आपल्या आयुष्यातलं अखेरचं निरूपण संपवून महाराज आसनावर बसले तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. लोकांनी त्यांच्या पायी माथा टेकवून त्यांचं दर्शन घेतलं. नंतर सर्वाना निजावयास सांगून ते खोलीत गेले. तीन-चार भक्तमंडळी त्यांच्याबरोबर होती. पहाटे चार वाजता श्रीमहाराज डाव्या कुशीवर वळले तेव्हा ‘श्रीराम श्रीराम’ असा माधुर्यानं भरलेला नामोच्चार त्यांच्या मुखातून झाला. पाच मिनिटांनी ते उठून बसले. खोलीतली चार-पाच मंडळी जागतच बसली होती. त्यांच्याकडे एकदा पाहून सिद्धासनात त्यांनी डोळे मिटले. सव्वापाचच्या सुमारास त्यांची समाधी उतरली. मग मंदिरात त्यांनी रामरायाला साष्टांग दण्डवत घातला आणि ‘माझ्या माणसांना सांभाळ’, अशी प्रार्थना केली. खोलीत परतून ते बसले तेव्हा का कोण जाणे, पण वामनराव ज्ञानेश्वरी यांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. श्रीमहाराजांनी त्यांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून त्यांच्याकडे प्रेमानं पाहिलं आणि म्हणाले, ‘‘जेथे नाम तेथे माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।’’ श्रीमहाराजांच्या मुखातून झालेला हा अखेरचा बोध! बाकीच्या भक्तांनीही वामनरावांचं अनुकरण केलं. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून महाराजांनी त्यांना प्रेमभरानं पाहिलं. मग डोळे झाकून घेतले. त्यावेळी ‘अमृत’ नावाची उत्तम घटिका सुरू झाली आणि श्रीमहाराजांनी आपलं अवतारकार्य संपवलं. ‘महाराज गेले’ हे शब्द अंत:करण कापत वातावरणात घुमू लागले. आनंदाचा आधारच हिरावला गेल्याचं जहरी वास्तव हे शब्द सांगत होते.. ते ऐकणंदेखील असह्य़ होतं. त्या दिवशी ब्रह्मानंदबुवा कर्नाटकात गदग येथे होते. बेलधडीला जायला म्हणून ते घरातून जाताच गोंदवल्याची तार आली. त्यांचे पुतणे भीमराव ती घेऊन स्फुंदत रडत तसेच रस्त्यानं धावू लागले. दोन-तीन मैल पळत गेल्यावर लांबवर त्यांनी बुवांना गाठलं. धापा टाकत त्यांनी ती तार हाती ठेवली. ती वाचताच ब्रह्मानंदबुवा जमिनीवर कोसळले आणि लहान मुलागत आक्रंदत म्हणाले, ‘‘श्रीमहाराज चालतेबोलते ब्रह्म होते रे! दोन रुपयांचं तिकिट काढलं की डोळ्यांनी पाहायला मिळत होते..’’ आज या घटनेला शंभर र्वष लोटली. मार्गशीर्ष कृष्ण दशमी (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी श्रीमहाराजांनी देहावतार संपविला. श्रीमहाराज गेले.. पण जे सदोदित आहेतच त्यांना कुठलं जाणं-येणं? फक्त त्यांच्या अस्तित्वाची जाणीव टिकायची तर ती नामानंच टिकेल. श्रीमहाराज सांगतात, ‘‘तुम्हाला स्वत:ला कळत नाही इतकं तुमच्या मनातलं मला कळतं. ते ओळखूनही तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागं-पुढं चालतो. नामाची ज्योत जळती ठेवा. मी तुमच्या स्वाधीन होऊन राहीन, नव्हे मी तुमचा ऋणी होईन. तुम्हाला नामाची अत्यंत आवड लागली की माझा आनंद उचंबळून येतो. मग तुमच्यासाठी काय करू अन् काय नको, असं मला होऊन जातं. कारण नामावर प्रेम करणं म्हणजेच माझ्यावर प्रेम करणं! नामात मन ठेवा. हे माझं खरं दर्शन आहे. मी सांगितलेलं स्मरणात ठेवा. माझ्या सांगण्यात मी आहे. मला दुसरं कुठेही पाहू नका.’’ आता अखेरच्या दोन भागांत काही आवर्जून सांगायचं आहे..
२५३. अमृतघटिका
आपल्या आयुष्यातलं अखेरचं निरूपण संपवून महाराज आसनावर बसले तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. लोकांनी त्यांच्या पायी माथा टेकवून त्यांचं दर्शन घेतलं.
आणखी वाचा
First published on: 27-12-2013 at 02:02 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan in fact appearance