अंत:करणाच्या उंबरठय़ावर नामाचा दिवा ठेवायचा म्हणजे बाहेरचे सर्व व्यवहार करीत असताना मनात नाम घ्यायचा प्रयत्न करायचा. मनानं सतत नामाची संगत ठेवायचा प्रयत्न करायचा. जशी संगत असेल तसा परिणाम आपल्यावर आपोआप होतो. श्रीमहाराजच म्हणतात, ‘‘एखाद्या बैराग्याची संगत केली तर स्वाभाविकच कपडय़ाचे प्रेम कमी होईल, पण एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छानछोकी करण्याकडे प्रवृत्ती होईल’’ (४ फेब्रुवारीच्या प्रवचनातून). माणसाची जशी संगत असते आणि त्यानुरूप जसा आपल्यावर प्रभाव पडत असतो तशीच सूक्ष्माचीही संगत असते आणि त्याचाही प्रभाव आपल्यावर पडत असतो. आपला विचार, आपल्या कल्पना, आपलं चिंतन, आपलं मनन हे सर्व सूक्ष्म आहे. आज ते सर्व भौतिकानंच झाकोळलं आहे. भौतिक हे सतत बदलणारं, वाढणारं अन् घटणारं, उत्पन्न होणारं अन् नाश पावणारं  आहे. त्यामुळे अशा भौतिकाच्या सततच्या विचारानं, कल्पनेनं, चिंतनानं, मननानं म्हणजेच भौतिकाच्या आंतरिक संगतीनं आपण अस्वस्थ, अशांत, अस्थिर झालो आहोत. या आंतरिक संगतीच्या प्रभावातूनच बाहेरच्या जगात आपला व्यवहार पार पडत असतो. आपल्या मनाच्या घडणीनुसार आपण बाहेरच्या जगात माणसं जोडतो किंवा तोडतो. माणसांसमोर लाचार होतो किंवा त्यांच्यावर सत्ता गाजवतो. त्यामुळे अंत:करणाच्या उंबरठय़ावर जर नामाचा दिवा ठेवला तर आतला आणि बाहेरचा गोंधळ, विसंगती जाणवू लागेल. सूक्ष्मातल्या सध्याच्या संगतीची दिशा बदलायची तर नामाचीच संगत हवी. आपण कसे आहोत? आपण वासनेच्या पकडीत आहोत. श्रीमहाराज सांगतात- वासना म्हणजे, ‘आहे ते असू द्याच, आणि आणखीही मिळू द्या’ असे वाटणे (४ फेब्रुवारीच्या प्रवचनातून). थोडक्यात हाव आणि आणखी हाव, अशी सध्याची स्थिती आहे. ती हाव आहे म्हणून बाहेर सतत धाव आहे. त्या हावेच्या पूर्तीच्या इच्छेपायी जगात फरपट आहे. जग मात्र आपली हाव सतत पुरवत नाही. मनाला अनेकवार घावही सोसावा लागतो. भौतिकशरणतेतून सुरू असलेली ती धाव नामानंच मंदावेल. अकारण धाव मंदावेल आणि जितकी गरज आहे तितके प्रयत्न अचूकतेनं होतील.  त्यासाठी नामाची ज्योत अंत:करणात तेवत ठेवली पाहिजे. ती ज्योत तेवू लागली की त्या प्रकाशात अंतरंगातला कचरा प्रथम दिसू लागेल! श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत, ‘अंधाऱ्या खोलीतला पसारा तुम्ही अंधारातच आवरत नाही. प्रथम खिडकी उघडता. प्रकाश आत येऊ देता. मग पसारा आवरणं सोपं होतं.’ तसंच आहे हे! नामाचा, उपासनेचा, बोधाचा शुद्ध प्रकाश नसेल तर अंतरंगातला कचरा काढता येत नाही, नव्हे, तो दिसतच नाही! श्रीमहाराज म्हणाले, ‘‘एक साधक मला म्हणाला की, अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे. वास्तविक तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली, किंवा क्रोध वाईट आहे हे त्याला आता कळू लागले आहे, इतकेच!’’(३ फेब्रुवारीच्या प्रवचनातून).

Story img Loader