नारदमुनी ‘कीर्तननिष्ठु’ आहेत, असं ‘भागवता’त म्हटलं आहे. नारदमुनींच्या भक्तिसूत्रातलं एक सूत्र आहे- ‘स कीर्त्यमान: शीघ्रमेवाविर्भवति अनुभावयतिच भक्तान्।। ८०।।’ म्हणजे तो परमात्मा त्याचं कीर्तन करताच तात्काळ आविर्भूत होतो आणि भक्तांच्या नित्य अनुभवाचा विषय होतो! या सूत्राच्या विवरणात धुंडामहाराज देगलूरकर यांनी तुकाराम महाराजांचा अभंग नमूद केला आहे. तो असा – ‘कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव। वैकुंठीचा राव सवें असे।। त्रलोक्यभ्रमण करीत नारद। त्यासवें गोविंद फिरतसे।। नारदमंजुळ सुस्वरे गीत गाय। मार्गी चालताहे संगे हरी।। तुका म्हणे त्याला गोडी किर्तनाची। नाही आणिकांची प्रीती ऐसी।।’ या अभंगाचं विवरण धुंडामहाराजांनी केलेलं नाही कारण अभंगाचा अर्थ सरळसोपा आहे. पण त्या ‘सरळ सोप्या’तही हिरंमाणकं लपली असतात! कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव। परमात्मा प्रत्येकाच्या आत्मरूपात विलसत आहे. सूक्ष्म रूपाने माझ्या आत विलसत आहे. तो कीर्तनाच्या सुखानं सुखी होतो. आता हे ‘कीर्तन’ म्हणजे काय? हे मंदिरातलं कीर्तन नव्हे. कीर्तनाची व्याख्या अशी आहे- ‘नामलीला गुणादीनाम् उच्चैर्भाषातु कीर्तनम्।।’ भगवंताचं नाम, त्याच्या लीला, त्याचे गुण यांचं उच्च भाषेतलं प्रकटन, उच्चार, आवर्तन ते कीर्तन आहे. आता ही ‘उच्च भाषा’ म्हणजे अंतर्मनाची भाषा, भावनेची भाषा. माझ्या अंतर्मनात भगवंताच्या नामाचं, त्याच्या लीलांचं, त्याच्या गुणांचं सतत संकीर्तन हे खरं कीर्तन आहे. आज माझ्या अंतर्मनात माझ्याच नामाचं, माझ्याच मोठेपणाचं, माझ्याच गुणांचं आणि माझ्याच तथाकथित कर्तृत्वाचं सतत कीर्तन चालतं. त्यानं अंतरातला देव कसा सुखी होईल? जो शाश्वत आहे त्याला अशाश्वताच्या कीर्तनाची काय गोडी? ईश्वराला नश्वराच्या कीर्तनात काय रस? त्यामुळे हृदयस्थ श्रीहरी हा अतृप्त असतो. ‘जळत हृदय माझे जन्म कोटय़ानुकोटि।’ कित्येक जन्मं माझ्या ‘मी’पणाच्या वणव्यात माझा अंतरात्मा होरपळत असतो. जेव्हा ‘मी’च्या जागी त्या परमात्म्याचे नामकीर्तन, गुणकीर्तन आणि लीलाकीर्तन सुरू होते तेव्हाच तो अंतरात्मा तृप्तीचं सुख अनुभवू लागतो. मग हे कीर्तन अखंड चालावं, त्यात बाधा येऊ नये म्हणून ‘वैकुंठीचा राव’ सतत भक्ताबरोबर राहू लागतो. ‘वै’ म्हणजे नाश आणि ‘कुंठ’ म्हणजे कुंठितपणा, बाधा, अडथळा, आपत्ती. वैकुंठ म्हणजे अडथळ्यांचा नाश. परमात्मारूपी सद्गुरूच क्षुद्र जीवाच्या हृदयात भक्ती उत्पन्न करतात. निर्मिती हा ब्रह्मदेवाचा गुण आहे म्हणून ‘गुरुब्र्रह्मा’! त्या बीजाचं पालनपोषणही सद्गुरूच करतात. पालन हा विष्णूचा गुण आहे, म्हणून ‘गुरुर्विष्णू:’! मग साधकाच्या साधनेआड इच्छा, वासना, विकारांचे जे जे अडथळे येतात त्यांचा संहार सद्गुरू करतो. संहार हा शिवाचा गुण आहे, म्हणून ‘गुरुर्देवो महेश्वर:’! तर असा हा परमात्मा ‘वैकुंठीचा राव’ बनून भक्ताच्या आड येणाऱ्या गोष्टींचा संहार करीत राहतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा