श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात- जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की, मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखररूपाने दिसू लागतात, आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो, ‘‘हे परमेश्वरा! इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना, तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू? एवढय़ा पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे का?’’ असे वाटू लागते. (३ फेब्रुवारीच्या प्रवचनातून). म्हणजे परमात्मप्राप्तीचं ध्येय बाळगून या वाटेवर आलो खरे आणि साधन करता करता आपणच साधनाच्या आड कसे येतो, हे जाणवू लागले. आपले अवगुणच साधनेच्या आड येतात, हे जाणवू लागले. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणत ना? त्याप्रमाणे, गिधाडे उंच भराऱ्या मारतात पण त्यांचं लक्ष असतं जमिनीवर पडलेल्या सडक्या प्रेताकडे! तसं साधनेच्या निमित्तानं, चिंतनाच्या निमित्तानं विचार करताना मन उंचच उंच भराऱ्या मारतं पण अखेर सडक्या देहबुद्धीवरच येऊन आदळतं! साधन मनापासून सुरू झालं की हे जाणवल्याशिवाय राहवत नाही पण त्यावर उपायही काही सुचत नाही. मग मी असा क्षुद्र असताना, तुच्छ असताना विराट परमात्म्याची प्राप्ती मला शक्य तरी आहे का, असं वाटू लागतं. श्रीतुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘माझे मज कळों येती अवगुण। काय करूं मन अनावर।।१।। आतां आड उभा राहें नारायणाा। दयासिंधुपणा साच करीं।।२।। वाचा वदे परी करणें कठीण। इंद्रियां आधीन झालों देवा।।३।। तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास। न धरीं उदास मायबापा।।४।।’’ हे भगवंता, साधनेमुळे माझे अवगुण काय आहेत, हे मला कळू लागले आहे. पण काय करू? मन अनावर आहे, त्यामुळे त्या अवगुणांचा त्यागही होत नाही. प्रसंग उद्भवला की मनोवेग उसळतात आणि करू नये ते मी करून बसतो, बोलू नये ते बोलून बसतो. हे होऊ नये म्हणून हे भगवंता, मनोवेग उसळताच तू त्या प्रसंगात माझ्यासमोर उभा ठाक. तू दयेचा सागर आहेस, तेव्हा एवढी दया माझ्यावर कर. आपणही महाराजांना म्हणतोच ना? की, महाराज माझ्या हिताचं असेल तेच करा. हे बोलणं सोपं आहे. प्रत्यक्षात ते जे हिताचं आहे तेच करू लागतात तेव्हा इंद्रियांच्या ओढीमुळे जे खरं तर अहिताचं आहे, त्याचीच ओढ मला वाटू लागते! इंद्रियांचा गुलाम असल्याने ते मला माझ्या मनाविरुद्ध वाटणारी गोष्ट घडू देतात तेव्हा मला अतीव दु:ख होतं. मी जे मला हवं तेच घडावं, यासाठी त्यांची आळवणी करू लागतो. हे भगवंता, हे रामा, मी स्वत:ला तुझा दास म्हणवतो पण प्रत्यक्षात या इंद्रियअधीनतेमुळे मी कामनांचाच दास आहे. कसा का असेना, तुझा दास तर आहे. मग माझ्याबद्दल तू उदास होऊ नकोस. तू उदास झालास तर मला कुठेही थारा नाही! जे अशाश्वताबद्दल उदास आहेत त्यांनाच हाताशी धरायचं आणि आम्हासारख्यांना सोडायचं, हे मायबापा तुझ्याकडून होणार नाहीच!
२०९. आरसा
श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात- जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की, मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे.
First published on: 25-10-2013 at 12:19 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan mirror