भस्मासुराची कथा चिरपरिचित आहे. त्या असुरानं उग्र तपश्चर्येनं भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतलं आणि वर मागितला, मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याचं भस्म होवो. शिवजींनी तथास्तु सांगितल्यावर त्यांच्याच डोक्यावर प्रथम हात ठेवायला भस्मासुर सरसावला. ‘हृद्य आठवणी’ पुस्तकात एक आठवण आहे. ती अशी : माणसाला मिळालेल्या चांगल्या वृत्तीचा तो योग्य उपयोग करीत नाही हे सांगण्यासाठी श्रीमहाराजांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘विस्मरण हा माणसाला मिळालेला एक वरच आहे. आपल्याला पुष्कळ गोष्टींचा आपोआप विसर पडतो. त्यामुळे जीवन असह्य़ होत नाही, हे खरे. पण आपण भगवंतालाच विसरलो. म्हणजे विस्मरणाच्या वराचा प्रयोग भस्मासुराप्रमाणे आपण वर देणाऱ्या भगवंतावरच केला. याला काय म्हणावे?’’ थोडक्यात भगवंताचं इतकं विस्मरण झालं की तो आहे की नाही, याचीच शंका यावी! आता प्रथम तो आहे, याचं स्मरण मनात पक्कं झाल्याशिवाय त्याचा आधार कसा घेणार? आणि गंमत म्हणजे हे स्मरण होणं आणि टिकणं हाच आधाराचा उपाय आणि हाच आधारदेखील आहे. विस्मरणाने आज आपल्याला भगवंताचीच आठवण नाही. त्यामुळे त्याच्या आहेपणाबद्दल निशंकता नाही. पण प्रपंच मात्र खरा वाटतो कारण दिवसरात्र त्याचंच स्मरण आहे. एका अभंगात ओळ आहे पाहा.. आवा जाई पंढरपुरा वेशीपासून येई घरा! भक्तीचा आव आणणारे आपण सर्वच आवा आहोत आणि प्रपंचाची वेस मनानंदेखील आपल्याला ओलांडता येत नाही. प्रपंचानं अशी वेसण घातली आहे की त्या वेशीबाहेर जायला जमत नाही आणि आवडत तर त्याहून नाही. मग जे मन प्रपंचाच्याच व्यापात गुंतून आहे त्या मनानंच आपण नेम आणि उपासना करीत असतो. त्या अनुषंगानं श्रीगोंदवलेकर महाराज यांची तीन बोधवचनं आपण पाहू. श्रीमहाराज म्हणतात- ‘जी गोष्ट अत्यंत प्रेमाची असते तिची शंका नसते’ (बोधवचने/ अनुक्रमांक- १२) ‘ज्या गोष्टीचे अतिशय प्रेम असते तेथे मन एकाग्र होते. आपण एकाग्रतेचा विचार करतो. पण तो विचारच एकाग्रता बिघडवतो’ (बोधवचने/ अनु. ८) आणि ‘प्रेमाला नेमाची गरज लागत नाही. वियोग सहन होत नाही ते प्रेम. प्रेम ठेवावे म्हणजे नेम आपोआप साधतो. प्रथम नेम पाहिजे परंतु फार नेम करू नये.’ (बोधवचने/ अनु. १) जी गोष्ट अत्यंत प्रेमाची असते तिची शंका नसते! आज आपल्याला भगवंताच्या अस्तित्वाची शंका आहे पण प्रपंचाबद्दल निशंकता आहे. म्हणजेच आपलं खरं प्रेम प्रपंचावरच आहे. पण प्रपंचावर तरी आपलं खरं प्रेम आहे का हो? नाही! अगदी खोलवर विचार केला की जाणवेल आपलं खरं प्रेम केवळ आपल्यावरच आहे. मला प्रपंचात सुख मिळेल, अशी आशा असल्यानं प्रपंचावर आपलं प्रेम आहे, असं आपल्याला वाटतं!
१४. प्रपंचप्रेम
भस्मासुराची कथा चिरपरिचित आहे. त्या असुरानं उग्र तपश्चर्येनं भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतलं आणि वर मागितला, मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याचं भस्म होवो. शिवजींनी तथास्तु सांगितल्यावर त्यांच्याच डोक्यावर प्रथम हात ठेवायला भस्मासुर सरसावला. ‘हृद्य आठवणी’ पुस्तकात एक आठवण आहे.
आणखी वाचा
First published on: 18-01-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan love