आजचा भाग वाचण्यास सुरुवात करण्याआधी पुन्हा कालचीच कृती परत करू. डोळे मिटा, नामाचा उच्चार करा, तो मंत्र स्वत:च्याच कानांनी ऐका, आपली आतली दृष्टी कुठे केंद्रित झाली, याचा शोध घ्या. घेतलात? ही दृष्टी भ्रूमध्यावर स्थिर होते. दोन भुवयांच्या मध्ये स्थिर होते. हवं तर पुन्हा एकवार ही कृती करून खात्री करून घ्या. मध्यभागी असलेल्या मुखातून जो उच्चार होतो तो दोन बाजूंच्या दोन कानांनी एकत्रितपणे ऐकला जातो. आपण दोन डोळ्यांनी एकच गोष्ट पाहतो, दोन कानांनी एकच गोष्ट ऐकतो. पण स्वत:च्याच मुखातून होणारा उच्चार दोन कानांनी एकाग्रतेनं ऐकतो तेव्हा आत अशी आश्चर्यकारक क्रिया घडते की मिटलेल्या डोळ्यातली दृष्टी भ्रूमध्यावर स्थिर होते! आता डोळे उघडे ठेवूनही या कृतीने आतली दृष्टी भ्रूमध्यावरच केंद्रित होईल, पण डोळे मिटले असल्याने ते पटकन समजेल. आता भ्रूमध्यावर असं विशेष काय आहे? भ्रूमध्यावर दृष्टी केंद्रित झाल्यानं असं काय विशेष घडतं, याचा मागोवा आपण घेऊच. एखादा नामधारक म्हणेल की, मी काही असं नाम घेत नाही. मी नुसतं नाम घेतो. ते ऐकतोच असंही नाही. तरीही त्यातूनही कोणती दिव्य गोष्ट साधते, याचाही आपण मागोवा घेऊ. त्याआधी एक सांगतो, आपणच नाममंत्राचा आपला उच्चार आपल्याच कानांनी ऐकला तर दृष्टी भ्रूमध्यावर स्थिर होते, हे काही माझं ज्ञान नाही! ते करून दिलं नाथसंप्रदाय आणि दत्तसंप्रदायातल्या एका साक्षात्कारी सत्पुरुषाने. लहान मुलाला सांभाळावं, चालायला शिकवावं तसा त्यांनी या वाटेवर प्रथम सांभाळ केला. श्रीमहाराजांचा बोध रक्तात भिनला पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष होता. ‘बोधवचना’चं पुस्तक वाचायला घेतलं. दुसऱ्याच दिवशी त्यांना म्हणालो, रात्रीत बरचंसं वाचून झालंय. थोडसंच उरलंय. गंभीर स्वरात ते म्हणाले, ‘‘अहो, कसंतरी घाईघाईत खाऊ नये. नीट चावून चावून खावं. पचवावं.’’ मग जाणवलं, जे श्वासोच्छ्वासी नाम घेतात, ते श्रीमहाराज एकही शब्द निर्थक वापरणार नाहीत. तेव्हा शब्दा-शब्दाचा विचार करून बोधवचनांचा रवंथ करण्याची सवय जडली. प्रत्येक वाक्य कृतीत आणता येतं का, हे तपासण्याची सवय लागली. मग चरित्रातलं हे वाक्य आलं – ‘‘आपण नाम घ्यावे, ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वत:ला विसरून जावे, हाच आनंदाचा मार्ग आहे!’’ त्यांना म्हणालो, ‘‘नाम घ्यावं, स्वत:च्या कानांनी ऐकावं आणि स्वत:ला विसरावं, ही कृती काय साधते थोडीच? असं स्वत:हून स्वत:ला विसरणं शक्य आहे का?’’ हसून ते म्हणाले, ‘‘कृती फक्त ‘नाम घ्यावं आणि स्वत:च्या कानांनी ऐकावं’ एवढीच आहे. त्यानं स्वत:ला विसरलं जातं, हा परिणाम सांगितला आहे! हा श्रेष्ठ असा ध्यानयोग आहे.’’ विश्वास बसेना तेव्हा समोर बसवून ही कृती करून घेऊन आतली दृष्टी कुठे केंद्रित होत आहे, ते जाणवून दिलं. शेवटी म्हणाले, या भानगडी कशाला? नुसतं नाम घ्या. सर्व ज्ञान त्यातनंच येईल. नामापुढे त्या ज्ञानाचीही मातब्बरी वाटणार नाही, हा भाग वेगळा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा