‘आज्ञाचक्रा’चा स्थानविशेष असा की, देहाची सगळी इंद्रियं या आज्ञाचक्रापर्यंतच संपतात आणि त्यानंतर थेट ललाट आणि मेंदूचा प्रांत सुरू होतो. मेंदूला जोडलेले शरीरभरातील ज्ञानतंतू मेंदूकडे क्षणोक्षणी संवेदना संक्रमित करीत असतात. संवेदनांची ही जी ये-जा आहे तिचा मुख्य मार्ग या ‘आज्ञाचक्रा’तून जातो. पूर्वीच्या काळी म्हणून या मार्गावर अर्थात दोन भुवयांच्या मध्यापासून मस्तकाच्या प्रारंभापर्यंत लाल तिलक लावला जाई. सूर्याच्या अनंत शक्तींपैकी ‘प्रभा’ ही अत्यंत सूक्ष्म शक्ती हा तिलक खेचून घेत असे आणि त्याद्वारे सूक्ष्म प्रज्ञाशक्तीचा लाभ होत असे. तर हा माणसाच्या जडणघडणीत त्याच्या ‘मेंदू’चा सहभाग मोठा असतो. ‘माणसाची बुद्धिमत्ता, त्याचा स्वभाव, त्याची सर्जनशीलता, त्याचं प्रेम, इतकंच काय, त्याची सहनशक्ती, दुसऱ्याबद्दलची अनुकंपा, माणुसकी, करुणा सगळं त्याच्या मेंदूतील पेशींच्या विशिष्ट जुळणीवर अवलंबून असतं’, असं डॉ. आनंद जोशी आणि सुबोध जावडेकर यांनी ‘मेंदूतला माणूस’ (प्रकाशक- राजहंस) या पुस्तकात नमूद केलं आहे. आपण जसं अन्न खातो तसं शरीर घडतं म्हणतात. त्याच धर्तीवर सांगायचं तर डोळे, कान, नाक आदी ज्ञानेंद्रियांनी भौतिकात जो ‘आहार’ आपण ग्रहण करीत असतो व मन, चित्त, बुद्धीद्वारे त्या ‘आहारा’चं जे पचन सुरू असतं त्यानुसार आपल्या मेंदूची अर्थात आपली जडणघडण बनत असते. तेव्हा संवेदनांच्या प्रवाहाचं नियमन साधणारं, भौतिकाची ओढ मंदावणारं ‘आज्ञाचक्रा’वरील ध्यान हे आपलं व्यक्तिमत्त्वच घडविणारं असतं. ध्यानाचे स्थूल, ज्योतिर्मय आणि सूक्ष्म असे तीन प्रकार श्रीगोरक्षनाथांनी ‘धेरण्ड संहिते’त सांगितले आहेत. स्थूल ध्यान सर्वपरिचित आहे. श्रीमहाराजांची जी मानसपूजा आपण करतो ती सुरुवातीला स्थूल ध्यानासारखीच असते. स्थूल ध्यान म्हणजे इष्ट देवता वा सद्गुरूच्या रूपाचं ध्यान असतं. दीपज्योती वा तेजाचं ध्यान हे ज्योतिध्र्यान आहे. तंत्रमार्गी ते करतात. तिसरं सूक्ष्म ध्यान जे आहे, ते सर्वोच्च मानलं जातं. शाम्भवी मुद्रेद्वारे कुंडलिनी शक्तीचं ध्यान हे सूक्ष्म ध्यान आहे, अशीही व्याख्या आहे. आता ही शाम्भवी मुद्रा कशी आहे? ‘धेरण्ड संहिते’त श्रीगोरक्षनाथ सांगतात, ‘नेत्राञ्जन समालोक्य आत्मारामं निरीक्षयत्। सामवेच्छाम्भवी मुद्रा सर्वतन्त्रषुगोपिता।। वेदशास्त्रपुराणानि सामान्य गणिका इव। इयन्तु शाम्भवीमुद्रा गुप्ताकुलवधूरिव।।’ (मुद्रा प्रकरण, श्लोक ६४, ६५). म्हणजे दृष्टी दोन्ही भुवयांच्या मधोमध लावून एकाग्र चिंतन करीत आत्मारामाचे ध्यान ही शाम्भवी मुद्रा आहे! वेदशास्त्रपुराणात तिचं वर्णन लपून आहे. ही मुद्रा एखाद्या कुलवधूप्रमाणे, कुणाच्या दृष्टीस न पडता वावरते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. तेव्हा दोन भुवयांच्या मध्ये जे एकाग्र ध्यान होतं ते सर्वोच्च सूक्ष्म ध्यान, ‘आपण नाम घ्यावे आणि आपल्याच कानांनी ऐकावे’ या वरकरणी साध्याशा वाटणाऱ्या बोधाच्या आचरणातून सहज साधतं. गेले बारा भाग आपण योगविचार आणि त्या अनुषंगानं कुंडलिनीचा विचार केला. आता नामातही जो योगलाभ सहजसाध्य आहे, त्याकडे परत वळू.

Story img Loader