख राहात नाही. देहाकडून मन काढून थोडे थोडे भगवंताकडे लावण्याचा माणसाने प्रयत्न करावा. त्याचा अभ्यास केला पाहिजे..’’ (बोधवचने, क्र. ८५१ व ८५२). जग दृश्य आहे म्हणून त्याला मन सहजपणे चिकटलं आहे. भगवंत अदृश्य आहे म्हणून त्याला मन चिकटू शकत नाही. त्यासाठी श्रीमहाराज एक उपाय सांगतात. ते म्हणतात, ‘‘आपल्याला दृश्य वस्तू भगवंतापेक्षा खरी वाटते. मनात येणे आपल्या हातात नाही पण दृश्याच्या मागे न जाणे हे आपल्या हातात आहे.’’ (बोधवचने, क्र. ८१५) इथे श्रीमहाराज भगवंतामागे जायला सांगत नाहीत तर निदान दृश्यामागे जाऊ नका, असे सुचवितात. दृश्यामागे गेलं नाही तरी खूप होईल! त्याच्या दूरगामी प्रभावापासून वाचता येईल आणि या घडीला अदृश्य असलेल्या भगवंताचा मार्ग दिसत जाईल! पण या दृश्य जगात आपलं मन नुसतं चिकटलेलंच नाही तर माझेपणानं गुंतलंही आहे. ते या जगापासून विलग होईल, असं आपल्याला वाटूही शकत नाही की पटूही शकत नाही. पण श्रीमहाराज सांगतात, ‘‘आपले मन आपल्याला वेगळे काढता येण्यासारखे आहे. परिस्थितीचा मनाशी संबंध आपण लावून घेतला आहे. माझेपणात मनाचा संबंध आहे. माझेपणा वाढवावा तितका वाढतो. तसाच तो कमी होऊ शकतो. तेवढे माणसाच्या स्वाधीन आहे’’ (बोधवचने, क्र. ८५०). आज आपलं मन परिस्थितीच्या प्रवाहानुसार वाहात आहे. त्या परिस्थितीचा प्रभाव मनावर आहे. माझेपणानं मी जगात गुंतलो आहे आणि हा माझेपणा निव्वळ माझ्या मनातूनच उत्पन्न झाला आहे आणि मनातच विस्तारत आहे. जगापासून मनानं अलिप्त व्हायला श्रीमहाराज सांगत आहेत, देहानं नव्हे!