एखाद्या गोष्टीची आपल्याला आठवण नसते, पण तिचं नाव निघताच आठवण होते. आज आपल्याला प्रपंचाचं अहोरात्र स्मरण आणि भगवंताचं विस्मरण आहे. भगवंताला पूर्ण विसरल्यानं त्याचं नाव घेण्याची गरज आहे. विस्मरण ही आपली वृत्ती बनल्याने स्मरणाची कृती अपरिहार्य झाली आहे. स्मरण हीच वृत्ती झाली की मग आणखी काय हवं? ती स्थिती साधण्यासाठी नाम हाच एकमेव आधार आहे. नाम जितकं खोल जातं तितकं ते वृत्तीत पालट घडवतं. त्यामुळे वृत्तीत पालट घडविण्याच्या धडपडीऐवजी नामच चिकाटीनं घ्या, ते नाम प्रेमानं व सातत्यानं होत गेलं म्हणजे मग वृत्तीत आपोआप पालट होईल, असं अनेक प्रसंगांतून श्रीगोंदवलेकर महाराजांनी दाखवलं. ल. ग. मराठे यांच्या ‘हृद्य आठवणी’मध्ये एक प्रसंग आहे. उकसान गावच्या एका माणसाला महाव्याधी झाली. योगायोगानं श्रीमहाराजांशी त्याची गाठ पडली. श्रीमहाराजांनी त्याला साडेतीन कोटी जपाचा संकल्प सोडायला सांगितला व गोंदवल्यास येऊन राहायला सांगितलं. गोंदवल्यास सहा वर्षांत त्यानं जप पूर्ण केला. जसजशी त्याची जपसंख्या पूर्ण होऊ लागली तसतशी त्या माणसाची व्याधी झपाटय़ानं कमी होऊ लागली. आपण लवकरच रोगमुक्त होणार, असं त्याला वाटू लागलं. एके दिवशी तो महाराजांना म्हणाला, ‘‘महाराज, आपल्या कृपेनं मी लवकरच बरा होणार, असं मला वाटू लागलं आहे, पण मी जो साडेतीन कोटी जप केला त्याची पुण्याई खर्ची घालून माझा रोग मला बरा व्हायला नको आहे. माझा देहभोग मी भोगून संपवायला तयार आहे. ’’ हे ऐकून महाराज फार प्रसन्न झाले व म्हणाले, ‘‘नामस्मरणानं माणसाच्या वृत्तीत आमूलाग्र बदल होतो व त्याला वैराग्य प्राप्त होतं, याचं हे धडधडीत उदाहरण आहे.’’ मग त्याला म्हणाले, ‘‘उत्तम चाकरी केली म्हणजे दिवाळीत पगारवाढ होतेच, पण मालक बक्षीसही देतो. रामरायाने प्रसन्न होऊन तुम्हाला दिलेलं बक्षीस आनंदानं स्वीकारा. नामानं तुम्ही कमावलेली पुण्याई अबाधितच आहे.’’ (आठवण १२८). ही आठवण सांगण्याचा मुख्य हेतू आपल्या वृत्तीची तपासणी आपल्याला करता यावी, हा आहे. व्याधीनं ग्रासलेल्या त्या माणसाला व्याधीमुक्तीचंच दु:ख झालं! आज ना उद्या चितेवर राख होणाऱ्या देहाच्या व्याधीकडे हे नाम खर्ची होणं त्याला मंजूर नव्हतं! आपली तशी वृत्ती झाली आहे? देहव्याधीचं सोडा, कारण ती सहज स्वीकारता येणं, ही योग्याचीच स्थिती आहे, पण नाम घेऊ लागल्यानंतर परिस्थिती थोडी बिघडू लागली तरी आपल्याला फार त्रास होतो. ‘इतकं नाम घेत असूनही श्रीमहाराज असं कसं घडू देतात?’ हा प्रश्न आपली मोडकीतोडकी श्रद्धा लगेच पोखरू लागतो. तेव्हा नामाचा हेतू भौतिक नव्हे आंतरिक सुधारणा हाच आहे, हे जाणून नाम घेतलं पाहिजे. भौतिक सुधारण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करावेत पण आत्मोन्नतीसाठी सर्वशक्तीनिशी नामच घ्यावं. ते नामच पालट घडवील, श्रद्धा विकसित करील. ते नामच अखंड सत्संगात ठेवील, अशी श्रीमहाराजांची ग्वाही आहे. आपला मुख्य विषय इथेच संपला. आता निरोपाचे सात भाग..
२४८. नामकृपा
एखाद्या गोष्टीची आपल्याला आठवण नसते, पण तिचं नाव निघताच आठवण होते. आज आपल्याला प्रपंचाचं अहोरात्र स्मरण आणि भगवंताचं विस्मरण आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-12-2013 at 01:18 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan name grace