आपलं श्रीमहाराजांवर प्रेम नाही का? तर, आहेच. प्रेमाच्या व्यापक व्याख्येनुसार ते प्रेम नसेलही, देहबुद्धीची खपली जपतच आपण ते प्रेम करीत असूही, तरीही श्रीमहाराजांवर आपलं प्रेम आहे. आपण नाम घेत नाही का? तर घेतोच. आपल्याला ते मनापासून आवडत असेलही किंवा नसेलही, तरी आपण नाम घेतो आणि नामावर विश्वास दृढ व्हावा, अशी आपली प्रामाणिक इच्छाही असते. तरीही आपण ‘सहजयोगी’ होण्याची कल्पनादेखील करू शकत नाही! का? खरं तर श्रीगोंदवलेकर महाराजांनीच याचं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ‘जे नाम मी ब्रह्मानंदबुवांना दिलं तेच तुम्हालाही दिलं. त्यांनी ते सर्वस्व मानलं तुम्ही तसं मानत नाही?’ तेव्हा जी उपासना महाराजांनी ब्रह्मानंदमहाराजांना दिली तीच आपल्यालाही दिली. जो बोध त्यांना केला तोच आपल्यालाही केला. जे प्रेम त्यांना दिलं तेच आपल्यालाही दिलं. तरीही त्या सहजयोग्यांनी नामाला, महाराजांच्या प्रेमाला आणि बोधाला जसं सर्वस्व मानलं तसं आपण मानत नाही! ब्रह्मानंदबुवा प्रथम कोडाच्या दु:खातून महाराजांकडे आले खरे, पण नंतर महाराजमय होऊन गेल्यावर देह बाह्य़ांगानं नव्हे आतूनच शुद्ध असला पाहिजे आणि तो उपासनेच्या आड येत नसेल तर मग बाह्य़ांगानं कसाही का असेना, ही त्यांची दृष्टी झाली. इथे माझ्याच जीवनातला एक प्रसंग आठवतो. का कोण जाणे, माझ्या मनात एकदा आलं की कानडी शिकावं. मी मनोमन ब्रह्मानंदमहाराजांना प्रार्थना केली की, ‘महाराजांची भाषा म्हणून तुम्ही मराठी शिकलात, मला तुमची कानडी शिकायची आहे. माझ्यावर कृपा करा.’ पहिल्याच दिवशी मला एका कानडी माणसानं क, ख, ग, घ एवढंच लिहायला शिकवलं. रात्री काही चैन पडेना. पुस्तक पाहून हळूहळू मी सर्व बळ्ळी म्हणजे चौदाखडी शिकलो आणि दुसऱ्या दिवशी ती त्या कानडी माणसाला लिहून दाखवली. त्याला फार आश्चर्य वाटलं. मला आनंद झाला. त्यानंतर दोन दिवसांनी माझ्या हातावर लहानसा पण ठसठशीत पांढरा डाग उमटला. मी घाबरून गेलो. मला मार्गदर्शन करणाऱ्या नाथसंप्रदायी सत्पुरुषाला मी तो डाग दाखवला. ते गंभीरपणे म्हणाले, ‘तुम्ही कुणा सिद्धपुरुषाकडे काही मागितलंत का?’ मला काही आठवेना. मग म्हणालो, ‘हो ब्रह्मानंदमहाराजांकडे कानडीचं ज्ञान मागितलं.’ ते हसले म्हणाले, ‘ते सर्वार्थानं दुसऱ्याला त्यांच्यासारखं बनवू शकतात मग ही एवढी क्षुल्लक गोष्ट काय मागायची? सारंच घ्या ना!’ मी आणखीनच घाबरलो. म्हणालो, ‘ते कानडी नाही आलं चालेल, पण हे संकट नको.’ त्या दिवसांची आठवण झाली की, नामाचं प्रेम मिळण्याची किती मोठी संधी गमावली, या जाणिवेनं मन खंतावतं आणि माझ्या क्षुद्र मनोवृत्तीची घृणाच वाटते. पुढे ‘नितळ’ हा नितांतसुंदर चित्रपट पाहिला आणि स्वत:ची अधिकच लाज वाटली. हा प्रसंग का सांगितला? तर देहालाच आपण सर्वस्व मानत असताना, देहाच्याच दिसण्यावरून दुसऱ्याबद्दल मत बनवत असताना आणि स्वत:च्या देहावरच पूर्ण विसंबून असताना महाराजांना आणि त्यांनी दिलेल्या नामाला सर्वस्व कसं मानता येणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा