पू. तात्यासाहेब केतकर यांच्या माध्यमातून लोक श्रीमहाराजांचा वाणीरूप सत्संग अनुभवत होते, त्या काळची गोष्ट आहे. एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने श्रीमहाराजांचा अनुग्रह घेतला आणि तो नाम घेऊ लागला. एक दिवस आत्मज्ञान-ब्रह्मज्ञान जाणण्याची त्याला तीव्र इच्छा झाली. जे. कृष्णमूर्ती यांची व्याख्याने तेव्हा होत असतं. त्यानं त्यातील काही ऐकली आणि त्याच्या मनात नामस्मरणाबद्दल शंकांचे काहूर उठले. तो श्रीमहाराजांच्या दर्शनास आला आणि त्यानं झाला प्रकार नमूद केला. श्रीमहाराज म्हणाले, ‘‘एक मुलगा नुकताच मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्याला वाटले शेवटी आपल्याला एम.ए. करायचे आहे त्यासाठी आवश्यक ज्ञान कसे असते हे एकदा पाहू तरी. या विचारातून तो एकदम एम.ए.च्या वर्गात जाऊन बसला व प्राध्यापक काय शिकवतात, ते ऐकू लागला. तेथील तत्त्वज्ञानाचे व्याख्यान ऐकून तो भांबावून गेला आणि त्याला वाटले की महाविद्यालयात शिकणे काही आपल्या आवाक्यातले नाही! त्याच्या मनाची ही जशी स्थिती झाली तशीच तुमची झाली आहे. कृष्णमूर्ती जो सांगतात तो आहे ज्ञानमार्ग. तो पचनी पडण्यास मोठी योग्यता लागते. तरी जे ऐकले ते सर्व विसरून नाम घेत जावे. त्या नामाने तुमच्या मनास शाश्वत समाधान खास लाभेल, याची हमी मी घेतो. त्यांनी जे ज्ञान सांगितले ते मलाही सांगता आले असते. पण जो धडा पचनी पडणार नाही, तो देण्यात काय अर्थ आहे? म्हणून तो आत्ता दिलेला नाही.’’ हा अधिकारी प्रामाणिक होता, म्हणून त्या ज्ञानाला आपण पात्र नाही, हे त्याला जाणवलं होतं. आपण करतो ते साधनही त्यासाठी पुरेसं आहे का, असा विकल्प त्याच्या मनात उठला होता आणि थेट सद्गुरुंकडूनच त्याचं निरसन करून घेण्याइतपत त्याचं मन सरळ होतं. बरेचदा ऐकीव ज्ञान ‘समजलं’ असा ग्रह झाला की जणू ते आपल्यात उतरलंच आहे, असा भ्रमही उत्पन्न होतो. मग त्या शाब्दिक ज्ञानाची झूल पांघरून संधी मिळताच ते ज्ञानामृत दुसऱ्याला पाजण्यातच आपल्याला आनंद वाटू लागतो. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘वाचनाने सर्व ज्ञान येत नाही आणि अर्धवट ज्ञानाने समाधान बिघडते’’ (बोधवचने, क्र. १३३). एक फार मोठे शास्त्रोक्त गायक गाताना हातवारे करीत. त्यांच्यासारखं गाणं आपल्यालाही साधावं म्हणून एकानं प्रथम सराव सुरू केला तो हातवाऱ्यांचा! जो पूर्ण स्वरशरण आहे त्याच्या मैफलीतल्या हालचाली त्याच्या नसतातच. तो स्वर खेचील तिकडे तो खेचला जातो. हे स्वरसमर्पण साधलं नाही तर नुसत्या हातवाऱ्यांनी मैफल रंगेल काय? अगदी त्याचप्रमाणे शाब्दिक ज्ञान आणि पेहराव योग्यासारखा असला म्हणून कुणी महायोगी ठरत नाही. जो आतून पूर्णपणे भगवंताला समर्पित होतो त्याचा सहज वावर आणि सहज बोलणं यातून सहजज्ञान आपोआप प्रकटतं. आज सवयींनाच पूर्ण शरणागत असताना नुसत्या वेषांतरानं आणि शब्दज्ञानानं भगवंताला समर्पित झाल्याचा अनुभव आपल्याला येईल काय?
१५१. मुखवटा
पू. तात्यासाहेब केतकर यांच्या माध्यमातून लोक श्रीमहाराजांचा वाणीरूप सत्संग अनुभवत होते, त्या काळची गोष्ट आहे. एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने श्रीमहाराजांचा अनुग्रह घेतला आणि तो नाम घेऊ लागला.
आणखी वाचा
First published on: 01-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan mask