आपणच केलेला नामोच्चार आपल्याच कानांनी ऐकला की नामधारकाची अंतर्दृष्टी जिथे सहज केंद्रित झाली असते त्या ‘आज्ञाचक्रा’ची ‘सिद्ध-सिद्धान्त-पद्धती’ या ग्रंथातली माहिती आधी नुसती वाचू. या ग्रंथातील माहितीनुसार- भूचक्र अथवा आज्ञाचक्र हे अंगठय़ाच्या मधल्या भागाएवढे आहे. यात दीपशिखाकार ज्ञानचक्षूचे ध्यान करावे. याने वाक् सिद्धी प्राप्त होते. योगशास्त्रानुसार आज्ञाचक्र दोन भुवयांमध्ये, त्यामागे आहे. या चक्राची देवता सद्गुरू आहे. मनस् हे या चक्राचे तत्त्व आहे. या चक्रात जावयास मनाचा संपूर्ण लय व्हावा लागतो. (पृ. ४०). श्री. भट आणि श्री. आघारकर यांनी श्रीबाबामहाराज आर्वीकर यांच्या ‘दिव्यामृतधारा’तील तपशीलही दिला असून त्यानुसार, आज्ञाचक्रामुळे हित व अहित, कल्याण व अकल्याण जाणण्यास जीव समर्थ होतो. अनंत जिवांना या चक्रामुळे जीवन मार्गदर्शन व आपल्या मूळ स्वरूपाची दिव्यस्मृती कायम ठेवता येते. (पृ. ४२). तर आज्ञाचक्राचं स्थान, त्याची व्याप्ती, त्यावर ध्यान सिद्ध केल्यास होणारे लाभ; हा तपशील आपण पाहिला. आता या आज्ञाचक्राचा स्थानविशेष आणि त्यावरील ध्यानाचं श्रेष्ठत्व जाणून घेऊ. एखाद्या धनवंताचं घर प्रासादतुल्य असतं, तेव्हा त्या घरात प्रत्येक गोष्टीसाठी स्वतंत्र खोली असते. उपासनेसाठी देवघर, रांधण्यासाठी स्वयंपाकघर, भोजनासाठी भोजनगृह, आगतस्वागतासाठी दिवाणखाना, शयनासाठी शयनगृह त्याचप्रमाणे चिंतन व खासगी बैठकीसाठी एकांतखोलीसुद्धा असते. त्याप्रमाणेच आपल्या देहातही जणू विचार व चिंतनासाठी एक जागा आहे! विद्वान असो की अडाणी, माणूस हा त्याच्या विचारानुसार वागत असतो. हा जो विचार करून निर्णय घेण्याची प्रक्रिया त्याच्यात घडते ते स्थान भ्रूमध्य अर्थात आज्ञाचक्र! खोल चिंतनात बुडालेल्या माणसाचं मन आपोआप भ्रूमध्यावरच केंद्रित होऊन निर्णयप्रक्रियेत रत असतं. आता आपण या जगात वावरतो, त्या वावराचं एकमेव माध्यम देह आहे. हा देह इंद्रियांनी, अवयवांनी परिपूर्ण आहे. प्रत्येक इंद्रियाचं वैशिष्टय़ आहे, विशेष कार्य आहे. चालणं, बोलणं, पाहणं, ऐकणं, खाणं, पचवणं, वास घेणं, इतकंच काय, मल-मूत्र त्यागणं, काम भोगणं आदी सर्व क्रिया या इंद्रियांच्या मार्फतच केल्या जातात. या इंद्रियांचे स्थूल आणि सूक्ष्म असे दोन स्तर असतात. स्थूल इंद्रियं ही स्थूल-जड साधनमात्र असतात. त्यांची आंतरइंद्रियं ज्ञानतंतूंद्वारे मेंदूतील केंद्राशी जोडली गेली असतात. मन, चित्त, बुद्धी याद्वारे इंद्रियांच्या कृतीला सार्थकता येते. उदाहणार्थ डोळे पाहण्याचं जड साधनमात्र आहेत. डोळ्यांद्वारे माणूस पाहतो, डोळे पाहत नाहीत! कानांद्वारे ऐकलं जातं, कान ऐकत नाहीत. याप्रमाणे प्रत्येक इंद्रियाद्वारे विशिष्ट कार्य करवून घेतलं जातं, मात्र ते करवून घेण्याची प्रक्रिया क्षणोक्षणी ‘आत’ चालू असते! इंद्रियांद्वारे काय करवून घ्यायचं, याचा सगळा निर्णय आंतरइंद्रिये व ज्ञानतंतूंनी ग्रहण केलेल्या व पाठविलेल्या संवेदनांनुसार मेंदूत सुरू असतो. ही इंद्रिये आणि मेंदू यांच्या मध्यस्थानी आज्ञाचक्र विराजमान आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा